बैलांचा सण आणि त्यांचे खास अलंकार !
अगदी प्राचीन काळापासून भारतात शेती हा सर्वात मुख्य व्यवसाय होता. एखाद्याची प्रतिष्ठा ही त्याच्याकडील गोधनाच्या संख्येवर ठरत असे. आता तर शेतीचे महत्व खूपच वाढू लागले आहे. Agriculture is the culture of India ! साहजिकच पूर्वी आपल्या संस्कृतीत जमीन, माती, शेतकरी, बैल, नांगर, बैलगाडी अशा गोष्टींना ठिकठिकाणी महत्वाचे स्थान दिलेले आढळते. शंकरासारख्या बलाढ्य देवाचे वाहन म्हणजे नंदी ! नांगर हे बलरामाचे आयुध आहे.
शेती या अतिशय महत्वाच्या व्यवसायाचे दोन सर्वात महत्वाचे दुवे म्हणजे शेतकरी आणि त्याचे बैल ! बैल म्हणजे नांगरणी, पेरणी, वाहतूक, पाणी काढण्यासाठी रहाट किंवा मोट ओढणे अशा अतिशय महत्वाच्या कामांमधील सर्वात उपयुक्त प्राणी आहे ! खूप मेहेनतीची आणि कष्टाची कामे, कमालीच्या ताकतीने बिनबोभाट करणारा बैल हा अद्वितीय प्राणी आहे. शेतकरी आणि बैल या दोघांमधील नातेही मोठे विलक्षणच ! एक छान गोष्ट ऐकली होती. पूर्वी एखाद्या शेतकऱ्याला आपला बैल विकायचा असेल तर तो गिऱ्हाईक म्हणून एखादा पानतंबाखुचे व्यसन असलेला शेतकरी शोधत असे. म्हणजे काम करतांना जेव्हा तलफ येईल तेव्हा मालक स्वतः पान तंबाकू खायला थांबेल आणि तेव्हा तरी या बैलालाही थोडी विश्रांती मिळेल. कांही महिन्यांपूर्वी एका गावामध्ये २ बैलांचे अपघाती निधन झाले होते. त्यांचे फोटो आणि त्यांना श्रद्धांजली वाहणारे मोठमोठे फ्लेक्स पूर्ण गावभर लावलेले मला पाह्यला मिळाले. अलीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यावर एक खूप मनोज्ञ चित्र पाहायला मिळाले होते. एक बैल आपल्या धन्याच्या गळ्यात पडून विनवणी करतोय की धनी, आपण दोघे मिळून कितीही मेहेनत करू पण तुम्ही आत्महत्या नाही करायची !
माणूस आणि बैल यांचे हे असे नाते साजरे करण्याचा वर्षातील महत्वाचा सण म्हणजे बैल पोळा म्हणजेच पोळा किंवा बेंदूर ! श्रावणातील अमावास्येला मातृदिन, पिठोरी अमावस्या आणि बैल पोळा असे तीन सण साजरे केले जातात. या अमावास्येपर्यंत शेतीमधील पूर्वार्धातील सर्व मेहेनतीची कामे संपलेली असतात. यावेळी मातृदिनाच्या निमित्ताने आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. हजारो वर्षे जुन्या हिंदू धर्मातील हा Mothers’ Day ! पिठोरीच्या पूजेमध्ये स्वत:च्या मुलांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जाते. आणि पोळ्यामध्ये बैल या शेतीमित्राचे कौतुक असते. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये हा सण साजरा केला जातो. तेलंगणामध्ये ‘ पोळाला अमावस्या ‘ म्हणून तर गोधन नावाचा अशाच प्रकारचा सण उत्तरेत आणि मट्टू पोंगल हा सण दक्षिण भारतात साजरा होतो. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या ऋषीपंचमीला, बैलाच्या श्रमाचे काहीही न खाण्याची पद्धत आहे ती बैलाला आणखी एक दिवस आराम देण्याच्या दृष्टीनेच आहे.
आपल्या बहुतेक सणांचे निसर्गाशी खूप जवळचे नाते आहे. या दिवसांमध्ये पाऊस पडून मातीचा झालेला चिखल थोडासा घट्ट होऊ लागतो. त्यामुळे अशा मातीपासून मंगळागौर, नागपंचमीला नाग, जन्माष्टमीला गोपालकृष्ण, हरतालिका, गणपती यांच्या मूर्ती बनविल्या जातात, सुंदर सुंदर रंगांनी रंगविल्या जातात. बैलपोळ्याला चक्क बैलजोड्या बनवून त्यांची पूजा केली जाते. दिवाळीला किल्ले, मावळे बनविण्यापर्यंत हे मातीचे काम चालते. धार्मिक सणांच्या निमित्ताने खेडोपाडी अशा कलांना फार मोठे उत्तेजन मिळते.
