महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,082

तोफ भाग ३ | एक प्रभावी हत्यार भाग ३

By Discover Maharashtra Views: 2067 20 Min Read

तोफ भाग ३ | एक प्रभावी हत्यार भाग ३ –

तोफेचा योग्य वापर करता आल्यास ते किती प्रभावी शस्त्र ठरू शकते हे आपण मागील दोन भागांमधून (भाग १, भाग २) पाहिले. या प्रभावी शस्त्रांचा अनुभव हिंदुस्थानी लोकांना आल्यानंतर त्यांनी त्याच्यातून काही धडा घेतला होता का? हिंदुस्थानी आणि विशेष करून मराठयांचा तोफखाना कसा होता ? तोफखाना असूनही मराठे, इंग्रजांकडून  युद्धात का हरले ? हे या अंतिम भागात तोफ भाग ३ आपण पाहणार आहोत:-

———–: बाबराच्या तोफ खाना- हिंदुस्थानात तोफांचे आगमन    :————–

२१ एप्रिल १५२६ मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या रणसंग्रामात, उझबेकिस्तानातील फर्गनाचा बादशहा जहिरउद्दीन मुहम्मद बाबर याने दिल्लीचा शासक इब्राहिम लोदी याचा पराभव करून हिंदुस्थानात मुघल रियासतीचा पाया घातला. या युद्धात बाबराने वापरलेल्या तोफांच्या आवाजामुळे लोदीच्या सैन्यातील  हत्ती बिथरले व आपल्याच सैन्याला पायदळी तुडवीत सैरावैरा धावू लागले. लोदीच्या सैन्यात पसरलेल्या या घबराटीचा फायदा बाबराला मिळाला व हिंदुस्थानचा राजमुकुट त्याच्या मस्तकावर विराजमान झाला!  खरं म्हणजे लोदीचे सैन्य बाबरच्या किमान ६-७ पट मोठे होते, परंतु बाबाराकडे असलेल्या तोफांनी या मोठ्या सैन्याचा अवसानघात केला !

बाबराच्या सैन्यात वेगळं काय होतं ? पहिली गोष्ट म्हणजे नियोजन आणि दुसरं म्हणजे हव्या त्या वेळी , हव्या त्या ठिकाणी पटकन नेऊन मारा करता येणाऱ्या तोफा. बाबराने या युद्धात आपल्या सैन्याच्या अनेक तुकड्या केल्या होत्या व या तुकड्या त्याने डावीकडे , उजवीकडे आणि मध्यभागी उभ्या केल्या होत्या. डाव्या आणि उजव्या बाजूच्या तुकड्यांचे पुन्हा आघाडीची व पिछाडीची , अशा दोन  तुकड्यांमध्ये विभाजन केले होते. सैन्याचे असे तुकड्यांमध्ये विभाजन केल्यामुळे, या छोट्या सैन्याला शत्रूला सर्व बाजुंनी घेरणे सहज शक्य झाले.  मधल्या तुकडीच्या समोर बाबराने तोफगाड्यावर चढवलेल्या तोफा, शत्रूकडे तोंड करून ठेवल्या व या तोफगाड्यांसमोर त्याने दोरीच्या साह्याने एकमेकांना जोडलेल्या बैलगाडया उभ्या केल्या. बैलगाड्यांच्या मागे असल्यामुळे, शत्रूसैन्याकडून तोफांना नुकसान होण्याचे भय ना बाळगता त्यांचा मारा शत्रूवर करता आला; आणि या तोफा तोफगाड्यावर असल्यामुळे त्या हव्या तेव्हा हव्या त्या ठिकाणी नेता येत असत.

———–: मुघलांचा तोफखाना – अजस्त्र तोफा, काम कमी आवाज फार !  :————–

मुघलांना अगडबंब तोफांची अतिशय  आवड होती; परंतु अशा अजस्त्र तोफा वापरल्या जाण्यापेक्षा शोभेच्या वस्तू बनून राहात असत , फिट्झक्लॅरेन्स नावाचा एक इंग्रज अधिकारी म्हणतो, ” मुघलांच्या या अजस्त्र तोफांच्या वेडामागे, युरोपियनांपेक्षा आकाराने मोठ्या तोफा तयार करण्याची ईर्षा होती.” अशा मोठ्या तोफा तयार करण्याच्या इर्षेपायी हे लोक (मुघल) अवाढव्य आणि लांबलचक तोफा तयार करत असत, परंतु अशा तोफांचा आवाजच  त्यांच्या भेदक शक्तीहुन मोठा असे. या तोफा दिवसातून अनेक वेळा उडवताही येत नसत आणि उडवल्याच तर बहुतेक वेळा त्या फुटून, तोफ उडवणारी तुकडीच गारद होत असे. तोफांची नावं मात्र राणा भीमदेवी थाटाची  असायची, उदाहरणार्थ :- ‘गाझी खान’,’शेर दहान’,’धुमधाम’, ‘बूर्जशीकन’ वगैरे वगैरे.

