महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,799

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३

By Discover Maharashtra Views: 3751 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३…

राजे बैठकीवर उभे राहिले. तलवारीच्या पात्यासारखे त्यांचे रक्तजागते बाकदार सतेज नाक नजर खेचून घेत होते. राजांनी सदर बैठकीवर बसलेल्या नेताजीराव
पालकरांना अभिमानाने साद घातली – “नेताजीराव, आमच्या सामने या. ”

नेताजीराव राजांच्या समोर आले. कमरेत वाकून त्यांनी राजांना मुजरा घातला.
कारभाऱ्यांनी हाती धरलेल्या तबकावरचा सरपोस दूर केला. तबकात रत्नजडित मुठीची म्यानबंद तलवार, तुरेवाली कंगणीदार भगवी पगडी, शुभ्र बाराबंदी आणि मांडचोळणा होता. राजांनी तबकातील तलवार उचलली. तिच्या फासबंदाची गाठ नेताजीरावांच्या कमरेभोवती बांधीत ते तळपत्या डोळ्यांनी म्हणाले

“सुभेदार नेताजी आजपासून श्रींच्या राज्याचे सरनौबत झाले. ”

गहिवरलेले नेताजीराव राजांचे पाय शिवण्यासाठी वाकू लागले. झटकन त्यांचे खांदे आपल्या हातांनी थोपवीत राजांनी त्यांना वर घेतले. क्षणभर नेताजीरावांवर आपली
सूर्यपेट नजर जोडून राजांनी प्रेमभराने त्यांना मिठी भरली!

निळो सोनदेवांना मुजुमदारीची, आबाजी महादेवांना सुरनिशीची वस्त्रे राजांनी अशीच बहाल केली. येसाजी कंकांना पायदळाचे सरनौबत म्हणून रत्नजडित तलवार
बांधली. कुणाला चांदीचे तोडे, कुणाला कडे, कुणाला कट्यार, कुणाला तलवार अशी साऱ्यांच्या इमानी चाकरीची कदर राजांनी केली.

स्वतःसाठी गुणवंत आणि भोवतीच्या मंडळींसाठी गुणपारखी असा तो राजा होता. तो साऱ्यांची कदर करीत होता, पण सदरेवरचा त्यांचा एक-एक बोल ऐकूनच सारे धन्य झाले होते. त्याच्या एका-एका बोलासाठी जान कुर्बान करण्याची सर्वांची कमरबंद तैय्यारी होती. कदर दरबार सरला.

राजगडाच्या कारभाऱ्यांनी बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा नुकताच सुघड बनविलेला नवा साचा दिला. राजांनी तो निरखायला सुरुवात केली. त्या अष्टकोनी मुद्रेवर उलट्या साचेबंदात कोरीव अक्षरे होती –

‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।’

ती चंद्ररेखेची मुद्रा पाहताना राजांना सईबाईची याद झाली. त्यांनी नवे मुजुमदार निळो सोनदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले. दमगीर झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले, “मुजुमदार, आमच्या कबिल्याकडे कापूरहोळाच्या गाड्यांची धाराऊ आहे. तिला सालिना सव्वीस होन तैनात जोडून द्या! जातीनिशी तुम्ही ते होन पावते
करीत चला.”

सदर उठली! राजे बैठकीवरून उठले आणि महालात गेले. आपल्या फर्जद शंभूला दूधआई जोडून द्यावी लागली; त्या दूधआईला तैनात तोडून द्यावी लागली. या बाबींचा
सल राजांच्या मनाला लागून राहिला.

आता शंभूबाळ एक-एक पाय टाकीत चालू लागले होते. जिजाबाईंनी त्यांच्या उष्टावणासाठी फलटणला हारकारा धाडून बजाजी निबाळकरांना निरोप दिला.

बजाजी शिवापट्टणात आले. शंभूबाळांचे ते मामा होते. बळजबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना राजांनी पुन्हा शास्त्रपूत हिंदू करून घेतले होते. निंबाळकरांच्या
महादजी या मुलाला सईबाईची सखू ही थोरली मुलगी देऊन राजांनी त्यांना समाजात ठाव दिला होता. सखू लहान असल्यामुळे अजून माहेरीच होती. भाच्याचे उष्टावण आणि सुनेचे दर्शन ह्या दोन्ही हेतूंनी बजाजी शिवापट्टणात दाखल झाले.

ज्योतिष्याकडून जिजाबाईनी चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढला. त्या दिवशी चंदनी पाटावर बसून बजाजींनी शंभूबाळांना आपल्या उजव्या मांडीवर घेतले. शेजारी
जिजाबाई, सईबाई, धाराऊ आणि सारा राणीवसा होता.

हातातील अंगठी काढून बजाजींनी चांदीच्या वाटीतील खिरीत ती बुडविली. आणि त्या अंगठीने आपल्या भाच्याला खीर चाटविली. शंभूबाळांना सईबाईच्या हाती
देऊन पाटावरून ते उठले. ती खीरमाखली अंगठी मामाची भाच्याला उष्टावण्याची भेट म्हणून पाटावर ठेवली. शंभूबाळ आता खाते झाले!

जिथे “बाकी’चा हिसाबच नाही, असे राजांच्या आणि सईबाईच्या हयातीचे भोवरे एकमेकांभोवती आजवर फिरले होते! आता सईबाईचा भोवरा भेलकांडायला लागला होता. त्यांच्या पायातील भिंगरी सरत आल्यागत झाली. सईबाईची तबियत सुधारेना म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांना हवाफेरासाठी प्रतापगडावर
हलवायचे ठरविले. संगती खाशा जिजाबाई जाणार होत्या.

शंभूबाळ आता दीड वर्षांचे झाले होते. बोबड्या बोलात बोलू लागले होते. वाडाभर धावत होते. धाराऊचा त्यांना लळा लागला. तिचे काही कुणबाऊ शब्द त्यांनी
मावळी लकबीसह उचलले. राजांना ते ‘आबा’ म्हणू लागले. सईबाईंना “माँ* आणि ‘आऊ’ म्हणत बिलगू लागले. राजांच्या आजानुबाहूचे – गुडघ्याखाली आलेल्या हाताचे बोट पकडून पुढे-पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले. शंभूबाळ हे राजांच्या विसाव्याचे छोटेखानी ठाणे झाले. ते डोळ्यांआड होऊ नयेत, असे राजांना वाटत होते. पण सईबाईना हलविण्याचा बेत ठरताच शंभूबाळाला पाठविणे भाग होते.

एके दिवशी कबिल्याचे मेणे तयार झाले. राजगडावरून राजे शिवापट्टणच्या महालात आले. देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई, सईबाई, धाराऊ, शंभूबाळ आणि मुलींना
घेऊन महालाबाहेर पडू लागल्या. राजांनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले.

“आम्ही संगती आहोत. चिंता कराया कारण नाही.” जिजाबाईंनी राजांना धीर दिला.

राजांनी धाराऊचे बोट पकडलेल्या शंभूबाळांच्या काखेत हात घालून त्यांना वर उचलून घेतले. त्यांच्या शिवगंध रेखलेल्या सतेज कपाळावर आपले ओठ टेकले. त्यांच्या
चिमुकल्या; पण निर्भीड डोळ्यांत आपले डोळे घालून त्यांना हसत विचारले, “शंभूबाळ, चालत-चालत प्रतापगड चढाल?”

“हां आबा, आमी पलत-पलत गल चडू!” शंभूबाळ डोळे मोठ्ठे करून बोलले.
राजांनी त्यांची पाठ थोपटीत त्यांना खाली उतरवले.

त्यांना आपल्याजवळ ओढून त्यांची हनुवटी वर उचलीत जिजाबाई बोलल्या. गंगेच्या शांत-विशाल पात्राने बिलगत्या खळाळ ओढ्याला बोलाव्या तशा! “बाळ शंभू,
आबांच्या पायांवर डोई ठेवायची ना?”

बाळराजांनी होकाराची मान डोलावली. जिजाबाईना सोडून राजांच्या पायाजवळच्या फरसबंदीवर आपले चिमुकले गुडघे आणि हात टेकून वरच्या
आकाशाएवढ्या उंच आबांकडे पाहत ते म्हणाले, “आबा, आमी मुजला कलतो. जय भवानी!” आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या या पायांच्या सडक बोटांवर टेकविले. त्या स्पर्शाने क्षणभर राजांचे डोळे मिटले गेले.

कबिला मेण्यात बसला. भोयांनी भाईइर्पट सावरीत मेणे उचलले. राजे कबिल्याबरोबर चार पावले चालत गेले. मग जखडबंद पावलांनी खिळलेले राजे एकटक
नजरेने दूर जाणाऱ्या मेण्यांकडे पाहत राहिले. शंभूबाळांचे बोबडे बोल आठवताना ते स्वत:ला म्हणत होते – “केवढा अजाण आणि लाघवी पोर! तो माँसाहेबांना बिलगून उभा
राहिलेला पाहताना आमचे “असणे’ आम्हीच हरवून गेलो आहोत, असे आम्हांस वाटते!”

जावळी खोऱ्यातील प्रतापगड नजरटप्प्यात आला. गडाच्या पायऱ्या चढताना
हातातील थोपे टेकीत भोयांनी मेणे सुखचाल केले.

गडाच्या तटबांधकामात दर्शन दिलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे स्थान आले. मोरोपंतांनी त्या शिवलिंगावर आता डौलदार घुमटी उभारली होती. त्या घुमटीवर एक जाईचा वेल चौलग पसरला होता. जिजाबाई आणि सईबाई मेणाउतार झाल्या.
शंभूबाळांना घेऊन धाराऊ उतरली. सारीजण दर्शनासाठी घुमटीत गेले. सईबाईनी त्या स्वयंभूसमोर आपल्या शंभूला माथा टेकायला सांगितले.

शिवलिंगाचे दर्शन घेताना सईबाईचे डोळे क्षणभर मिटले गेले. शब्द नसलेल्या ज्या भाषेत हिंदू कुलस्त्री देवमूर्तीशी बोलते त्या भाषेत त्या बोलल्या, “आमच्या स्वारींना
उदंड येश द्या. आमच्या बाळांना जपा!”

क्रमशः………..!

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment