चतुःशृंगी देवी मंदिर, पुणे –
पुण्याच्या वायव्येस सेनापती बापट रस्त्यावर चतुःशृंगी देवीचे मंदिर आहे. सुमारे २०० – २५० वर्षांपूर्वी सवाई माधवरावांच्या काळात पुण्यात दुर्लभशेट पितांबरदास महाजन नावाचे एक मोठे सावकार रहात होते. वेळप्रसंगी ते पेशव्यांना कर्जसुद्धा देत असत. त्यांना दरबारात मान होता, पालखीचा सरंजामही होता. तसेच सरकारी टांकसाळीचा मक्ताही त्यांच्याकडे होता. ते खूप धार्मिक गृहस्थ आणि सप्तशृंगी देवीचे भक्त होते. दरवर्षी ते सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी वणीला जात असत. उतारवयात त्यांना प्रवासाची दगदग सोसेनाशी झाली, त्यांना या वारीची चिंता लागून राहिली. त्यांनी देवीची प्रार्थना करून यावर उपाय विचारला. तेव्हा देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले की, “पुण्याजवळच एका डोंगरात माझे स्थान आहे. त्या स्थानावर सापडणाऱ्या मूर्तीलाच माझ्या जागी समजून नित्य पूजा-अर्चा करत गेलास, तर प्रतिवर्षी वारी करायची आवश्यकता नाही.” दुर्लभशेटनी लगेच त्यांच्या नोकरांना ती जागा शोधायला पाठवले.
देवीने वर्णन केलेल्या जागी खोदल्यावर त्यांना तिथे चतु:श्रुंगी देवीची स्वयंभू मनोहारी मूर्ती सापडली. हेच आपले भक्तिस्थळ असे समजून त्यांनी या मूर्तीला सुंदर छोटेखानी मंदिराचे कोंदण इ.स. १७८६ मध्ये बांधले आणि नित्य पूजा-अर्चा करण्यासाठी पुजारी नेमले. मंदिर बांधल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ त्यांनी चतरसिंगी (चतु:श्रृंगी) हे रुपयाचे नवे नाणे पाडले. पेशवे रोजनिशीत या चलनी नाण्याचे उल्लेख आढळतात. इ.स. १७८८ च्या जमाखर्चाच्या नोंदीत ‘चतरसिंगी रुपया’ अशी नोंदही आहे. दुर्लभशेठ यांच्या नंतर दस्तगीर गोसावी आणि त्यांच्या शिष्यांनी या मंदिराची व्यवस्था पहिली. कालांतराने ती व्यवस्था अनगळ घराणे पाहू लागले. सध्या या मंदिराची व्यवस्था चतु:श्रृंगी देवस्थान समिती बघते.
सेनापती बापट रस्त्यावर असणाऱ्या कमानीतून आत गेल्यावर विस्तीर्ण पटांगण आहे. पुढे गेल्यावर डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत डौलदारपणे वर जाणाऱ्या दगडी पायऱ्या आहेत. रस्त्यात मध्ये एक गणपतीचे मंदिर आहे. ते मंदिर कधी बांधले याची माहिती उपलब्ध नाही. पण इ. स. १८१० मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पुत्रजन्माच्या सोहळ्यानिमित्त पुण्यातील आणि परिसरातील सर्वच लहान-थोर देवस्थानांना श्रीफल, विडा आणि दक्षिणा पाठवली. त्या यादीत या गणपतीचा उल्लेख आहे. बाजूने वर गेल्यावर ९० फुट उंच आणि १२५ फुट रुंद देवीचे टुमदार देऊळ लागते. मागे उभ्या कातळात प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे. वरून पुण्याचे मनोहारी दर्शन घडते.
संदर्भ:
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां.ग.महाजन
पत्ता :
https://goo.gl/maps/mK3Tf9cr7WsJfGqn6
आठवणी इतिहासाच्या FB Page