चास येथील गढी
महाराष्ट्रातील गडकोट हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय. मराठी माणसाला येथील किल्ल्यांबद्दल व कोटाबद्दल आपुलकी वाटते. पण काळाच्या ओघात बरेच कोट ढासळले तर काही विस्मरणात गेले. अशाच एका विस्मरणात गेलेल्या चास येथील गढीला आज आपण भेट देणार आहोत. चास म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई यांचे माहेर. या चास गावात काशीबाई यांचे बालपण ज्या वाड्यात गेले तो वाडा म्हणजे महादजी कृष्णाजी जोशी चासकर यांची चास गावातील चौबुर्जी गढी. छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात अनेक सरदार ताराबाईच्या पक्षात सामील झाल्याने व अनेकांनी बंड मांडल्याने शाहूमहाराजाना सैन्याची गरज भासू लागली व सेनाकर्ते या नात्याने हि जबाबदारी बाळाजी विश्वनाथ यांच्यावर आली. यावेळी बारामतीकर नाईक सावकार व चासकर जोशी सावकार या मंडळींनी बाळाजी विश्वनाथ यांना सैन्य उभारणीसाठी आर्थिक सहाय्य केले. या उपकाराची फेड म्हणुन बाळाजी विश्वनाथ यांनी या दोन्ही घराण्याशी सोयरसंबंध जोडले.
आपला थोरला मुलगा विश्वनाथ उर्फ बाजीराव यांचे लग्न महादजी कृष्णाजी जोशी चासकर यांची कन्या लाडूबाई उर्फ काशीबाई हिच्याशी लावून दिले. महादजी कृष्णाजी जोशी चासकर यांचा पुर्वापार सावकारीचा धंदा होता. चासकर जोशी सावकारांचा चास गावातील गढी व्यतिरिक्त वडगाव मावळातील साते येथे देखील दुसरा वाडा होता. चास गाव राजगुरुनगर-भीमाशंकर या रस्त्यावर राजगुरूनगर पासुन १० कि.मी.अंतरावर आहे. भीमाशंकर किंवा भोरगीरी किल्ला पहायला जाताना सहजपणे या गढीला भेट देता येते. पुर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेली आयताकृती आकाराची हि गढी पाउण एकर परिसरात पुर्वपश्चिम पसरली आहे.
गढीचे मुख्य प्रवेशद्वार दगडांनी बांधलेले असुन वरील भागातील चर्या विटांनी सुशोभित केलेल्या आहेत. या दरवाजाशिवाय गढीच्या उत्तर भागात अजून एक लहान दरवाजा असुन सध्या तो वापरात नसल्याने बंद करण्यात आला आहे. गढीच्या चार टोकांना चार बुरुज असुन तटाची उंची साधारण २० फुट तर रुंदी ८ फुट आहे. गढीची तटबंदी चिकणमातीने बांधलेली असुन आजही पूर्णपणे शिल्लक आहे. गढीत प्रवेश करण्यापुर्वी दरवाजासमोर चुन्याच्या घाण्याचे चाक दिसुन येते. दरवाजाची लाकडी कवाडे व त्यावरील लोखंडी सुळे आजही शिल्लक असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुला पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. यातील एका देवडीतुन तटावर जाण्यासाठी जिना आहे. तटबंदीच्या आत असलेला चासकर जोशी यांचा तीन मजली वाडा आजही शिल्लक असुन त्यांचे वंशज तेथे राहतात. व आपण वाडा पहायला आलोय हे सांगितल्यावर तितक्याच आपुलकीने ते वाडा दाखवतात. तटावर जाण्यासाठी एकुण तीन ठिकाणाहुन पायऱ्या आहेत. बाहेरील तटबंदीला लागून असलेले आतील बांधकाम पुर्णपणे ढासळलेले असुन या तटबंदीत विटांनी बांधलेले कोनाडे, दरवाजे तसेच खिडक्या व भिंतीतील शौचकुप दिसुन येतात. दरवाजातील आतील बाजूस असलेल्या एका चौथऱ्यावर चार तोफा ओळीत मांडलेल्या आहेत तर दोन तोफा इतरत्र पडलेल्या दिसतात.
गढीत फिरताना मोठया प्रमाणात दगडी वस्तु पहायला मिळतात. मुख्य वाड्याच्या आत असलेल्या भिंतीतुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिने असुन या भिंतीत धान्याची कोठारे आहेत. ओसरीखाली तळघर असुन भिंतीत असलेल्या एका फडताळातुन आत जाण्यासाठी जिना आहे. वाड्याचा दुसरा मजला आजही राहण्यासाठी वापरला जात असुन तिसरा मजला म्हणजे एक प्रशस्त सभागृह आहे. या शिवाय वाड्यात असणारे लाकडी देवघर अप्रतिम असुन त्यात अतिशय सुंदर मुर्ती आहेत. जोशी कुटुंब जरी प्रेमाने वाडा दाखवत असले तरी राहते घर असल्याने आपल्या फिरण्यावर काही मर्यादा येतात. वाड्याच्या मागील बाजुस एक खोल विहीर असुन आजही तिचेच पाणी वापरात आहे. वाड्यात असणारी दुसरी विहीर काही वर्षापूर्वी बुजविल्याचे जोशी यांनी सांगितले. गढीच्या तटबंदीत लढाऊपणाच्या कोणत्याही खुणा नसुन हि तटबंदी केवळ वाड्याच्या रक्षणासाठी बांधली गेली असावी पण गढीत दिसणाऱ्या तोफांचा संदर्भ लागत नाही. संपुर्ण वाडा व तटबंदी फिरण्यास एक तास पुरेसा होतो.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.