चंद्रेश्वर महादेव मंदिर, चांदवड –
नाशिक शहरापासून ६४ कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले चांदवड हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने व माहुर निवासनी रेणुकादेवी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले ऐतिहासिक शहर आहे. चांदवड शहराला ऐतिहासिकच नाही तर पौराणिक वारसा सुद्धा आहे. असे म्हणतात की शनि माहात्म्य या ग्रंथात “तामिलिंदापुर” नगरीचा उल्लेख आढळतो, ती हीच नगरी होय. या चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई आग्रा रस्त्यालगत एका डोंगरावर असणारे चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर चांदवडच्या मध्ययुगीन इतिहासाचे साक्षी आहे.(चंद्रेश्वर महादेव मंदिर, चांदवड)
यादववंशीय राजा चंद्रसेनाचे साम्राज्य चांदवड नगरीत होते. राजा चंद्रसेनानेच या मंदिराची निर्मिती केली असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. प्राचीन काळी चंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला होता तो शाप निवारण होण्यासाठी चंद्राने शंकराची स्थापना करून उपासना केली. या उपासनेमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले व चंद्राचा शाप निवारण झाला. चंद्राने स्थापन केलेले म्हणून ‘चंद्रेश्वर’ या नावाने हे शिवलिंग ओळखले जाऊ लागले.
चंद्रेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आपल्याला दिसून येते. मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून कळस नव्याने उभारण्यात आलेले आहेत. मंदिराच्या बाह्य भागावर अनेक लहान मोठी-शिल्पे कोरलेली असली तरी रंगरंगोटी केल्याने शिल्पांचे सौंदर्य मात्र उणावले आहे. पूर्वीचा जुना नगारादेखील आहे. मंदिर परिसरात अनेक देवदेवतांच्या मूर्ती, स्त्री शिल्पे, भग्न वीरगळ, सतीशीळा व मंदिराचे अवशेष विखुरलेले आपल्याला दिसतात.
पूर्वी मंदिरात जाण्यासाठी क्वचितच काही पायऱ्या तर काही ठिकाणी अवघड वाट होती. मंदिरापर्यंत जाण्यासाठी चंद्रेश्वर सेवा मंडळाच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून येथे पायऱ्या तयार करून घेतल्या आहेत. श्रावण महिनाभर तसेच महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते व भाविक मोठ्या संख्येने इथे येतात. चांदवड मुख्यत्वे रेणुका देवी मंदिरासाठी परिचित आहे. येथील रंग-महाल व इंद्रायणी किल्ला देखील पाहण्यासारखा असला तरी पर्यटकांनी चंद्रेश्वर मंदिराला देखील एकदा आवर्जून भेट दयावी.
©️ रोहन गाडेकर