अनेक ठिकाणी आदल्या दिवशी बैलांच्या नाकातील जुनी वेसण काढून टाकतात. या दिवशी सकाळी बैलाला अंगभर तेल हळद लावून गरम पाण्याने आंघोळ घालतात. त्याची शिंगे रंगवतात. त्याच्या दोन शिंगांमध्ये तोरणासारखी माळ बांधतात. कांही ठिकाणी तर चक्क बाशिंग बांधतात. गळ्यात मोठ्या घुंगुरांच्या, घंटांच्या, काचेच्या रंगीबेरंगी मोठ्या मण्यांच्या माळा, फुलांच्या माळा घालतात. पाठीवर झुलीसारखी रेशमी वस्त्रे घालतात. गोंडे- झालरी बांधतात. कपाळाला गंध लावतात. घरातील स्त्रिया या सजविलेल्या बैलाला ओवाळून औक्षण करतात. त्याला पुरणपोळ्या, करंज्या, बाजरीची खिचडी असे पदार्थ खायला घालतात. या दिवशी त्याच्याकडून कुठलेही काम करून घेतले जात नाही. संध्याकाळी सजवलेल्या सर्व बैलांची, ढोलकी, ताशा, लेझीम अशा पारंपरिक वाद्यांसह गावातून मिरवणूक काढली जाते. सर्वात वृद्ध बैल मिरवणुकीच्या अग्रभागी असतात.
आता जरी ट्रॅक्टर्स आले तरी हे नाते मात्र कांही कमी होत नाही. नव्या जमान्यानुसार पोळा साजरा करण्याच्या नव्या पद्धती अवतरल्या आहेत. सर्वात चांगल्या सजविलेल्या बैलांना पारितोषिके देणारे प्रायोजक अवतरले आहेत. शेतकऱ्यांना पोळ्याच्या शुभेच्छा देणारे मोठमोठे रंगीत फ्लेक्सबोर्ड लावले जात आहेत. त्याचबरोबर ” बैल बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा ” देणारे फ्लेक्सही दिसू लागले आहेत. कर्णकर्कश्य डीजे बोंबलू लागले आहेत. बैलांच्या जीवावर उठणाऱ्या झुंजी, जलिकट्टू सारख्या शर्यती, बैलजोड्यांच्या शर्यती, विदेशातील बुलफाइट्स या गोष्टी बैलांसाठी काहीच उपयोगाच्या नसतात. श्रीमंत मालक केवळ आपल्या
चैनीसाठी या मुक्या प्राण्यांच्या जीवावर उठतात. पण सर्वसाधारण शेतकरी मात्र बैलाला आपला कुटुंबीयच मानतो. कांही शेतकऱ्यांनी पोळ्याच्या सणाला आपल्या बैलांच्या पाठीवर, ” शेतकरी राजा, नका करू आत्महत्या ” ” मी सुखी तर प्रजा सुखी ” असे संदेश लिहून जनजागृती केली होती.
येत्या ३० ऑगस्ट २०१९ ला मातृदिन, पिठोरी अमावस्या, बैलपोळा आहे. शेती या पूर्ण वेगळ्या, महत्वाच्या आणि शहरी माणसांचा फारसा संबंध न येणाऱ्या विषयावरील माझ्याकडील कांही वस्तू ——
छायाचित्र क्रमांक १ — बैलांची शिंगे रंगविल्यावर त्यांच्या टोकांवर ही कलात्मक पितळी टोपणे खिळ्यांनी ठोकून बसवतात. यांना शिंगऱ्या किंवा शिंगोळ्या म्हणतात. यातील एका शिंगोळीचे वजन २०० ग्रॅम ते ५०० ग्रॅम इतके असते. यातील एका जोडीवर मोर आहेत तर दुसरीवर नुसतेच कळस आहेत.
छायाचित्र क्रमांक २ — ही शिंगोळ्यांची खूप सुंदर जोडी. याच्या टोकांवर बैलाचे तोंड आहे. त्याखाली घुंगूर लावलेले आहेत.
छायाचित्र क्रमांक ३ आणि ४ — बैलांच्या गळ्यातील पितळी घुंगुरांच्या माळा. एका माळेतील घुंगुर हे पितळी साखळीत बांधले आहेत आणि दुसऱ्यामध्ये ते चामड्याच्या पट्ट्यात बांधले आहेत.
छायाचित्र क्रमांक ५ — बैलांच्या मानेवर जेव्हां जोखड ( ज्यू ) ठेवले जाते. त्याच्या मध्यातून एका बाजूने, एक पट्टा बैलाच्या गळ्याखालून घेऊन, जोखडाच्या शेवटी असलेल्या मोठ्या छिद्रामध्ये असलेल्या खुंटीमध्ये अडकविला जातो. अशी पितळी कोरीव खुंटी या छायाचित्रात पाहायला मिळते. याच्या टोकांवरही बैलाचे तोंड आहे.
छायाचित्र क्रमांक ६ — शेतीमधील महत्वाचे अवजार, भगवान बलरामाचे आयुध म्हणजे नांगर ! या नांगराची छोटी प्रतिकृती शेवटच्या छायाचित्रात पाहता येईल.
माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]