धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२…
हळुवार हातांनी राजांनी सखूच्या हाती शंभूबाळांना दिले. देव्हाऱ्याजवळ हातांत निरांजने घेऊन उभ्या असलेल्या सईबाईच्याकडे त्यांची नजर गेली. सईबाई मंद हसत होत्या!
तबकातील निरांजनाच्या ज्योतींसारख्या त्यांना हसताना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांच्याजवळ जात राजांनी विचारले, “हसलातशा? ”
सईबाई मंदशा हसल्या. शंभूबाळांनी राजांची दाढी मुठीत पकडली त्याचे त्यांना हसू येत होते आजवर कुणाचाही हात त्यांनी राजांच्या दाढीला भिडलेला पाहिला
नव्हता. पण हे राजांना कसे सांगावे तेच त्यांना कळेना!
“स्वारीचं येणं होतं तेवढंच आमचं हसणं!” सईबाईनी गनिमी कावा केला!
राजांच्या कपाळी कुंकमतिलक भरला. थरथरत्या हातांनी त्यांच्या या मुद्रेभोवती
तबकातील ज्योती फिरविल्या. सईबाईना पाहताना राजांनाजाणवून गेले की, शंभूबाळांनी चांगले अंग धरले आहे तेवढेच सईबाईनी आपले अंग टाकले आहे.
“बाळराजांचं उष्टावण होणं आहे. फलटणला दादासाहेबांना आवतन -”
सईबाईचे बोल अर्धवटच राहिले.
“ते होईल. तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्याची तयारी ठेवा. तिथली हवा
तुम्हास मानवेल.” राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सल बाहेर काढला.
सईबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले. हातातील निरांजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत म्हणून त्यांनी वाकून देव्हाऱ्यासमोरच्या
चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले.
राजांनी त्यांची कातरता हेरली. न राहवून ते भावभरल्या आवाजात म्हणाले,
“सई, दिल टाकू नका! ”
आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या थबथबत्या शब्दांनी सईबाईचा बांध फुटला! घशातून हमसून येणारे हुंदके रोधण्याचा पराकाष्ठेचा यत्न करूनही ते थांबत
नव्हते. विचित्र कंठदाटल्या शब्दांत त्या बोलल्या, “आमचा भरोसा नाही! बाळाच्या मासाहेब धाराऊ! त्यांऊना त्यांच्या दुधासाठी स्वारींनी काही तैनात लावून द्यावी! ”
त्या बोलांनी राजे सुन्न झाले. त्यांना काही बोलवत नव्हते. जीवनातील काही सत्येच अशी असतात की, त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे असते!
“येतो आम्ही.” म्हणत राजे वळले. चारी मुले खेळात रमली होती.
महालाबाहेर पडलेल्या राजांच्या मनात सईबाईच्या बोलांनी दौड धरली होती.
“आता आमचा भरोसा नाही! भरोसा नाही! ‘
आणि कुठूनतरी अगदी खोल दरीतून यावा तसा एक आवाज त्यांना ऐकू येऊ
लागला, ‘सैतानकी बनायी सबसे ‘ऐबी ‘ वस्त ‘मौत है सैस! ‘
नेताजीराव, आबाजी महादेव, येसाजी कंक यांच्या संगती राजे राजगड चढू लागले. गडाच्या पालीदरवाजातून पालखी पार होताना नौबत दुडदुडली. तिच्या
आवाजाने पद्मावती माचीवरच्या निशाणबारदारांना आपोआप इशारत मिळाली. त्यांनी लगबगीने निशाणचौथऱ्यावर भगव्या जरीपटक्याचा ध्वजदंड उभा केला.
पालखीत बसूनच राजांनी पद्मावती माचीवर आपली नजर जोडली होती. क्षणात त्यांना आभाळाच्या निळ्याशार टाक्यावर डुलणारा जरीपटक्याचा लहान भगवा राजहंस
दिस लागत लागला! गडमाथ्यावरचा फडफडणारा जरीपटका बघताना नेहमीच आपल्या जामा काखेजवळ दाटत जातो, असे राजांना वाटत आले होते. आत्ताही त्यांना
तसेच वाटले. छातीजवळ उजव्या हाताची बोटे नेत त्यांनी गडमाचीवर डुलणाऱ्या भगव्या
राजहंसाला पालखीतूनच वंदन केले.
गडावरच्या पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा सुवेळा या तिन्ही माच्यांवरून गेले आठ
दिवस नवनव्या असामी वाहत होत्या थैलीस्वार धाडून साऱ्या खाशांना
राजगडावर पेश होण्याची फर्माने दिली होती
कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, मानाजी भोसले, सोनोपंत डबीर, तान्हाजी
मालुसरे, रघुनाथ बल्लाळ अत्रे, बाजी सर्जेराव, निळोपंत आणि रामचंद्रपंत बहुलकर,
संभाजी कावजी, सुभानजी इंगळे सारी मंडळी जरोरीने गडदाखल झाली होती. आणि
साऱ्यांना बलावू धाडण्यात राजांचा काय मनसुबा असावा याची खलबते करीत होती.
राजांची पालखी पद्मावती माचीवरच्या सदरमहालासमोर ठाण झाली. राजांना साऱ्यांनी अदबमुजरे घातले. हे मुजरे आपलेसे करताना राजांची उभट मुद्रा उजळून निघाली. दौडीत ठिकठिकाणी भेटणारी मंडळी आज इथं राजगडावर एका जमावाने दिसत होती.
सर्वांसह माचीच्या सदरमहालाकडे जात असतानाच राजांनी प्रमुख तटसरनौबत
सिदोजी थोपट्यांना सदर दरबाराचा बेत सांगितला. वासुदेवपंत हणमंतेंना मरातबाच्या
साजाची सरपोसबंद तबके सिद्ध करण्याची सूचना दिली.
श्रीसांबाचे आणि पद्यावतीदेवीचे दर्शन घेऊन आलेले राजे सदर बैठकीवर सुखावले. सर्व मंडळींना त्यांनी बसण्यासाठी हाताची इशारत केली. सदर बसली.
राजांनी पुजाऱ्याने पेश केलेल्या परडीतील भवानीचा भंडारा चिमटीत घेऊन ती चिमट ‘जगदंब जगदंब ‘ म्हणत सदरेसमोर उधळली. दुसऱ्या चिमटीने भंडारा
कपाळावरच्या शिवगंधावर घेतला. चिमटीची दोन्ही बोटे आपल्या गळ्याला टेकविली भंडाऱ्याची भली थोरली परडी साऱ्या सदरभर फिरली. मानकऱ्यांनी आपले मळवट
भंडाऱ्याने भरून घेतले. राजांनी आपल्या मनचा हेतू खुला केला –
“एक तपापूर्वी रायरेश्वरावर आम्ही श्रींचे राज्यास आणभाकेने बांधील जालो. उमर कवळी असता, दिमतीला मूठभर असामी असता आम्ही अगस्तीचा मनशा बोलून
गेलो! आजवर श्रीसांब येश देणार थोर जाले, एकट्याने बांधू म्हणता राहणीचे साधे घरटे बांधणेही साध्य नच होय! ये तो श्रींचे गोमट्या राज्याची बाबत! आमचे दोन हात कैसा
नतीजा पावावेत? एक म्हणता दहा हात आमच्या पाठीशी आले. पोख्तांचे जाणते बोल आम्हास मार्गी लावते जाले. आऊसाहेबांचे मायेचे हात धीर-दिलासा आणि डोळे
आशीर्वाद देत आले. आज आम्हास याद येते; ती आमच्या दादोजींची – बाजी पासलकरांची!” क्षणभर राजांचा आवाज घोगरा झाला.
“तुम्ही साऱ्यांनी अंगेजणीने कस्त केली म्हणोन श्रींचे राज्याने अंग धरले. आज चाळीस गटकोटांवर जरीपटका चढला! दहा हजारांवर पाऊलोक आणि तितुकाच
घोडालोकांचा जमाव जमला. आम्हास साऱ्यांची कदर करणे आहे, म्हणोन ही सदर आम्ही
बोलावली! जैसी साध्य होय तैसी कदर आज आम्ही करतो आहोत. याहून तुमची जाणती कदर श्री आमचे हातून करवून घेणार. ये समयी कोणास आमचे हातून गैरमरातब
जाहलियास श्रीसाठी मन मोठे केले पाहिजे. आम्हास आपले लेकरू मानिले पाहिजे.
समस्तांनी लेकरास आसरा दिल्हा पाहिजे!! ”
जंगमैदानावर कंठाची घाटी फुलवून “हर हर महादेव ‘ गर्जत गनिमावर तुटून पडणाऱ्या शिवाजीराजांचेच हे दुसरे रूप होते! ते पाहून सदरेवरच्या बाराबंद्यांतील रांगडी मने हेलावून गेली
क्रमशः………..!
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव