चामूंडा : भयानक व बिभत्स रसाचे दर्शन –
आपल्या परंपरेत मानवी भावभावनेतील सर्व रसांचा विचार केला गेला आहे. काही गोष्टी नकोशा वाटतात पण त्यांचे अस्तित्व मात्र असते. असे दोन रस भयानक आणि बिभत्स यांचे दर्शन चामुंडा मूर्तीत दाखलेले आहे. चामूंडा ही मूर्ती नीलकंठेश्वर मंदिर निलंगा (जि. लातुर) मंदिराच्या बाह्य भागावर देवकोष्टकांतील आहे.
उजव्या हातात सुरा, वरच्या हातात त्रिशुळ, डाव्या वरच्या हातात खट्वांग (मानवी कवटीपासून केलेले हत्यार), डावा मधला हात तोंडात असून त्याची नखं ती दाताने कुरतडत आहे, खालच्या हातात कपाल व नरमुंड आहे. एक हात खंडित आहे. ही सहा हाताची चामूंडा आहे.
पोटावर विंचू आहे. सर्प बंध आभुषण म्हणून स्तनाभोवती कमरेला दाखवलेले आहेत. जांघेत घंटा दिसून येते आहे. नरमुंडमाला पायावर लोंबत आहे.
तिचे वाहन प्रेत पायाशी आहे. उजवीकडे पिशाच्च नाच करत आहे. डाव्या बाजूला कुत्रे आहे. वर मान करून नरमुंडातील रक्त ते चाटत आहे. देवीची हाडे स्पष्ट दिसतात. हाडं आणि कातडी असे मांसरहित रूप चामुंडेचे ग्रंथात वर्णीलेले आहे. स्तन शुष्क असून खाली लोंबत आहेत. (उन्नत उभारलेले स्तन समृद्धतेचे मातृत्वाचे प्रतिक समजले जाते)
भयानक व बिभत्स रसाचे दर्शन या मूर्तीत शिल्पकाराने घडवले आहे. नउ रसांची नावे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटी कविता आहे
‘अद्भुत’ वाटे ‘भयानका’चे
‘बिभत्स’ दर्शन होता जगाचे
मनात ‘करूणा’ दाटून येते
‘रौद्रा’तूनी जन्म ‘वीरा’स देते
‘हास्या’त ‘शृंगार’ शोभे विहंगम
सगळ्या रसाचा ‘शांतीत’ संगम
सप्तमातृकां पैकी चामुंडा एक मानली जाते. या मातृकांची संख्या आठ, नऊ पण सांगितली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सप्तमातृका आढळून येतात.
फोटो सौजन्य – दत्ता दगडगावे, लातूर. चामुंडा रूप विवरण डाॅ. माया पाटील (शहापुरकर) यांच्या ग्रंथाच्या आधाराने.
-श्रीकांत उमरीकर