चतुर्भुज स्तंभ वीरगळ, कुकडेश्वर –
“गावातील एखादा योद्धा किंवा वीर राज्याच्या किंवा समाजाच्यासाठी शत्रूशी युद्ध करताना मृत्यूस प्राप्त झाला असेल तर गावकर्यां मार्फत त्या विराचा मोठा त्याग समजुन त्याच्या पराक्रमाचे स्मृती शिल्प उभारले जातात यालाच वीरगळ असे म्हणतात..
एकाच शिळेवर चारही बाजुंनी शिल्पांकन केलेल्या विरगळीना स्तंभ वीरगळ किंवा चतुर्भुज वीरगळ म्हणतात. एकाच गावातील चार वीर युद्धात धारातीर्थी पडलेले असल्यास किंवा एकाच विराने चार युद्धात शौर्य गाजवलेले असल्यास असे चतुर्भुज वीरगळ उभारले जात असत.
कुकडेश्वर मंदिर परिसरात सापडलेली ही वीरगळ. अतिशय दुर्मिळ प्रकारातील असून. एकाच चतुर्भुज विरागळीवर इष्टदेवता म्हणून शिवलिंग, गणपती आणि श्री विष्णू यांच शिल्पांकन असलेल्या अश्या प्रकारच्या वीरगळी क्वचितच आढळून येतात.
४५ इंच उंच आणि १५ इंच रुंदीची विरगळ चारही बाजुंनी प्रत्येकी 3 भागात विभागलेली आहे, १. वीरमरण २. युद्ध प्रसंग ३. इष्टदेवता पूजन अश्याप्रकारचे शिल्पांकन या तिन भागावर कोरलेले आहेत. खालच्या सर्वात शेवटच्या भागात विरगतीस प्राप्त झालेला वीर आडवा दाखवलेला असून त्यावर अप्सरा सदृश्य व्यक्ती हातात हार घेतलेल्या अवस्थेत दाखवलेल्या आहेत. त्या वरील भागात युद्धाचा प्रसंग कोरलेला असून. मुख्य योद्धा समोरील शत्रूंसोबत लढत असण्याचा प्रसंग कोरलेला आहे. युद्ध पायदळ प्रकारातील असून वीर हातात तलवार घेऊन लढत आहे. शत्रू चे दोन सैनिकी हातात ढाल तलवार घेऊन वीरा सोबत युद्ध करताना आपल्याला यात बघायला मिळते.
सर्वात वरच्या भागात विर आपल्या इष्टदेवतेचे पूजन करताना दाखवलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या बाजूंच्या चौकटीत वीर शिवलिंगाची उपासना करताना दाखवलेले आहेत. या वरून हे दोन वीर शिवाचे उपासक असावेत असे अनुमान काढता येते. शिवलिंगासमोर नमस्कार मुद्रेत बसलेला वीर, त्याशेजारी नंदी, आणि समोरील बाजूस पुजारी पूजा करत असल्याचे पाहायला मिळते.
दुसऱ्या बाजूला इष्टदेवता म्हणून श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. वीर मूर्तीच्या पायाजवळ बसून आपली इष्टदेवता गणेशाला वंदन करत आहे. यावरून हा वीर श्री गणेशाचा उपासक असावा.
तिसऱ्या बाजूच्या चौकटीत श्री विष्णू ची समपद मूर्ती असून वीर मूर्तीच्या पायाजवळ नमस्कार मुद्रेत बसून आपली इष्टदेवता श्री विष्णू ला वंदन करत आहे. अश्या प्रकारची दुर्मिळ वीरगळ अभ्यासक आणि पर्यटकांच्या नजरेतुन सुटून अशी धूळखात पडणे खरंच शोकांतिका होती. वीरगळ संवर्धनाच्या या कार्यामुळे कुकडेश्वर आणि जुन्नर च्या ऐतिहासिक खजिन्यामध्ये अजूनच भर पडलेली आहे.”
श्रद्धा घनःश्याम हांडे
युवा मराठा फाउंडेशन