चांगावटेश्वर मंदिर – सासवड
सासवड – कापूरहोळ रस्त्यावर अतिशय निसर्गरम्य आणि शांत परीसरात चांगावटेश्वर मंदिर आहे. सासवड बसस्थानकापासून ३ ते ४ कि.मी अंतरावर हे मंदिर आहे.
चांगावटेश्वर मंदिर हे पांडवकालीन शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर पुर्वाभिमुखी असून मंदिराला २५ दगडी पायऱ्या आहेत. या ही मंदिराची रचना संगमेश्वरशी मिळतीजूळती आहे. मंदिरावरील नक्षिकाम अप्रतिम आहे तसेच दीपमाळ, कासव, नंदी, सुंदर आहे.
या मंदिराची आख्यायिका : (ही आख्यायिका मंदिरात असलेल्या माहिती फलकाच्या आधारे)
“चांगदेव पावसाळ्यातील चातुर्मासातले ४ महिने मौनव्रताने व अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे मिटुनच सर्व व्यवहार करीत. त्यांचे नित्य पार्थिव लिंग पुजेचे असे. त्यांचा शिष्य काळ्या मातीने मळुन केलेले लिंग डाव्या हातावर घेऊन त्याची विधीयुक्त पुजा करीत असे. एक दिवशी सारख्या कोसळत असलेल्या पावसामुळे शिष्याने कंटाळुन एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीचे लिंपन तयार करून तेच पार्थिक लिंग म्हणुन तयार करून ठेवले. चांगदेवाने नित्यनियमाने स्नान उरकुन पार्थिव लिंगास आव्हानात्म मंत्रोक्षता वाहून ते उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. ते हलविले न जाणारे स्वयंभू लिंगच चांगदेवास दिसुन आले. त्याने छोटेसे मंदीर बांधून त्या स्वयंभू लिंगाची उपासना कायम ठेवली. यावरूनच या मंदिरास चांगावटेश्वर असे नाव पडले. या मंदिराचा जिर्णोद्धार सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी सन १७०० मध्ये केला. सध्या देवस्थान मालकी हक्क सरदार जयसाहेब राघवेंद्र पुरंदरे यांच्याकडे आहे.”
माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज