चामरा –
कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.१३ –
स्वर्गीय यौवनांमध्ये समाविष्ट होणाऱ्या दोन कलात्मक सुरसुंदरी या मंदिरावर पहावयास मिळतात. त्यांना चामरा असे म्हणतात. साधारणतः परमेश्वराच्या सेवा करणाऱ्या सेविका समूहामध्ये चामरा या पद्धतीच्या सुरसुंदरी चा समावेश होतो. या दोन्ही शिल्पांची स्वतंत्र अशी माहिती आपण घेणार आहोत.
कोरवली येथील दोन चामरा पैकी पहिली चामरा थोडी कमी उंचीची किंचितशी स्थूल देहाची तरीही सुबक अशी आहे. अतिशय चित्तवेधक असणारी ही स्वर्गीय अप्सरा त्रिभंगा अवस्थेत वर्षानुवर्षे उभी राहून आणि उजव्या हातात मोठ चामर धरून ही मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तगणांना संदेश देत आहे की, परमेश्वर चरणी लीन होऊन त्याची जमेल तशी सेवा करा, सेवेमुळे आणि भक्तीमुळे परमेश्वर नेहमी प्रसन्न होतो, हा संदेश देणारी हिचा चामरा आपल्या मस्तका मागे अतिशय लोभस आणि रेखीव असे प्रभावलय धारण केलेली आहे.
गोलाकार प्रभावलयाच्या मधोमध विसावलेले तिचे मुखकमल एखाद्या कमलपुष्प प्रमाणेच भासते. या चामरेची केशरचना न्यारीच आहे. नक्षीदार मुकुट जणू हिच्या मस्तकावर बसविला आहे असे वाटते. त्याच्याखाली दोन्ही बाजूस कपाळावर झेपावणाऱ्या तिच्या कुंतलबटा केसांना घुंगरू लावल्याप्रमाणे वाटतात. भावपूर्ण नेत्रकमले असलेला तिचा चेहरा प्रभावळ आणि केशरचनेमुळे इतका प्रसन्न व तेजस्वी वाटतो की, तिच्या चेहऱ्याची प्रभाव अधिक आहे का प्रभावावर आणि कुंतलाची चमक जास्त आहे. हेच समजत नाही.तिचे पाय आणि दोन्ही पदकमलाना छेदून उभे राहण्याची तिची ढब तिच्या संपूर्ण देहास सौंदर्याचा साज चढविणारी आहे. कोरवलीच्या सर्वच सुंदरीला कलाकाराने गर्भश्रीमंत स्वरूपात सादर केली आहे.
एवढि आभूषणे ल्यावयास या सुंदरींना कलाकारांनी भाग आहे की, त्यांचे मूळचे सौंदर्य अधिकच देखणे झालेले आहे.लोभस पण आकर्षक वाटणारी कर्णकुंडले स्कंदमाला ,उपग्रीवा, स्तनसुत्र ,केयूर या अलंकारांना ही चामरा शोभिवंत झालेली आहे. कटिसूत्र, उरुद्दाम आणि मुक्तदाम यामुळे तिच्या परिधान केलेल्या वस्त्रांची कल्पना येते .इतर सुरसुंदरी प्रमाणे हिनेही वस्त्राच्यामधून खाली डोकावणारे सोगे आणि पायातील आभूषण सुबक आहेत. सुहास्यवदना असणारी ही देवसेविका कोरवली चा मंदिराच्या बाह्यांगावर उभी आहे. खरे तर अशा पद्धतीच्या देवसेविका या गाभार्याच्या द्वाराशी असावयास पाहिजेत परंतु बाहेरूनहि मंदिरातील दर्शन घेणाऱ्या भक्तांसाठी यांचे अंकन करण्यात आलेले असावे असे वाटते.
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर