महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,975

तोफ, एक प्रभावी हत्यार! भाग १

Views: 1866
17 Min Read

तोफ, एक प्रभावी हत्यार! भाग १ –

आपण  लहानपणापासून किल्ले,वाडे अशा प्रकारच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंमध्ये तोफा पाहत आलो आहोत. या तोफा पाहताना त्यांच्या बद्दल प्रचंड कुतूहल आपल्या मनात असतं. सध्याच्या काळात या तोफा किल्ल्यांवर बापुडवाण्या अवस्थेत पडलेल्या असल्या, तरी त्यांची त्या काळात असलेली दहशत आणि शान आठवली की अभिमानही  वाटतो आणि  त्यांची  आजची ही दयनीय अवस्था पाहिली की मन भरूनही येतं . युद्धामध्ये तोफांना  अनन्यसाधारण महत्व होते आणि आजच्या मिसाईल युगातही ते  तेवढेच टिकून आहे.तोफ.

आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील आपल्याला तोफांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. एखाद्या फर्ड्या वक्त्याला किंवा समोरच्याचा मुलाहिजा न बाळगता बोलणाऱ्या व्यक्तीला आपण , ‘मुलुखमैदान तोफ’ या नावाने संबोधतो , किंवा  निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाल्याची बातमी देखील, ” प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! ” अशी दिली जाते . एकूणच तोफ हे ( योग्य  वापर  करता आल्यास ) शत्रूच्या उरात धडकी भरवणारे प्रकरण आहे !

तोफांबद्दल लोकांच्या मनात  बरेच समज, गैरसमज आणि प्रश्न  असतात , उदा. तोफा कशा तयार करत असत ? , तोफांमध्ये तोफगोळे कशा प्रकारे भरले जात  व  ते कशा प्रकारे उडवले जात ?, तोफगोळा पडला की त्याचा स्फोट होत असे का ? , मध्ययुगीन तोफा साधारण किती अंतरापर्यंत मारा करू शकत ? इत्यादी.  आपण या लेखामध्ये या आणि अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.  चला तर मग, तोफेच्या शोधा पासून  सुरु करूया !

——-:  तोफेचा शोध :———

तोफ आणि तिला लागणारी बंदुकीची दारू यांचा शोध कुणी लावला याबद्दल विद्वान लोकांमध्ये बरेच मतभेद आहेत. अनेक विद्वान लेखकांच्या मते तोफेच्या शोधाचे श्रेय ‘बर्थोलडस श्वारझ’ नावाच्या एका जर्मन संन्याशाकडे जाते. या संन्याशाला १३२० साली झालेल्या  एका अपघातातूनच  तोफेची कल्पना  सुचली असे १८व्या शतकात लिहिलेल्या एका पुस्तकात म्हटले आहे. या  संन्याशाने  एके दिवशी सोरा  (saltpetre) व गंधकाचे मिश्रण एका उखळामध्ये घालून, त्या उखळाच्या तोंडावर झाकण म्हणून  एक दगड ठेऊन दिला होता. काही कारणाने त्या उखळातील मिश्रणाला आग लागली आणि त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे उखळावर ठेवलेला दगड दूरवर फेकला गेला व या घटनेतूनच या संन्याशाला तोफेची कल्पना सुचली असे या कथेत म्हटले आहे. परंतु ही कथा या संन्याशाला समकालीन असलेल्या कोणत्याही कागदपत्रात अथवा पुस्तकात दिलेली नसून, ती या संन्याशाच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी म्हणजेच १८व्या शतकात लिहिलेल्या एका पुस्तकात आली असल्याने, या घटनेच्या विश्वासार्हते बद्दल एक मोठे प्रश्न चिन्ह उभे राहते.

काही लोकांच्या मतानुसार बंदुकीच्या दारूचा शोध चीन मध्ये लागला व  इ.स. १२६० मध्ये बंदुकीच्या दारूचा पहिला उल्लेख झालेला आढळतो. चीन मधील आद्य तोफांचा काळ इ.स १३५६ पासून सुरु होतो असे मानले जाते , परंतु युरोपात त्या काळाच्या आधीपासूनच तोफा अस्तित्वात होत्या असे दिसते ; कारण १३२४ साली झालेल्या मेत्झच्या (Metz )  वेढ्यात तोफा वापरल्याचे उल्लेख आहेत व इंग्रजांनी १३४६ मध्ये क्रेसी येथे देखील  तोफा वापरल्याचे आढळते. १३२६ पासूनच्या काही कागदपत्रांमध्ये  तोफांचा उल्लेख आढळतो. १३४० मध्ये झालेल्या स्ल्यूसच्या आरमारी युद्धात (Battle Of Sluys) इंग्रजांनी तोफांचा आणि इतर अग्निशस्त्रांचा वापर केल्याचे उल्लेख आहेत. इंग्लंडचा राजा पाचवा हेनरी याने हार्फल्युर या फ्रान्स मधील शहरावर १४१५ साली ४० पाऊंडर, ३० पाऊंडर आणि १५ पाऊंडर तोफांचा मारा केल्याचे उल्लेख आहेत. याच ४०-३०-१५ या आकड्यांचा आधारे टेनिस मधील ४०-३०-१५ ही गुणांकनाची पद्धत पडली असे सी. नॉर्थकोट पार्किन्सन हा लेखक आपल्या ‘ईस्ट अँड वेस्ट’ या प्रसिद्ध पुस्तकात लिहितो. अशा अनेक मतप्रवाहांमुळे तोफेचा शोध नक्की कोणी लावला हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे, परंतु १४ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून तोफांचा वापर होतो आहे असे म्हणता येईल.

हिंदुस्थानात  तोफा आणणयाचे श्रेय बाबाराला दिले जाते , परंतु बाबर येथे येण्यापूर्वी दक्षिणेतील बहमनी सुलतान व गुजराथ मधील सुलतानांनी तोफा वापरल्याचे उल्लेख आढळतात .

——-: तोफा  तयार करण्याच्या विविध पद्धती :———

तोफा तयार करण्यासाठी बहुतकरून लोखंड, पितळ किंवा पंचधातूचा  वापर होत असे. चामड्यापासून  व  लाकडाच्या ओंडक्यांपासून  देखील  तोफा तयार  केल्याची उदाहरणे इतिहासात सापडतात. औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमेत, वेढ्यात अडकलेल्या एका  गावाने अशा लाकडी तोफांचा वापर केल्याची आख्यायिका आहे. या गावाकडे औरंगजेबाच्या सैन्यापासून स्वतःचा  बचाव करण्यासाठी तोफा नव्हत्या ; परंतु त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात लाकूड उपलब्ध होते, त्यामुळे कुणीतरी शक्कल लढवून या लाकडाच्या ओंडक्यांपासून तोफा तयार केल्या व त्या औरंगजेबाच्या सैन्याविरुद्ध वापरल्या असे सांगतात. परंतु या कथेला समकालीन पुरावा  नसल्यामुळे ही कथा म्हणजे केवळ एक दंतकथा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पाश्चात्यांच्या इतिहासात अशा लाकडी तोफा वापरल्याची उदाहरणे सापडतात. उदाहरणार्थ, आठव्या हेनरीने  १५४४ मध्ये बुलोन येथील वेढ्यात एक मोठी लाकडी तोफ वापरल्याची नोंद आहे. पॅरिस मधील आर्टिलरी म्युझियम मध्ये कोचीन चायना येथील एक लाकडी तोफ पहाण्यासाठी ठेवलेली आहे.

बहुतांश  तोफा , तयार केलेल्या  साच्यामध्ये वितळलेला धातू ओतून तयार केल्या जात असत, परंतु  लोखंडी  तोफा तयार करण्यात एक मुख्य अडथळा असे  , तो म्हणजे लोखंड फक्त अतिउच्च तापमानामध्येच वितळलेल्या स्थितीत राहाते व हे तापमान थोडे जरी खाली आले तरी हा  वितळलेल्या लोखंडाचा रस साच्यामध्ये सर्वत्र एकसारखा पोहोचत नाही व यामुळे तोफेच्या नळीमध्ये  छिद्रे ( pores ) राहतात व अशी तोफ वापरण्यास कुचकामी ठरते. पितळे  किंवा पंचधातू , लोखंडाच्या तुलनेने जास्त काळ पातळ राहात असल्यामुळे लोखंडाऐवजी पितळी, ब्रॉंझ  किंवा पंचधातूच्या तोफा करण्याकडेही कल होता, परंतु कालांतराने युरोपियन लोकांनी अशी छिद्रे येऊ न देता लोखंडी तोफा ओतण्याचे तंत्र आत्मसात केले होते. इंग्लंड मध्ये तोफा तयार करताना, तोफेच्या नळीचा मधला भाग पोकळ ठेऊन बाजूने वितळेला धातू ओतून तोफा तयार करीत. युरोप खंडातील अन्य देशात मात्र साच्यामध्ये  वितळलेला धातू ओतून तयार केलेल्या भरीव नळीला मागाहून छिद्र पाडून ती पोकळ केली  जात असे.

भारतीय लोकांनी मात्र लोखंडी तोफा तयार करण्याची एक निराळीच पद्धत शोधून काढली होती. मध्ययुगीन भारतातील लोहारांना लोखंड अतिउच्च तपमानाला वितळवून ते साच्यात ओतून , मध्ये छिद्रे ( pores )  येऊ ना देता तोफा तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत झालेले  नव्हते, त्यामुळे त्यांनी लोखंडी तोफा तयार करण्यासाठी एक वेगळीच  शक्कल लढवली, ती म्हणजे लोखंडाच्या बांगडी सारख्या मोठ्या काड्या एकाला एक जोडून त्यातून तोफेची नळी तयार करणे ! अशा प्रकारे कडी एकमेकाला जोडून तयार केलेल्या तोफेला Forge Welded Cannon असे म्हणतात. अशा तोफा नरवर, मुशिराबाद, डाक्का (बांगलादेश), विष्णुपूर , विजापूर , गुलबर्गा आणि तंजावर येथे आढळतात. सिद्द्यांच्या मुरुड जंजिरा किल्ल्यावरील ‘कलाल बांगडी’ ही तोफ देखील याच पद्धतीने तयार केलेली आहे.

अशा  तोफा तयार करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे होती:-

तोफ तयार करणारा कारागीर प्रथम तोफेच्या लांबी एवढा लाकडाचा लंबगोल घेत असे. या लंबगोलाचा व्यास, तोफेच्या नळीचा व्यास जेवढा ठेवायचा असेल तेवढा असे.  मग, या लाकडी लंबगोलाभोवती लोखंडी पट्ट्या जवळ-जवळ बसवून, त्या तापवून आणि ठोकून एकमेकांना जोडल्या जात . या नंतर, लंबगोलावर बसवलेल्या पट्ट्यांमुळे  तयार झालेल्या वर्तुळाच्या व्यासापेक्षा किंचित कमी व्यास असलेल्या, बांगडी सारख्या अनेक कड्या तापवून , या पट्टयांवर ठोकून बसवल्या जात असत. या कड्या  थंड झाल्यावर आकुंचन पाऊन आतल्या लोखंडी पट्ट्यांच्या सांगाड्यावर घट्ट बसत असत. काही वेळा या बांगडी सारख्या कड्या पट्टयांच्या सांगाड्यावर बसवण्यापूर्वी , या सांगाड्यावर वितळवलेले शिसे ओतले जात असे; असे केल्याने  दोन लोखंडी पट्ट्यांमध्ये असलेली बारकीशी फटही बंद होत असे व तोफ उडवल्यावर, आत दारूचा स्फोट झाल्यानंतर तयार होणारा  वायू मध्येच निसटून जात नसे.

——: तोफांचे कॅलिबर  :——–

तोफेचे कॅलिबर म्हणजेच  तोफेच्या  नळीच्या आतल्या बाजूचा व्यास किंवा  तोफेतून उडणाऱ्या गोळ्याचा व्यास .  सर्वसाधारणपणे हा  व्यास इंचांमध्ये मोजला जातो . काही ठिकाणी  तो मिलीमीटर मध्येही  मोजला जातो, उदाहरणार्थ  १५ इंच कॅलिबरची तोफ याचा अर्थ, त्या तोफेच्या नळीच्या आतल्या बाजूचा व्यास १५ इंच एवढा असतो. इंग्रज लोक तोफेचे कॅलिबर, तोफेमधून उडवल्या जाणाऱ्या गोळ्याच्या पौंडातील  वजनानुसारही मोजत  असत. या परिमाणानुसार  ३ पाउंडर तोफ म्हणजे ज्या तोफेतून ३ पौंड एवढ्या वजनाचा गोळा फेकला जातो अशी तोफ. अशा प्रकारे ६, ९, १२, १८, २४, ३२ आणि ४२ पाउंडर अशा वेगवेगळ्या परिमाणाच्या तोफा असतात. गोळ्याच्या पौंडातील वजनानुसार तोफेच्या नळीच्या आतल्या बाजूचा व्यास किती असावा हे देखील ठरलेले आहे. उदाहरणार्थ :-

३ पौंडर तोफ –  तोफेच्या नळीचा आतला व्यास = २.९ इंच , तोफगोळ्याचा व्यास २.८४ इंच

४ पौंडर तोफ –  तोफेच्या नळीचा आतला व्यास = ३.२ इंच , तोफगोळ्याचा व्यास ३.१२ इंच

६ पौंडर तोफ –  तोफेच्या नळीचा आतला व्यास = ३.६७ इंच , तोफगोळ्याचा व्यास ३.५८  इंच

या प्रमाणे.

तोफेचे कॅलिबर जेवढे जास्त, तेवढा  तिच्यातून उडणाऱ्या गोळ्याचा आकार मोठा.

——-: तोफांचा पल्ला :———

तोफेचा पल्ला तिच्या नळीच्या लांबीवर ठरतो. याचे कारण तोफ उडवल्यावर नळीत भरलेल्या दारूचा स्फोट होऊन जो वायू तयार होतो, तो तोफेमध्ये भरलेल्या तोफ गोळ्याला जोराने बाहेर ढकलत असतो, त्यामुळे जो पर्यंत हा तोफगोळा तोफेच्या नळीत असतो तितका काळ हा वायू त्याला मागून ढकलत असतो. तोफेची नळी जेवढी लांब असेल तेवढा जास्त काळ या वायूचा धक्का गोळ्याला मिळत राहतो. एकदा का  गोळा तोफेच्या नळी बाहेर पडला की त्यावर गुरुत्वाकर्षण, वारा  हे  घटक काम करू लागतात व त्याला मिळालेल्या धक्क्याचा  (thrust) जोर कमी कमी होऊ लागतो. मध्ययुगीन तोफा स्मूथ बोर (smooth bore ) म्हणजेच आतून गुळगुळीत असल्याने तोफगोळा उडवल्यावर त्याला कोणतीही  जास्तीची गती मिळत नसे , त्यामुळे त्यांचा पल्ला देखील मर्यादितच राहात असे . मध्ययुगीन तोफांचा पल्ला  जास्तीत जास्त एक मैल  (१. ६ किलोमीटर ) एवढाच असतो.

——–: तोफगोळ्यांचे प्रकार :——–

कुठल्याही तोफेचा गोळा एखाद्या ठिकाणी पडला की तो फुटतो असाच  सर्वसाधारणपणे लोकांचा समज असतो. दूरदर्शनवरील  ऐतिहासिक मालिका व सिनेमे  यात दाखवल्या जाणाऱ्या तोफगोळ्यांच्या स्फोटाच्या दृष्टयांमुळे हा गैरसमज अधिक दृढ होतो ! आधुनिक काळातील सर्वच तोफगोळे हे स्फोटक असतात हे  खरे आहे , परंतु मध्ययुगीन काळातील बहुतांश तोफगोळे हे स्फोटक नसत. त्याकाळी तोफेच्या गोळ्याचा अचूक वेळी (लक्षयावर पडल्यानंतर ) स्फोट घडवून आणण्याचे तंत्रज्ञान तितकेसे  विकसित झालेले नसल्यामुळे, असे स्फोटक गोळे डागण्याचा प्रश्नच नव्हता.  असे  स्फोटक गोळे अजिबातच  नव्हते असे नव्हे ; थोड्याफार प्रमाणात स्फोटक गोळे होते , परंतु हे गोळे डागण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या तोफा वापरल्या जात, त्यांना मॉर्टर किंवा उखळी तोफा असे म्हणत असत. या उखळी तोफांविषयी सविस्तर माहिती आपण पुढे घेऊच.

मध्ययुगीन तोफांचा मुख्य उद्देश, तोफगोळ्यांच्या प्रहाराने समोरच्या शत्रूला मारणे  किंवा जायबंदी करणे अथवा किल्ल्याच्या  भिंतींना खिंडारे पाडून आपल्या सैन्याला किल्ल्यात प्रवेश करण्याचा मार्ग सुकर करणे हा असे. शत्रूवर डागलेला तोफगोळा टप्पे खात शत्रूच्या सैन्यात शिरे व आपल्या प्रचंड वेगाच्या व वजनाच्या साह्याने कुणाचे मुंडके , कोणाचा हात तर कोणाचा पाय आपल्यासोबत घेऊन जात असे ! अशा पद्धतीने एका तोफगोळ्यामुळे शत्रू सैन्यातले अनेक जण गारद अथवा जायबंदी होत असत. अशा प्रकारे शत्रुसैन्यात एकदा घबराट पसरली  व शत्रूचे सैन्य विस्कळीत झाले की मागून येणाऱ्या घोडदळाचा व पायदळाचे काम सोपे होत असे.

तोफगोळ्यांचेही वेगवेगळे प्रकार असत, ते असे :-

१) राऊंड शॉट किंवा सॉलिड शॉट :-  गोलाकार असलेला हा सर्वसाधारण तोफगोळा म्हणजे लोखंडाचा भरीव गोळा असे. काही तोफगोळे दगडी देखील असत.

२) चेन शॉट किंवा स्प्लिट शॉट :- या प्रकारात दोन गोळे एका साखळीच्या साह्याने एकमेकाला जोडलेले असत. यांचा उपयोग प्रामुख्याने आरमारी युद्धात होत असे. जहाजांची शिडे व डोलकाठ्या पाडायला याचा उपयोग करत असत.

३) कॅनिस्टर शॉट :- या प्रकारात एका पत्र्याच्या डब्यात बंदुकीच्या शिश्याच्या गोळ्या भरून, या डब्याचा तोफगोळ्यासारखा वापर केला जाई . तोफ उडवल्यानंतर हा पत्र्याचा डबा फुटून त्याच्यातील गोळ्या शॉटगन प्रमाणे शत्रूच्या अंगावर उडत असत.

४) ग्रेप शॉट :- हा  प्रकार कॅनिस्टर शॉट सारखाच असे, परंतु पत्र्याच्या डब्या ऐवजी द्राक्षासारख्या टपोऱ्या गोळ्या कॅनव्हास च्या कापडात गुंडाळून उडवल्या जात.

५) हीटेड किंवा हॉट शॉट :- या प्रकारात लोखंडी गोळा तापवून, तो तप्त असतानाच तोफेतून उडवला जाई . अशा तोफगोळ्यांचा वापर प्रामुख्याने शत्रूकडील ज्वालाग्रही पदार्थ किंवा दारूगोळ्याची कोठारे उडवून देण्यासाठी होत असे.

६) शेल किंवा कुलपी गोळा :- हा स्फोटक गोळा असे व तो लक्षयावर पडल्यानंतर त्याच्यात भरलेल्या दारूचा स्फोट होऊन मोठे नुकसान होत असे . वर नमूद केल्याप्रमाणे असे गोळे फेकण्यासाठी मध्ययुगीन काळात उखळी तोफा किंवा मॉर्टरचा उपयोग केला जात असे.

——-: मॉर्टर किंवा उखळी तोफा :——–

तोफांची निर्मिती झाली तेव्हा या उपकरणाच्या साह्याने छोट्या व मध्यम आकारचे गोळे लक्षावर सरळ रेषेत वेगाने मारता येतात, हे माणसाच्या लक्षात आले. परंतु अशा तोफेतून जड गोळे उडवल्यास, ते तोफेतून बाहेर पडल्यानंतर गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीकडे खेचले जाऊन, लक्षयाचा भेद करण्याऐवजी लक्ष्याच्या पुढ्यात जाऊन पडतात हे सिद्ध झाले. या जड  तोफगोळ्यांनी लक्षाचा अचूक वेध घ्यावा म्हणून तोफेचा कोन थोडा बदलला तर असे गोळे वापरता येतात हे ही कळले . परंतु अशा प्रकारे तोफेचा कोन बदलल्यामुळे तोफगोळा सरळ रेषेत जाण्याऐवजी आकाशातून वर्तुळाकार मार्गे ( parabola )  लक्षयावर जाऊन आदळतो, त्यामुळे त्याची परिणामकारकता कमी होतेच ; शिवाय तोफेचा कोन चुकल्यास हा गोळा लक्ष्य सोडून भलतीकडेच पडण्याचीही शक्यता असते. साध्या तोफेच्या या मर्यादांवर मात करण्यासाठी उखळी तोफांची निर्मिती झाली.

मॉर्टर किंवा उखळी तोफेची नळी आखूड व  तोंड मोठे असते, त्यामुळे या तोफांचे बोर (Bore) किंवा कॅलिबर सुद्धा मोठे असते . ही तोफ एखाद्या उखळासारखी किंवा एखाद्या मोठ्या भांड्यासारखी दिसे, त्यामुळे मुघल लोक या तोफेला ‘डेग’ (म्हणजे मोठे भांडे ) म्हणत असत .  तोफेत मोठ्या प्रमाणावर भरलेल्या दारूच्या स्फोटाने तोफेचे नुकसान होऊ नये म्हणून या तोफेच्या कडा जाड केलेल्या असतात. मॉर्टरचा शोध लागल्यामुळे मोठे व जड गोळे उडवायची सोय तर झालीच, शिवाय आणखी एक फायदा झाला; तो म्हणजे आता मॉर्टर मध्ये स्फोटक गोळे पेटवून ते उडवता येऊ लागले ! असे असले तरी  या स्फोटक गोळ्यांचा नेमक्या वेळी स्फोट करण्याचे तंत्रज्ञान मात्र अजून विकसित व्ह्यायचे होते, त्यामुळे  वेळेचे गणित साधले नाही तर  बऱ्याचदा लक्ष्याच्या जवळ पोहोचण्या अगोदर आकाशातच या गोळ्यांचा  स्फोट होई .

बहुतांश मध्ययुगीन तोफांप्रमाणे मॉर्टर या प्रकारच्या तोफा देखील muzzle loading म्हणजेच तोंडाकडून गोळा भरून उडवल्या जात असत. तोफेमध्ये दारू भरून , तिच्या मागच्या बाजूला  असलेल्या एका छोट्या छिद्रामध्ये वात लावून या तोफा उडवल्या जात. मॉर्टरचा वापर प्रामुख्याने वेढयांमध्ये होत असे. किल्ल्यांच्या भिंती व दरवाजे साध्या तोफांना दाद देईनासे झाले तर या मॉर्टरचा वापर करून किल्ल्याच्या आतमध्ये असलेल्या  दारुकोठार किंवा तत्सम संवेदनाशील लक्षांचा भेद  करणे सहज शक्य होई.

इ.स १६६० च्या  पन्हाळगडाच्या वेढ्यात हेनरी रेव्हिंग्टनने पन्हाळगडावर डागलेल्या तोफा या अशा मॉर्टर प्रकारातल्या होत्या. त्याने या तोफा स्वखर्चाने हिंदुस्थानात विक्रीसाठी आणल्या होत्या व यातल्या  काही तोफा तो सिद्दी जौहरला विकणार होता, परंतु तत्पूर्वी या तोफा कशा चालतात याचे प्रात्यक्षिक किंवा ‘डेमो’ सिद्दी जौहरला दाखवावा या उद्देशाने त्याने या तोफा पन्हाळगडावर डागल्या होत्या !

——–: उंटावरच्या तोफा किंवा जेजाला :———-

हातघाईच्या लढाईत शत्रूवर जवळून डागता याव्यात या साठी छोट्या आकाराच्या तोफा उंटावर बसवत असत, त्यांना जेजाला किंवा  शुतरनाला असे म्हणत . हत्तीवरील तोफेला फिलनाळ असे म्हणत. या तोफांचे कॅलिबर अगदी छोटे म्हणजे एक किंवा दीड इंच एवढेच असे आणि त्या लांबीलाही साडे तीन फूट एवढ्याच असत. या  तोफा इंग्रजी Y आकाराच्या स्टॅण्डवर बसवलेल्या असल्यामुळे त्यांचे तोंड हवे तसे फिरवता येत असे त्यामुळे त्यांना swivel guns असे म्हणत. या तोफांमधून विशेषकरून वर नमूद केलेल्या ग्रेप शॉट हा दारूगोळ्याचा प्रकार उडवला जात असे.

********************* भाग पहिला समाप्त ************************

संदर्भ :-

१) East and West – C.Northcote Parkinson
२) A history of firearms from earliest times to 1914, W.Y. Carman (https://archive.org/details/in.gov.ignca.4174)
३) http://www.civilwarartillery.com/shottables.htm
४) http://citeseerx.ist.psu.edu/viewdoc/download…
५) http://www.academia.edu/…/Forge_Welded_Iron_Cannon_in…
६) English Records On Shivaji
७)https://www.youtube.com/watch?v=NNMF6BDL8nk

चित्रें :-

१) मॉर्टर किंवा उखळी तोफ.
२) मुरुड जंजिरा येथील कलाल बांगडी तोफ (Forge Welded Cannon )

लेखक :- सत्येन सुभाष वेलणकर, पुणे.

टीप :- हा लेख प्रामुख्याने मध्ययुगीन तोफांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिण्यात आला आहे.

Leave a Comment