महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,550

छत्रीघर !! छत्र्या आणि छत्र्या ठेवण्याचे स्टॅन्ड !!

By Discover Maharashtra Views: 3787 6 Min Read

छत्रीघर !! छत्र्या आणि छत्र्या ठेवण्याचे स्टॅन्ड !!

छत्री ही एक वेगळीच गंमतीदार वस्तू आहे. पाऊस म्हणजे पाणी पडत असेल तरी उपयोगी आणि सूर्य आग ओकत असेल तरीही उपयोगी ! आणि तिचा इतिहाससुद्धा बऱ्यापैकी जुना म्हणजे सुमारे ४ हजार वर्षे इतका आहे. पुराणकथांपासून अत्याधुनिक फॅशनपर्यंत तिची व्याप्ती आहे.

महाभारतामधील एका कथेनुसार जमदग्नी ऋषी हे निष्णात धनुर्धर होते. ते बाण मारीत असत आणि हे मारलेले बाण पत्नीला म्हणजे रेणुकादेवींना शोधून आणावे लागत असत. एकदा त्यांचा बाण शोधता शोधता दिवसभर रेणुकादेवींना कडक उन्हाचा खूप त्रास झाला. हे पाहिल्यावर शीघ्रकोपी जमदग्नी ऋषींनी सूर्यावरच बाण रोखल्यावर, सूर्याने त्यांची क्षमा मागून त्यांना छत्री अर्पण केली. म्हणजे छत्रीची कल्पना इतकी जुनी आहे. आपल्या पूजेमध्ये देवाला छत्र अर्पण केले जाते. देव देवता, राजा, पवित्र ग्रंथ, गुरु यांच्यावर छत्री धरणे हा मोठा सन्मान समजला जातो. पूर्वी आपल्याकडे अगदी प्राथमिक अवस्थेतील छत्र्या वापरल्या जात असत. या छत्र्यांच्या कापडाला मेण लावले जात असे. त्यामुळे त्या उघड्याच ठेवाव्या लागत असत. मेण वितळेल म्हणून उन्हात वापरता येत नसत. खूप पावसात वापरल्यावर, छत्रीला असलेला बांबूचा दांडा पाण्यामुळे फुगायचा मग ती छत्री काही दिवस मिटतच नसे. जेव्हा लोखंडी दांड्याच्या छत्र्या बाजारात आल्या तेव्हा गावाकडची लोकं सुरुवातीला त्या घेत नसत. कारण कडाडणारी वीज, छत्रीच्या लोखंडी टोकाकडे आकर्षित होऊन अंगावर पडण्याचा धोका वाटत असे. पावसाळ्यानंतर छत्र्यांना टर्पेंटाइन, कडू तेल इत्यादी लावून आत कडुलिंबाचा पाला, डांबराच्या गोळ्या घालून ठेवल्या जात. पण घराच्या पडवीतीळ खुंट्यांना १ – २ छत्र्या मात्र बारमाही लटकत असायच्या ! शेतकरी, गरीब मजूर, आदिवासी अशी गरीब मंडळी इरली, घोंगडी अशा सर्वात eco friendly छत्र्या वापरीत असत. अन्नदान. ज्ञानदान अशा पवित्र कारणांसाठीही अन्नछत्र, ज्ञानछत्र असे शब्द वापरले जातात.

इजिप्त, चीन, असिरिया, ग्रीस येथे छत्रीच्या आधी ऊनरोधक म्हणजे पॅरासोल नावाचा एक आडोसा वापरला जात असे. चीनमध्ये इ.स.पूर्व २१० मधील कीन शिहुआंग याच्या कबरीमध्ये, मातीपासून ( terracotta ) बनविलेल्या रथावर छत्री आढळून आली आहे. पण अगदी सुरुवातीला मात्र आडोशासाठी झावळ्या, पाने, चामडे, एकच मोठे पान इत्यादींचा वापर होत असे. नंतर लाकडी कडा आणि पट्ट्यांमध्ये बसविलेल्या हलके चामडे, कापड, पाने, कागद यांच्या छत्र्यांचा वापर सुरु झाला. ऊन – पाऊस यांच्यापासून संरक्षण करणाऱ्या छत्रीच्या मुठीमध्ये स्वसंरक्षणासाठी गुप्ती बसविलेल्या छत्र्या, इ.स. १९०० च्या सुमाराला बाजारात आल्या होत्या. घट्ट गुंडाळलेल्या छत्रीचा वापर वॉकींग स्टिक म्हणून होत असे. १९५० मध्ये फ्रेई ऑटो या वास्तुविशारदाने, जमिनीवर कमीतकमी जागा व्यापणारा दांडा आणि त्यावर जास्तीजास्त जागा झाकणारी छत्री ही संकल्पना वास्तुशात्रात आणली. युद्धामध्ये शत्रूच्या राज्यात छत्रीच्या ( parachute ) साहाय्याने अचानक उतरून पराक्रम गाजविणाऱ्या सैनिकांच्या खास तुकड्या सैन्यात दिसू लागल्या. हिरो हिरोईन यांना पावसात भिजणे आणि एकमेकांच्या अगदी जवळ येणे या अत्यावश्यक गोष्टीसाठी, विविध भाषांमधील चित्रपटांमधून, छत्रीतील सीन किंवा गाणे असणे अगदी अपरिहार्य होऊन गेले.

चीन आणि जपानमध्ये एक कला म्हणून अत्यंत कलात्मक, रंगीत, विविध सुंदर छत्र्यांची निर्मिती सुरु झाली. नाजूक हातात छत्री घेतलेल्या ललनांची चित्रे लोकप्रियता मिळवीत असत. चित्रांमधील छत्र्यासुद्धा सुंदर आणि नाजूक असत. फॅशन परेड, रॅम्प वॉक मध्ये छत्र्यांचे महत्व वाढले. जगभर छत्र्यांची खूप मोठी बाजारपेठ उभी राहिली. वजनाला हलक्या, दिसायला नाजूक, वापरायला दणकट आणि किंमत मात्र कमीतकमी अशा फुटपट्ट्यांवर छत्र्यांची लोकप्रियता ठरू लागली. पर्समध्ये – बॅगेमध्ये सहज ठेवता येणाऱ्या घडीच्या छत्र्या १९६७ नंतर भारतात मिळू लागल्या. छत्रीमध्येच बसविलेला छोटासा टॉर्च किंवा सोलरवर चालणारा छोटासा पंखा दिसू लागला. फोटोग्राफीसाठी लाईट डिफ्युजर आणि रिफ्लेक्टर म्हणून उपयुक्त अशा खास छत्र्या बाजारात आल्या. लहान मुलांसाठी कार्टून चित्रांच्या, महिलांसाठी अत्यंत आकर्षक रंग आणि चित्रांच्या लाखो छत्र्यांनी दरवर्षी बाजारपेठा फुलून जातात. समुद्र किनाऱ्यावर, पोहण्याच्या तलावाच्या किनाऱ्यावर, खासगी बागेमध्ये मोठमोठ्या आकर्षक छत्र्या लक्षवेधक असतात. आता तर आपल्याकडील नेतेमंडळींनी स्वतःच्या नावाच्या – पक्षाच्या चिन्हाच्या छत्र्या वाटायला सुरुवात केली आहे. निवडणुका आल्या की हे छत्र्यावाटप खूप वाढते, मग पावसाळा असो व नसो !

आशा या विश्वव्यापी छत्रीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी १० फेब्रुवारीला ” जागतिक छत्री दिन ” साजरा केला जातो.
छत्र्या अडकविण्यासाठी युरोपीय सरंजामशाहीमध्ये अतिशय कोरीव असे सागवानी स्टॅन्ड पाहायला मिळत असत. पूर्वी विविध ऑफिसे, बंगले, हॉटेल्स, वाचनालये, क्लब्ज इत्यादी ठिकाणी, चारीही बाजूंनी मोठे हुक्स असलेले चकचकीत लाकडी स्टॅन्ड पाहायला मिळत असत.या हुकांवर छत्र्या व हॅट्स अडकविल्या जात असत. भारतामध्ये तसले लाड फारसे पाहायला मिळत नाहीत. पण तरीही कोणीतरी कुठेतरी याचा विचार करीत असतो. सहराणपूर या उत्तरप्रदेशातील विविध प्रकारचे लाकडी फर्निचर, वस्तू या खूप वैविध्यपूर्ण असतात. ( जाता जाता एक माहिती….. या सहराणपूरवर रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर या मराठी राज्यकर्त्यानी सुमारे ५० वर्षे राज्य केले आहे. ) येथे बनविलेले एक सुंदर लाकडी छ्त्रीघर माझ्याकडे आहे. अन्य एक छत्री – खोळ देखील अशीच जरा वेगळी आहे. यामध्ये छत्र्या देखणेपणाने ठेवता येतात. माझ्या संग्रहातील या जरा वेगळ्या वस्तूंचे फोटो सोबत देत आहे.

चला ! आता पाऊस, अंदमानच्या समीप आला आहे. या छत्रीघरांमधून आता छत्र्या बाहेर काढून तयार ठेवण्याची वेळही समीप आली आहे.
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा ).
***** मकरंद करंदीकर. [email protected]

माहिती साभार – Makarand Karandikar

Leave a Comment