चाकणचा किल्ला
चाकणचा किल्ला संग्रामदुर्ग हा भुईकोट किल्ला आजही इतिहासाची अन अखंड शौर्याची साक्ष देत अखेरच्या घटका मोजत उभा आहे.
फिरांगोजी बाबांनी पोटच्या पोराप्रमाणे मेहेनतीने हा गड राखला. सजविलेला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच साडे तीनशे वर्षा पासून संवर्धन व जतनाच्या प्रतीक्षेत उभा आहे. पुण्यापासून खूप जवळ असलेला हा भुईकोट किल्ला नाशिक रोडने आपण आलो अन शिक्रापूर फाट्यावर वळलो की जवळच हा गड उभा आहे.
अखंड शौर्याचा अन ऐतिहासिक लढाईचा साक्षीदार असलेला हा किल्ला, आज या संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. जेव्हा आपण इतिहासाची पाने चाळतो, तेव्हा अवघ्या 400 सैनिकांनी शाहिस्तेखान च्या नेतृत्वाखाली असलेल्या प्रचंड मुघल फौजेला 56 दिवस झुंजवले होते. दुर्दैवाने आपल्या पुढच्या पिढीला चाकणचा किल्ला अन ती ऐतिहासिक लढाई होती हे सांगण्याची वेळ येईल.
फिरंगोजी नरसाळा हे नाव ऐकले की दोन प्रसंग आपल्यासमोर येतात. एक म्हणजे चाकणचा संग्रामदुर्ग अन भूपाळगड. फिरंगोजी बाबा पूर्वी आदिलशहाची चाकरी करायचे. आणि शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर ते आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झाले. अन स्वराज्यात येताच त्यांनी चाकणचा हा भुईकोट किल्ला शिवरायांच्या चरणी अर्पण केला. शिवरायांसारखा माणसं ओळखणारा राजा दुसरा कोणी नाही. शिवरायांनी ह्या हिऱ्याला स्वराज्यात आणले अन चाकणच्या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून नेमणूक केली.
जून 1660 ला शाहिस्तेखान प्रचंड फौजेसह स्वराज्यावर चालून आला. त्याला वाटले हा किल्ला घेणं म्हणजे आपल्या डाव्या हाताचा खेळ शाबीत होईल. कारण त्याच्याकडे प्रचंड सैन्य होते, अफाट बचमियत होती. तोफगोळे, दारुगोळा भरमसाठ होता. त्यामुळे खान मोठ्या तोऱ्यात चाकणच्या कोटाकडे रवाना झाला. आलमगीर बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्ते खान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट किल्ल्याला त्याने वेढा घातला. संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचे किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होते. संग्रामदुर्ग हा असा काही खूप बुलंद आणि भक्कम दुर्ग नव्हता. त्यात तो भुईकोट, ना कोणता डोंगर ना जंगल. त्या किल्ल्याचे फक्त एक वैशिष्ट्य होते, सुरक्षेसाठी किल्ल्याच्या तटबंदीच्या चहूबाजूने एक खंदक काढलेला होता. त्यामुळे थोडी बळकटी आलेली.
त्या खंदकात सहसा पाणी असायचे आणि त्यात कधीकधी साप व सरपटणाऱ्या प्राण्यांचा देखील वावर असायचा.त्यातल्या त्यात खान चालून आला त्यावेळी नुकताच पावसाळा सुरू झालेला.21 जून 1660 रोजी चाकणच्या किल्ल्याला खानाच्या सैन्याने वेढा दिला.हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला. मराठे निकराने लढत होते. खानाकडे बुलंद तोफा होत्या, अनेक सैनिक होते परंतु तरीही किल्ला हाती येत नव्हता.
नुसत्या तोफांच्या माऱ्याने मराठे शरण येत नाहीत हे पाहिल्यावर खानाने एक युक्ती लढवली. शाहिस्तेखानाने आपल्या सैन्यास बुरुजखाली एक भुयार खणण्याची आज्ञा दिली अन मग त्या सुरुंग पेरायचा अन बुरुज फोडायचा डाव खानाने आखला.ताबडतोब कामाला सुरवात झाली. हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्या मावळ्यांना जर या घटनेची चाहूल लागली असती, तर यदाकदाचित खंदकातील पाणी त्यांनी भुयारात सोडून ते सुरुंग निकामी केले असते. फिरंगोजी बाबांनी थोपटे ,मोहिते, भिवाजी , कर्डीले या सरदारांच्यासह शूर जेमतेम 400 मावळयांसोबत चाकणचा कोट तब्बल ५६ दिवस झुंजवत ठेवला होता. 14 ऑगस्ट 1660 रोजी हमुघलांनी पेरलेल्या सुरुंगाची वाताण पेटवली दिली. आणि पूर्वेच्या कोपरयाचा अवघा बुरुज अस्मानात उडाला. त्या बुरुजावर भिवाजी यांच्यासह असलेले 120 मावळे सुद्धा आभाळात उडाले. दीन दीन च्या आरोळ्या अन गर्जना ठोकत मुघल त्या बुरुजाकडे पळाले.
फिरांगोजी बाबांनी तरीही हार मानली नाही. ते लढत होते, मावळे लढत होते, हर हर महादेव चा गजर चालू होता. बुरुज पडलेल्या त्या दिवशी अख्खा दिवस मराठे झुंजत होते. पण शेवटी राहिलेले तरी वाचतील हा विचार फिरंगोजी बाबांनी केला अन पांढरे निशाण दाखवले. दुसऱ्या दिवशी मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघलीसैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. चाकणच्या गडावर हिरवं निशाण फडफडायला लागलं.
खानाने किल्ल्यात प्रवेश केला अन आतमध्ये त्याने पाहिलं, खान चकित झाला, मराठे नक्की कशासाठी लढत होते तेच त्याला कळेना. तो आपल्या साथीदारांना म्हणाला “ये मराठे इस टूटी हुई दिवारो के लिये लड रहे थे, या अल्लाह कैसे है ये मऱ्हाटे.” खानाने गड घेतला पण त्याला कळले मराठे काय चीज आहेत ते, त्या 56 दिवसांच्या रणकंदनात खानाच्या फौजेचे सुद्धा अविरत नुकसान झाले. संग्रामदुर्ग सुद्धा खानाच्या या नाचक्कीला हसला असेल.
आज 2 डिसेंम्बर 2019, जवळपास 359 वर्षांनंतर देहूकडे येताना या किल्ल्याला प्रथमच भेट द्यायला गेलो. अखेरच्या घटका मोजत असलेला हा भुईकोट किल्ला पाहून ऊर भरून आला, पण समाधान वाटलं की इतिहास घडलेली ती माती अन ते पडके बुरुज मी डोळ्याने तरी पाहू शकलो.
किल्यात फिरताना आतमध्ये खूप अशा गोष्टी आढळल्या. आमच्या सह्याद्री प्रतिष्ठान ने पुनर्जीवित केलेली एक तोफ आजही 359 वर्षांपासून तिथे दिमाखात उभी आहे. किल्ल्याच्या खंदकात पूर्णपणे झाडीचे साम्राज्य आहे, बुरुज भग्नावस्थेत आहेत, दुर्दैवाने आतल्या वाड्यात पण आपण जाऊ शकत नाही एवढी बेकार परिस्थिती आहे.
मी किल्ल्याच्या बुरुजांवर गेलो असता तिथे खूपशा वाईट गोष्टी आढळल्या. जिथे आपल्या बापजाद्यानी रक्त सांडलं, प्राणाची आहुती दिली अशा तट अन बुरुजांवर सिगारेटची थोटक, माव्याच्या पुड्या, त्या दगडांवर कोरलेली प्रेमी युगुलांची नावे अशा गोष्टी निदर्शनास आल्या. पुरातत्व खात्याचे लक्ष नाही, अन आपल्या नासक्या पोरांना इतिहासाची किंमत नाही.
अशा गोष्टी पाहून ऐतिहासिक पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा गड ढसाढसा अश्रू ढाळत असेल, ते मावळे, फिरंगोजी बाबा आकाशातून पाहत असतील तर त्यांना सुद्धा अश्रू अनावर होतील कोटाची ही अवस्था पाहून. कृपया शासनाने या अखेरच्या घटका मोजत असलेल्या दुर्गाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन त्याच्या संवर्धनास सुरुवात करावी, नाहीतर दुर्दैवाने चाकणमध्ये एक किल्ला देखील होता अन तिथे हा रणसंग्राम घडलेला असे जर उद्या कोणाला सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही.
गडकिल्ले वाचवा, अस्मिता वाचवा
सोनू बालगुडे