महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,574

गोव्याचे पोर्तुगीज आणि कोल्हापूरच्या छत्रपतींचे वाढते सामर्थ्य!

By Discover Maharashtra Views: 2411 3 Min Read

गोव्याचे पोर्तुगीज आणि कोल्हापूरच्या छत्रपतींचे वाढते सामर्थ्य –

भाऊबंदकीच्या काळात छत्रपती संभाजीराजे व छत्रपती शाहू महाराज यांच्या फौजा एकमेकांच्या प्रदेशांवर वारंवार आक्रमण करीत होत्या. याची झळ पोर्तुगीजांनाही बसत होती. सन १७३१ साली वारणेचा तह होऊन ही यादवी संपुष्टात आली. या तहाविषयी गोव्याचे पोर्तुगीज व्हाइसरॉय आपल्या पोर्तुगालच्या राजाला कळविताना लिहितो, “राज्यकर्त्या छत्रपती घराण्याच्या दोन शाखा आहेत. साताऱ्याचे शाहूराजे आणि त्यांचे चुलत बंधू कोल्हापूरचे संभाजीराजे…. संभाजीराजे यांच्या राज्यास तुळाजी आंग्रे याच्या अमलाखालच्या प्रदेशापासून प्रारंभ होऊन ते कर्नाटकाच्या शेवटच्या सीमेस भिडले आहे. सबंध कोकण या राज्यात मोडते. आंग्रे, वाडीकर सावंत आणि गोवा प्रांत संभाजीराजे यांच्या अधिसत्तेखाली येतो, अशी समजूत आहे. मात्र आम्ही संभाजीराजे यांचे मांडलिकत्व मान्य केलेले नाही, की आम्ही त्यांना खंडणीही भरत नाही. परंतु सोंधे आणि कर्नाटक ही दोन्ही राज्ये त्यांना खंडणी भरतात.”

कोल्हापूरच्या छत्रपतींची अधिसत्ता आम्ही मान्य केलेली नाही व आम्ही त्यांना खंडणीही भरत नाही असे म्हणणाऱ्या पोर्तुगीजांची हि परिस्थिती कायम राहिली नाही. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर गादीवर आलेले छत्रपती दुसरे शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची झळ पोर्तुगीजांस इतकी बसली, कि त्यांना कोल्हापूरच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य तर करावीच लागली, शिवाय छत्रपतींकडून कोणताही प्रस्ताव नसतानाही पोर्तुगीजांनी स्वतःहून छत्रपतींशी तह केला व छत्रपतींकडे खंडणी भरुन त्यांचे मांडलिकत्व पत्करले.

शककर्ते शिवरायांचे पणतू असणारे कोल्हापूरचे दुसरे शिवाजी महाराज यांनी सन १७९६ च्या मध्यावधीस ‘कर्नाटक मोहीम’ उघडली. स्वतः छत्रपती शिवाजीराजे व त्यांच्या सरदारांनी अनेक ठाणी, संस्थाने जिंकून लाखो रुपयांची दौलत स्वराज्यात आणली. छत्रपतींची कर्नाटकातील हि विजयी मोहीम पाहून गोव्याच्या पोर्तुगीजांनी कोल्हापूरच्या छत्रपतींचा चांगलाच धसका घेतला. सन १७९७ साली छत्रपतींनी गोव्याविरुद्ध मोहिम हाती घेण्याचे ठरवले. मात्र दरम्यान पटवर्धनांनी कोल्हापूरवर हल्ला करण्याची तयारी चालविली होती, त्यामुळे छत्रपतींच्या फौजा तूर्तास तरी गोव्याकडे वळल्या नाहीत. पण छत्रपतींच्या विजयी मोहिमेचा धसका घेतलेल्या पोर्तुगीजांनी स्वतःहून आपला प्रतिनिधी छत्रपतींकडे पाठवून छत्रपतींशी तह केला. या तहान्वये पोर्तुगीजांनी छत्रपतींना दरसाल खंडणी देण्याचे मान्य करुन आजपर्यंत छत्रपतींचे घेतलेले सर्व किल्ले व मुलूख छत्रपतींना परत दिले.

काही वर्षांपूर्वी जेव्हा सातारा व कोल्हापूर या राज्यांची स्थापना झाली तेव्हा कोल्हापूरच्या छत्रपतींची अधिसत्ता आम्ही मानत नाही असे म्हणणाऱ्या गोवेकर पोर्तुगीजांवर स्वतःहून कोल्हापूरच्या छत्रपतींचे मांडलिकत्व पत्करण्याची वेळ आली, यावरुन कोल्हापूर राज्याच्या स्थापनेनंतर कोल्हापूर छत्रपतींच्या वाढत गेलेल्या लष्करी सामर्थ्याची प्रचिती येते.

Karvir Riyasat 

Leave a Comment