छत्रपती थोरले शाहू महाराज
महाराष्ट्राच्या मराठा राज्याच्या पराक्रमी व्यक्तींची आत्माहुती पडल्यानंतर नेतृत्व नसलेल्या जहाजा सारखी महाराष्ट्राची स्थिती झाली होती. अशावेळी समर्थपणे या नेतृत्वहीन राज्याचे नेतृत्व छत्रपती थोरले शाहू महाराज जांनी आपल्या हाती घेतले व त्याला योजकतेने मार्गाला लावले. रणांगणावरील हातघाईशी महाराजांचा संबंध जास्त आला नाही परंतु गरूडाच्या पारखी आणि धुर्त नजरेतुन त्यांनी राज्यव्रुद्धी साठी एक एक मोहरे पारखून मराठा राज्याच्या उत्कर्षाला चालना दिली. राज्य चालवायचे असेल तर त्याला एका दिशेची आवश्यकता असते. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रात एवढी जरब ठेवली होती की, ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. त्यांचा शब्द अखेरचा असे. आपल्या शब्दाबाहेर जाणार्यांची ते गय करीत नसत आणि याच भावनेतून पुरंदर्यांनी वेळोवेळी पत्र पाठवून महाराजांशी संपर्क साधीत जा अशी बाजीरावांना सक्त ताकीद दिली होती. महाराजांच्या या करारी स्वभावामुळे पेशव्यांना आपली मनमानी शेवटपर्यंत करता आली नाही.
थोरले शाहू महाराज हे सर्वांना छाया देणार्या वटवृक्षा प्रमाणे होते . सर्वांशी स्नेह सलोखा ठेऊन त्यांनी नव्या उमद्या विचारांची माणसे जमविली. जी जुनी माणसे बाजुला पडली होती त्यांना अनुकूल करुन मानाची पदे दिली. जो शहाणा व पोक्त आहे त्याचा सल्ला घ्यावा, हा त्यांनी आपला धर्म मानला .
विश्वास टाकण्याजोगी जी माणसं होती त्यांना जवळ केले. जे व्यसनी , मादक द्रव्यांचे सेवन करणारे होते त्यांना दुर सारून प्रधान प्रतिनिधी आदी अष्टप्रधान व दरखदार यांच्या हातून कारभार चालवला. मराठा सरदारांच्या योग्यते प्रमाणे सरंजाम देऊन त्यांना शिपाई गिरीच्या कामास ठेवले . कारण साहस, बंधुभाव, आणि वीरवृत्ती हे सदगुण संधी मिळताच प्रकट होतात , विकास पावतात हे त्यांना चांगले ठाउक होते
शाहु महाराजांनी देशातील मंदिरे यवनांच्या शिकंजातून मुक्त केली . रामेश्वरादि अनेक पवित्र स्थाने मुक्त करुन स्थानिक लोकांच्या हाती त्यांचा कारभार दिला. व त्या वरील वसूल खंडणीच्या रूपाने जमा करण्याचा इंतजाम केला. रामेश्वरचा मुख्य पुजारी आजही महाराष्ट्रीयच असतो. या तीर्थावर आजही मराठ्यांची कुटुंबे समर्थपणे वास्तव्य करुन असतात. ही सारी शाहु महाराजांची देणगी आहे . असा थोर राजा आपल्या भुमित होऊन गेला हे आपले भाग्यच.
थोरल्या शाहू महाराजांनी आपल्या बुद्धी कौशल्याने बाजीराव व चिमाजी आप्पा या धोरणी बंधुंच्या सहकार्याने मध्य प्रदेशातील चंबळ प्रदेशा पर्यंतच्या प्रदेशावर स्वारी करून आपला साम्राज्य विस्ताराचा संकल्प सोडला . हे सर्व करित असताना लगाम आपल्या हाती ठेवून महाराष्ट्राच्या सीमेचे विस्तारण पेशव्यांच्या माध्यमातून करुन घेतले . शाहु महाराजांचा पेशव्यांवर वचक होता . प्रसंगी पेशव्यांना नेतृत्व हीन करूनही त्यांची महाराजां वरील श्रद्धा कमी झाली नाही. हे सारे वैभव व आपल्या विरश्रीला मिळालेले उत्तेजन शाहु महाराजांमुळेच मिळाले आहे अशी त्यांची भावना होती. या श्रद्धे पोटीच महाराजांचे जोडे नानासाहेब पेशवे आपल्या देव घरात ठेवून त्यांची पुजा करत असत.
एक उदात्त , व सर्वांवर उदार अंत: करणाने प्रेम करणारा हा राजा होता.
माहिती साभार – रवि पार्वती शिवाजी मोरे