महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुग भाग 1 | Chalcolithic Age –
पुरातत्वशास्त्रानुसार ज्या भागामध्ये सर्वप्रथम एखाद्या प्रागैतिहासिक काळातील संस्कृतीचे अवशेष सापडतात त्या संस्कृतीला त्या ठिकाणाचे नाव दिले जाते, जसे सिंधुसंस्कृती या ब्रॉन्झ संस्कृतीचे अवशेष सर्वप्रथम हडप्पा येथे सापडले म्हणून ती हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखली जाते . सिंधू संस्कृती नंतर भारतात इतरत्र ज्या लहान मोठ्या संस्कृती निर्माण झाल्या त्यांना त्या त्या ठिकाणची नावे देण्यात आली जसे आहाड संस्कृती (राजस्थान), कायथा संस्कृती (मध्यप्रदेश), माळवा संस्कृती (मध्यप्रदेश), प्रभास संस्कृती (गुजरात), रंगपूर संस्कृती (गुजरात), जोर्वे संस्कृती (महाराष्ट्र), सावळदा संस्कृती (महाराष्ट्र) या सर्व संस्कृती या ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होत्या. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला व सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला या ताम्रपाषाण संस्कृतीची दोनशेहून अधिक स्थळे उजेडात आली आहेत. मध्यमहाराष्ट्रात या संस्कृतीची अनेक स्थळे आहेत त्यातील नेवासे, प्रकाश, इनामगाव, दायमाबाद ही प्रमुख (कोकणामध्ये या संस्कृतीची स्थळे नाहीत). मुख्य नदयांपेक्षा उपनद्यांच्या क्षेत्रांत राहणे हे लोक पसंत करीत. कारण त्यांची पात्रे खोल असत आणि मोठ्या नद्यांप्रमाणे पुराचा फार धोका ही नव्हता.महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुग.
जोर्वे संस्कृती ही महाराष्ट्रातील मुख्य ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. या संस्कृतीतील लोकांची घरे चौकोनी असत. जमिनी पक्क्या चोपलेल्या असायच्या. घरे एका ओळीत बांधलेली असत (linear settlement). घरात गोलाकार चूल व बाहेर शिकारीत मारून आणलेला प्राणी भाजण्यासाठी मोठी चूल असे. अंगणात धान्य साठवण्यासाठी मोठी बळद (लिंपलेला गोलाकार खड्डा) असे. त्यात मुख्यत्त्वे ज्वारी साठवली जायची. शुष्क होत चाललेल्या हवामानात गव्हापेक्षा ज्वारी चांगली येते हे त्यांना एव्हाना लक्षात आले असावे. गहू पिकवलाच जात नसे असे नाही पण त्याचे प्रमाण फार कमी होते व ते घरातच छोट्या कणग्यांमधून साठवले जायचे.
स्वयंपाकाची, जेवणाची, धान्य साठवण्याची भांडी वेगळी असत. लाल रंगाच्या, उत्कृष्ट पोताच्या, पक्क्या भाजलेल्या त्या भांड्यांवर ठराविक प्रकारची नक्षी असे. धान्य साठवण्याचे मोठे रांजण हाताने घडवलेले असत. पाण्यासाठी तोटीची भांडी वापरात होती यावरून पाण्याचा तुटवडा असल्याचे समजते. मृतांचे दफन केले जाई. दफन करताना त्याचे पाय घोट्यापासून तोडत. ती मृत व्यक्ती भूत बनून पुन्हा येऊ नये हा यामागचा हेतू. समाजातील मानाने मोठ्या व्यक्तींसाठी मात्र ही पद्धत नव्हती. या दफनांबद्दल आपण एका स्वतंत्र लेखात बोलूयात कारण जोर्वे संस्कृतीची सामाजिक मानसिकता समजून घेण्यासाठी त्यांची मदत होते.
अशी ही सिंधुनंतरची जोर्वे संस्कृती.
परंतु इ.स.पू. 1000 च्या सुमारास हवामान अधिकच शुष्क होऊ लागले. धान्य वापरण्यासाठी बळदाऐवजी आता रांजण वापरले जाऊ लागले कारण बळदात साठवण्याइतपत धान्य उगवेनासे झाले. चौकोनी घरांची जागा आता गोल झोपड्यांनी घेतली. पक्क्या चुली कमी होऊ लागल्या. गहू पिकवणे पूर्णपणे बंद झाले त्या जागी आता फक्त ज्वारीचे तुटपुंजे उत्पादन होऊ लागले. आयुष्य अजून खडतर झाले, पुन्हा भटकंती नशिबी आली. उत्तर जोर्वे काळ अधिक बिकट होता…
– पितांबर जडे