असल्या या अगडबंब तोफा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून न्यायच्या म्हणजे मोठे कर्मकठीण काम असे. फ्रेंच प्रवासी बर्नियर लिहितो,

“औरंगजेब बादशहा झाला तेव्हा सुरवातीच्या काळात तो बाहेर पडत असते तेव्हा त्याच्या सोबत सुमारे सत्तर अवजड तोफा असत. बहुतकरून या तोफा पितळी असत. औरंगजेब जेव्हा मुख्य रस्ता सोडून शिकारीसाठी किंवा नदीजवळ मुक्काम करण्यासाठी आडरस्त्याला जाई, तेव्हा मात्र या अजस्त्र तोफा व उंटावरच्या तोफा देखील  त्याच्या सोबत  जात नसत कारण  या अजस्त्र तोफा अवघड आणि घाटाचे रस्ते पार करूच शकत नसत ; शिवाय नद्यांवर असलेले होड्यांचे पूल पार करणे देखील त्यांना शक्य होत नसे. या सत्तर तोफांमधील काही तोफा तर इतक्या अजस्त्र होत्या की यातील एक तोफ ओढायला बैलांच्या वीस जोड्या लागत असत; आणि रस्ता थोडा चढाचा असेल  तर  तोफगाडे मागून ढकलण्यासाठी मागच्या बाजूने हत्ती देखील लावावे लागत”

अशा या अजस्त्र तोफांमुळे सैन्याच्या हालचालींचा वेग फारच मंदावत असे, त्यामुळे अनेकदा ही बोजड प्रकरणं मागे ठेऊनच सैन्याला पुढील मार्गक्रमण करणे भाग पडे. याच कारणामुळे औरंगजेबाचा मुलगा आझमशहा १७०७ साली जेव्हा अहमदनगरहून ढोलपूरकडे निघाला, तेव्हा त्याला  आपल्याजवळील अवजड तोफा वाटेत ठिकठिकाणी सोडून द्याव्या लागल्या आणि शेवटी तो जाजाऊ येथील रणांगणात पोहोचला तेव्हा त्याच्याजवळ एकही तोफ उरली नव्हती !   याच प्रकारे १७१२ साली बहादुरशहा (औरंगजेबा नंतरचा बादशहा) मेल्यानंतर त्याच्या मुलांमध्ये , मुघल गादीसाठी सुरु झालेल्या स्पर्धेदरम्यान लाहोरच्या किल्ल्यातून तीन अजस्त्र तोफा हलवण्यात आल्या; यातील प्रत्येक तोफेला ओढण्यासाठी २५० बैल आणि ५-६ हत्ती लागले होते. या  सर्व लवाजम्याला  फक्त ३ ते ४ मैलावर असलेल्या छावणीत जायचे होते, मात्र या अजस्त्र तोफांमुळे हे अंतर कापायला त्यांना १० दिवस लागले !(तोफ भाग ३)

मुघलांकडे हलक्या, उंटावरच्या तोफा (जंबुरक) ही  असत परंतु एकूणच या शास्त्राबद्दल असलेली उदासीनता असल्यामुळे त्यात काही नवे अविष्कार आणि सुधारणा घडवून आणण्याची शक्यताच नव्हती. युरोपियनांच्या तोफा मात्र काळाबरोबर सुधारत गेल्या.

———:- मराठ्यांचा तोफखाना -:———–

मराठे म्हणजे डोंगर दऱ्यात राहणारी, सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली माणसें. शिवछत्रपतींनी या माणसांचा  काटकपणा, साहस, शौर्य इत्यादी गुण ओळखले व या प्रदेशाला व माणसांना साजेसा  असा  छापेमार युद्धाचा  म्हणजेच गनिमी काव्याचा अवलंब करून अपार यश मिळवले. शिवछत्रपतींच्या काळी मराठे लोक खुल्या मैदानांवरची युद्धे फारशी करत नसल्यामुळे, तोफांशी त्यांचा फारसा संबंध यायचा संभव नव्हता. घोडदळ हाच मराठी सैन्याचा प्राण असे. गडांवर ज्या काही पाच-दहा तोफा असत असतील तेवढ्याच. परंतु अग्नीशस्त्रांचा शोध लागल्या नंतर, या शस्त्रांचा वापर करणाऱ्या प्रबळ शत्रूपुढे आपल्या ढाल-तरवारी फार काळ चालणार नाहीत याचा अंदाज शिवछत्रपतींचे तीर्थरूप शहाजी महाराज आणि खुद्द शिवछत्रपतींना देखील आला होता. खास करून हेनरी रेव्हिंग्टनने पन्हाळ्यावर मॉर्टर डागल्या तेव्हा या प्रभावी शस्त्रांची उणीव शिवाजी महाराजांना खासच जाणवली असेल. शहाजी महाराज देखील युरोपियन लोकांकडून बंदुका, तोफा व दारुगोळा खरेदी करत व पुढे शिवाजी महाराजांनी पोर्तुगीझ व इतर फिरंग्यांकडून ही शस्त्र खरेदी करण्याची परंपरा चालू ठेवली.(तोफ भाग ३

परंतु येथे असा प्रश्न पडतो की शहाजी, शिवाजी व त्यांच्या नंतर होऊन गेलेल्या मराठी राज्याच्या प्रमुखांना  या अग्नीशस्त्रांसाठी युरोपियन लोकांवर का अवलंबून राहावे लागत होते ? त्यांनी स्वतःच या शस्त्रांची निर्मिती का नाही केली ?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्या काळातील समाजाची मानसिकता समजून घेणे फार आवश्यक आहे. अलीकडे काही लोक “संतांनी लोकांच्या मनाची मशागत करून स्वराज्य निर्मितीसाठी पार्श्वभूमी तयार केली व नंतर शिवाजी महाराजांनी त्या भूमीत स्वराज्याचे बी पेरले” असल्या बाष्कळ गप्पा करून, अध्यात्मापुढे शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाच्या कर्तुत्वाला खुजं करण्याचा प्रयत्न करतात. असल्या लोकांना खरं म्हणजे अध्यात्म आणि इतिहास या दोन्ही गोष्टींमधलं ओ की ठो कळत नाही. पण अशा या लोकांना इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी शहाजी महाराजांचे चरित्र असलेल्या ‘राधामाधवविलासचंपू’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेतून सडेतोड उत्तर दिले आहे. राजवाड्यांची भाषा काही जणांना कटू वाटेल व रुचणार नाही, पण राजवाडे कुठल्याही महापुरुषावर टीका करत नसून, ते फक्त त्या काळच्या समाजाची मानसिकता काय होती हे आपल्याला सांगत आहेत हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे . राजवाडे म्हणतात :-

“येथे एक अनुषंगिक प्रश्न असा निघतो की, टोपीवाल्यांकडून कारागीर बंदुका, तोफा व दारुगोळा जो शहाजी घेई तो त्याने महाराष्ट्रात त्या बरहुकूम बनविण्याची व्यवस्था का केली नाही? अथवा शहाजीचा मुलगा शिवाजी त्याने तरी का केली नाही ? किंबहुना बाजीराव बल्लाळ, बाळाजी बाजीराव व नाना फडणवीस ह्या गृहस्थांनी का केली नाही ? उत्तम हत्याराकरिता दुसऱ्यांचे मिंधे राहण्याची लज्जा त्यांना कशी वाटली नाही? प्रश्नाला उत्तर एकच आहे व ते अगदी साधे आहे. ते हे की, उत्तम, रेखीव  व नेमके हत्यार बनविण्याची कला पैदा होण्यास शास्त्रीय ज्ञानाची जी पूर्वतयारी राष्ट्रात व्हावी लागत्ये ती त्या काली महाराष्ट्रात नव्हती. शहाजीच्या हयातीत युरोपात डकार्ट, बेकन इत्यादी विचारवंत सृष्ट पदार्थसंशोधनकार्याचे वाली जारीने पंचमहाभूतांचा शोध लावण्यास लोकांना प्रोत्साहित करीत होते . आणि आपल्या इकडे एकनाथ, तुकाराम, दासोपंत, निपटनिरंजन इत्यादी संत पंचमहाभूतांना मारून ब्रह्मसाक्षात्कारात राष्ट्राला नेऊन मुक्त करण्याच्या खटपटीत होते. अशांना स्क्रू, टाचणी, बंदूक व तोफ यांचा विचार वमनप्राय वाटल्यास त्यात नवल कसचे?”

अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापासून, आजूबाजूला अनन्वित अत्याचार होत असूनही ‘ब्रह्मसमाधीत’ तल्लीन झालेल्या महाराष्ट्राला गदागदा हलवून जागं करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं! पण उण्यापुऱ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकटा शिवाजी किती आणि काय काय करणार? त्यामुळे अग्निशस्त्रांची निर्मिती न करण्याचा दोष शिवछत्रपतींना यत्किंचीतही लागत नाही ! असो, आता परत मराठी तोफखान्याकडे वळू

बाजीरावाने नर्मदा ओलांडल्यानंतर उघड्या मैदानांवरील युद्धाचा मराठयांना  परिचय झाला, परंतु तरी देखील बाजीरावाच्या मृत्यूपर्यंत वेगवान घोडदळ हीच मराठयांची खासियत राहिली . बाजीरावानंतर जसे जसे राज्य उत्तरेकडे वाढत गेले तेव्हा तोफेसारख्या शस्त्राची गरज खऱ्या अर्थाने भासू लागली. परंतु तोफखान्याचा कुठलाही पूर्वानुभव नसलेल्या मराठयांना आयत्या वेळेला ही विद्या येणार तरी कशी? म्हणून मग या विद्येचा थोडाफार परिचय असणाऱ्या मुसलमानांना आणि पुढे काही दिवस फ्रेंचाना आपल्या तोफखान्याचा ताबा मराठयांनी दिला. पण त्यामुळे मराठयांच्या तोफखान्यातही मुघलांप्रमाणेच अजस्त्र तोफा बाळगण्याची परंपरा कायम राहिली.

लेफ़्टनंट इ. मूर याने १७९१ मध्ये मराठी तोफखान्याच्या कार्यपद्धतीचे वर्णन लिहून ठेवले आहे. ( मागच्या भागात दिलेल्या गो.नी.दांच्या वर्णनाशी हे चपखल जुळते ) . हे वर्णन मुघलांच्या तोफखान्यालाही तंतोतंत लागू आहे. मूर लिहितो:-

” तोफ भरून झाली की तोफखान्याच्या तुकडीतील सर्व लोक खाली बसून, चिलीम ओढत अर्धा तास पर्यंत गप्पा मारत बसतात. तोफ उडवल्यावर मोठ्या प्रमाणावर धुरळा उडाला तर आपला बार कारिगर झाला असे समजून त्यांना मोठे समाधान वाटते. मग परत एकदा तोफ  भरून, पुन्हा गप्पांचा व चिलमीचा कार्यक्रम होतो. दुपारी एक ते तीनच्या दरम्यान मराठयांकडील आणि शत्रुपक्षाकडील लोक एकमेकांवर तोफा उडवत नाहीत. जेवणाच्या सुट्टीची ही वेळ एका अलिखित नियमासारखीही दोन्ही पक्ष आपसात ठरवून घेतात (दुपारी १ ते ४ काम बंद ठेवण्याची पद्धत तेव्हापासूनची आहे हो ! उगाच खवचटपणे चितळ्यांना नावे ठेऊ नयेत !)  रात्रीच्या वेळी तोफेचा मारा कमी होतो आणि बंदुकांचा वाढतो.”

१७९१ पर्यंत मराठयांचा तोफखाना म्हणजे  मुघलांच्या तोफखान्याची तंतोतंत नक्कल होती. याच लेफ़्टनंट मूरने टिपू सुलतानाच्या पारिपत्यासाठी निघालेल्या परशुरामभाऊ पटवर्धनांच्या तोफखान्याचे वर्णन केले आहे. मूर म्हणतो :-

“परशुराम भाऊच्या सर्वात मोठ्या तोफा ३२ आणि ४२ पौंडर आहेत. या तोफा पुण्याला तयार केल्या असून त्या पितळ्याच्या आहेत. आपल्या तोफांपेक्षा या तोफा लांबीला फार जास्त आहेत. या तोफांचे तोफगाडे आणि तोफगाड्यांची चाकं अतिशय बेढब आणि बोजड आहेत.” खासकरून तोफगाड्याच्या मागच्या भागाला लावलेली छोटी चाकं  , चढ असलेल्या  रस्त्यामधून जाताना, १०० यार्ड गेले तरी एकदाही फिरत नाहीत. तोफेवर निरनिराळ्या प्रकारचे सामान इतके गच्च लादलेले असते की तोफ उडवायची वेळ आली तर ते सामान काढून तोफ उडवण्याच्या स्तिथीत आणायला  किमान अर्धा तास लागतो. तोफेवर लादलेल्या  सामानामुळे झाकली गेलेली तोफ  आणि तिला  ओढण्यासाठी लावलेले पन्नास, साठ आणि काही वेळा शंभराच्या संख्येत असलेले बैल पाहिले की, हे चाललंय ते प्रकरण म्हणजे एक तोफ आहे  हे कोणाला सांगून देखील खरं वाटत नाही. पुरेसे खायला ना दिल्याने हे बैल मरतुकडे झाले असतील तर अवघड चढणी वर  तोफ चढवताना मागून तोफ ढकलण्यासाठी हत्तींचा वापर केला जातो. काही काळापासून मराठयांनी आपली एका ओळीत चार बैल लाऊन तोफ ओढण्याची पद्धत आत्मसात केली असली तरी, असे एकामागोमाग एक लावलेली  बैलांची रांग लावून तोफ ओढण्याच्या पद्धतीने काय साध्य होते कोणास ठाऊक.”

मराठयांच्या तोफखान्याची ही अवस्था होती ; या उलट इंग्रजी तोफा ५ मिनीटांच्या आत माऱ्यासाठी सज्ज होत असत. इंग्रजांकडे असे तोफांवर सामान-बिमान लादले असते तर शरीराच्या कोणत्या भागावर हंटर पडला असता हे विस्ताराने सांगण्याची गरज नाही !(तोफ भाग ३)

न.चिं.केळकर  यांनी लिहिलेल्या पुस्तकाला वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून मराठी तोफखान्याची  आणखी एक झलक पाहायला मिळते. खरे शास्त्री लिहितात :-

“तोफखान्याची शिस्त अशी म्हणण्याजोगी पेशवाईत फारशी असल्याचे त्या वेळच्या लेखात दिसून येत नाही. पानशानी कधी कुठे तरवार (अथवा खरे बोलायचे तर तोफ) मारली होती त्याच लौकीकावर ते पेशवाईच्या अखेरपर्यंत तोफखान्याचे दरोगे होते ! त्यांच्या तोफांचा चांगुलपणा त्या तोफांनी पूर्वी कधीकाळी दाखविलेल्या करामतीवर मोजला जात असे! मग हल्लीची करामत कशीही असो ! एखाद्या वेढ्यात मराठी तोफांचा किल्ल्यावर भयंकर भडिमार होण्याचे भय नव्हतेच ! कारण, दारूगोळ्याचा खर्चावर दरोग्याची काकदृष्टी नेहमी फिरत असायची; शिवाय फार बार केले तर तोफा फुटतील अगर बिघडतील ही मोठीच पंचाईत होती ! असल्या जुन्या तोफा आणि ‘कृष्णमृत्तिके’ची (तोफेची दारू) टंचाई असल्यावर मग काय विचारावे? आमच्या फौजांचे मोर्चे एखाद्या किल्ल्यास बसले म्हणजे मोर्च्यात गोलंदाजांनी एकदा तोफेचा बार काढून पुन्हा बार भरून ठेवावा, मग चिलीम ओढावी, घटका दोन घटका गप्पागोष्टी कराव्या, इकडे तिकडे थोडे हिंडावे, मग तोफेजवळ जाऊन भरलेला बार सोडावा (उडवावा ) आणि भरून ठेवावा, पुन्हा चिलीम गप्पा वगैरे प्रकार व्हावे ! याप्रमाणे सायंकाळपर्यंत दहा पाच बार काढून तोफ तळावर आणून पोचती केली म्हणजे संपला रोजगार ! या लिहिण्यात अतिशयोक्ती बिलकूल नाही. इंग्रज प्रेक्षकांनी जे लिहून ठेवले आहे त्याचाच उद्धार आम्ही येथे केला आहे व जुना पत्रव्यवहार आम्ही जो वाचला आहे त्यावरून अशीच वहिवाट असल्याचे अनुमान निघते.”

निरनिराळ्या व्यक्तींनी लिहून ठेवलेल्या अनुभवांवरून मराठी तोफखाना कसा होता ते एव्हाना वाचकांच्या लक्षात आले असेलच. सुरवातीपासूनच तोफा चालवण्याचे तंत्र आपण शिकून घ्यावे असे मराठयांना कधीही वाटले नाही. फ्रेंच दारोगा बुसी याच्या हाताखाली तोफा चालविण्याची विद्या शिकलेली मुझफर खान आणि इब्राहिम खान गारद्या सारखी माणसे काही काळ मराठी तोफखान्यात होती परंतु ही माणसे एक तर लढाईत मेली किंवा ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ या  न्यायाने मराठी लष्कर सोडून निघून गेली. त्यामुळे तोफा उडवणारा गेला , आता या तोफखान्याचे करायचे काय? असा प्रश्न मराठ्यांपुढे उभा राहिला !

——-: उपसंहार :——–

शास्त्रशुद्ध तंत्राने तोफा उडवण्याच्या विद्येत पारंगत असणाऱ्या इंगजांनी सिंहगड, पुरंदर , रायगड, वासोटा इत्यादी किल्ले मराठ्यांकडून भराभर हिसकावून घेतले, परंतु ‘पडलो तरी नाक वर’ या आपल्या वृत्तीतून रायगड इंग्रजांकडे गेल्यानंतर आपल्या लोकांनी एक  रंजक कथा तयार केली !  ती अशी, १८१८ साली पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रज जेव्हा रायगडावर तोफा डागत होते, तेव्हा या तोफांचे गोळे गडावरील दारूकोठाराच्या आसपास पडत , परंतु नेमके दारू कोठारावर पडत नव्हते.  तेव्हा रायनाक महार नावाच्या कुणा एका माणसाने  म्हणे इंग्रजांना तोफेच्या गाड्याखाली दोन शिवराई ढबू घालण्याची एक युक्ती सांगितली, आणि हे केल्यावर इंग्रजांचे गोळे बरोब्बर दारू कोठारावर पडले !

कालांतराने  ही रायनाक महाराची गोष्ट खोटी असल्याचं सिद्ध झालच .  काय करावं या माणसांचं ? ज्या इंग्रजांकडे १७व्या शतकांच्या सुरवातीपासून तोफा चालवण्याची शास्त्रोक्त मॅन्युअलस होती, त्यांना तोफेचा नेम लावण्यासाठी हिंदुस्थानातील एका अशिक्षित माणसाची मदत घ्यावी लागेल? हे म्हणजे रस्त्यावरच्या एखाद्या शेंबड्या पोराने, शिवाजी महाराजांना भवानी तलवार कशी चालवावी याचे प्रशिक्षण देण्या सारखं झालं !  या असल्या भाकड  कथा तयार करून आपण आपल्या राष्ट्राचं  जगामध्ये किती हसं करून घेतो !(तोफ भाग ३)

‘ हे ज्ञान आमच्या पोथ्या-पुराणांमधून फार पूर्वीपासूनच होतं”, “आम्हाला सगळ्या क्षेत्रातलं सगळं कळतं ” , ही वृत्ती आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत घातक आहे. ही वृत्ती जो पर्यंत आपल्या माणसांच्या मनातून जात नाही, तोपर्यंत हा समाज प्रगतीच्या पथा पासून शेकडो नव्हे, हजारो योजने दूर आहे !

या लेखमालेचा समारोप करताना दोन लेखकांचे उद्गार येथे देण्याचा मोह आवरत नाही. यातले पहिले लेखक म्हणजे श्री वासुदेव शास्त्री खरे आणि दुसरा म्हणजे विल ड्युरांट .

‘मराठे आणि इंग्रज’ या पुस्तकाला खरे शास्त्रींनी लिहिलेली प्रस्तावना मुळातूनच वाचली पाहिजे. त्या प्रस्तावनेतील शेवटचा भाग येथे देत आहे.

” आमचा पुणे-सातारा इंग्रजांनी का घेतला आणि त्यांचा मद्रास-कलकत्ता आम्ही का घेऊ शकलो नाही, याचा संक्षेपाने येथपर्यंत विचार केला. देशाभिमानशून्याता, समूहरूपाने कार्य करण्याची नालायकी, स्वार्थसाधनाची बेसुमार हाव, आळस, हेळसांड, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय इत्यादी दुर्गुण आमच्या समाजाच्या अंगी जे खिळले आहेत तेच आमच्या राज्यनाशाला कारण झाले आहेत. असल्या दुर्गुणांनी खिळखिळे झालेले  कोणतेही पौरस्त्य राष्ट्र सुधारलेल्या पाश्चात्य राष्ट्राशी विरोध प्राप्त झाला असता टिकाव धरू शकत नाही. हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर फ्रेंचांनी घेतले असतेच. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता त्यातले कोणते फुटायचे , मातीचे की लोखंडाचे हे ठरलेलेच आहे ! हल्लीचा काळ असा आला आहे की, आम्ही पाश्चात्यांची बरोबरी तरी करावी, नाही तर त्यांचे मजूर तरी होऊन राहावे ! राजकारण, उद्योगधंदे, कलाकौशल्य, भौतिक शास्त्रांचा उपयोग, प्रत्येक गोष्टीत हीच स्थिती आहे. जर आम्हास पाश्चात्यांच्या बरोबरी करण्याची हिम्मत असेल तर या लेखात वर्णिलेले आमचे दुर्गुण आम्ही टाकले पाहिजेत. पूर्वी स्वराज्य होते  ते याच दुर्गुणांमुळे गेले, हे समजून जर आम्ही सावध झालो नाही, तर नवीन स्वराज्य मिळूनसुद्धा व्यर्थच आहे, हाच इतिहास  डिंडींमाचा घोष प्रत्येकाच्या कानी घुमत राहिला पाहिजे !”

ही प्रस्तावना खरे शास्त्रींनी १९१८ साली म्हणजे पेशवाईच्या अस्तानंतर बरोबर १०० वर्षांनी लिहिली आहे !

विल ड्युरांट म्हणतो,

” This is the secret of the political history of modern India. Weakened by division, it succumbed to invaders; impoverished by invaders, it lost all power of resistance, and took refuge in supernatural consolations; it argued that both mastery and slavery were superficial delusions, and concluded that freedom of the body or the nation was hardly worth defending in so brief a life. The bitter lesson that may be drawn form this tragedy is that eternal vigilance is the price of civilization. A nation must love peace, but keep its powder dry.”

शिवछत्रपतींनी त्यांच्या सावत्र भावाला म्हणजेच व्यंकोजीला एक पत्र लिहिले आहे. त्या पत्राच्या शेवटी महाराज व्यंकोजीला उपदेश करतात. महाराज लिहितात :-

“कार्य प्रयोजनाचे दिवस हे आहेती, वैराग्य उत्तरवयी कराल ते थोडे. आज उद्योग करून आम्हांसही तमासे दाखविणे. ”

महाराष्ट्राच्या महादेवाने दिलेला हा कानमंत्र आम्हाला ऐकू आला नाही ! आम्ही वेगळ्याच तंत्र-मंत्र आणि चमत्कारांमध्ये गुंतून गेलो आणि शेवटी आम्हांवर इंग्रजांचे राज्य आले ! निवृत्तीत रमलेल्या या देशाला इंग्रजांनी प्रगतीच्या उंबरठ्यावर हात धरून खेचत आणले आणि त्याची किंमत त्यांनी पुरेपूर वसूल केली, जी बऱ्याच प्रमाणात अन्यायकारक होती ; पण भांडवलशाहीत कुठलीही गोष्ट फुकट नसते, हा दुसरा धडा आपण लक्षात ठेवायला हवा.

लेखन सीमा.

संदर्भ :-

१)  ‘राधामाधवविलासचंपू’ – प्रस्तावना- इतिहासाचार्य वि.का.राजवाडे
२)  मराठे व इंग्रज – न चिं केळकर
३)  पेशवेकालीन महाराष्ट्र – वा.कृ.भावे
४)  रायगड दर्शन – दुर्मिळ पुस्तकातून – संपादन : प्र. के. घाणेकर
५) The Military System Of The Marathas- Surendranath Sen
६) The army of the Indian Moghuls: its organization and administration- William Irvine
७) The history of civilization : Our Oriental Heritage :- Will Durant
८) ब्रिटिशांनी शिकवलेले धडे :-  http://epaper.loksatta.com/…/loksatta-pune/13-12-2014…
९) A Narrative Of The Operations Of Captain Littles Detachment And Of The Maratta Army Commanded By Purseram Bhow ; Druring The Late Confederacy In India, Against The Nawab Tippo Sultan Bahaduro

लेखक :- सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

Leave a Comment