सारिपाट खेळणारे शिवपार्वती (लेणी क्र १४ वेरूळ) –
शिवपार्वती सारिपाट खेळत आहेत असे मोठ्या आकारातील दोन शिल्पपट वेरूळमध्ये आहेत. सारिपाटसाठी संस्कृतमध्ये “अक्षक्रिडा” असा शब्द वापरला जातो. एका शिल्पावर पूर्वीच या सढरात लिहिले होते. अजून एक संधी मागणारा शिव असा त्या शिल्पपटाचा आशय होता. वरिल शिल्पपट अजून मनोज्ञ आणि देवतांचेपेक्षा स्वाभाविक मानवी भावनांना शिल्पांकित करतो.(सारिपाट खेळणारे शिवपार्वती)
खेळताना शिवाने काहीतरी लबाडी केली आहे. चिडून पार्वतीने तोंड फिरवले आहे. शिव तीचा हात धरून साॅरी म्हणतो आहे. मागे गणेश भृंगी चामरधारिणी आणि बाकी गण आहेत.
या शिल्पाचे खरे सौंदर्य खालच्या बाजूस दडलेले आहे. शिवाचा नंदी मोकळा सहज उभा आहे. त्याच्या भोवती शिवगण मस्त त्याची मजा घेत आहेत. कुणी त्याच्या गळ्यातली घंटा वाजवत आहे. कुणी शेपटीशी खेळत आहे. कुणी पाय धरला आहे. कुणी पाठीवर चढू पहात आहे. विठु माझा लेकुरवाळा तसा हा नंदी आहे. एखादा समजूतदार ड्रायव्हर असेल तर त्याच्या कारशी गल्लीतील पोरांनी खेळावं तसं हे शिल्प आहे.
देवतांचे मानवी स्वभावाप्रमाणे चित्रण हे वैशिष्ट्य इथे आढळून येते.
वेरूळला कैलास लेण्यांशिवायही खुप सुंदर शिल्पे आहेत. पर्यटक तिकडे फिरकत नाहीत. इतर लेण्यांसाठी म्हणून खास वेरूळला भेट द्या. कैलास तर जागतिक चमत्कार आहेच. पण इतरही ठिकाणं पाहिली पाहिजेत. कोरोना आपत्तीत दीर्घ काळ बंद ठेवलेल्या वेरूळच्या लेण्या १० डिसेंबरला खुल्या करण्यात आल्या. लेणी खुली होईल तेंव्हा पर्यटक म्हणून पहिलं पाउल आपलं असावं असा आग्रह व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राचा होता. त्याच्या औरंगाबाद प्रेमाला सलाम. हे छायाचित्र आकाशने घेतले आहे.
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद