महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,79,131

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४

Views: 3753
6 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४…

भावभरले डोळे उघडून समोरच्या शिवलिंगावरचे एक त्रिदळी बिल्वपत्र उचलून ते मळवटभरल्या कपाळाला लावताना कसा कुणास ठाऊक; पण एक मजेदार विचार
त्यांच्या मनात डोकावला, ‘हे त्रिदळ म्हणजे शंकर-पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती असे खुणेचे तर नसेल!’

गडमाथ्यावर येताच सईबाईंना फार बरे वाटले. हा गड त्यांना आवडला. चौतर्फा निळसर-हिरवागार मुलूख आणि त्याला बिलगलेले पिवळे ऊन डोळासुख देणारे होते.

सामोरे येण्यासाठी आलेल्या मोरोपंत पेशवे आणि अर्जोजी यादव यांनी जिजाबाई आणि सईबाईना अदबमुजरे घातले. प्रतापगडावर येणाऱ्या सईबाई ह्या भोसलेकुलीच्या
पहिल्याच लेकुरवाळ्या राजस्त्री होत्या. मोरोपंतांनी त्यासाठी त्यांच्यावरून सुवासिनींकडून मोहोरांचा सतका उतरून घेतला.

सासवडच्या हरभट ज्योतिष्यांचा चालता बोलता प्रतापी रुद्र – शंभूबाळ; प्रतापगडावर दाखल झाला!

हवेसाठी कधी-कधी सईबाई आणि धाराऊ शंभूबाळांना घेऊन तटावरून फेरफटका करीत. गडाभोवतीची घनदाट गचपणाची हिरवी झाडी बघताना सईबाईना जाणवून जाई, “केवढ्या औषधी वनस्पती ह्या झाडोऱ्यात लपल्या असतील ! आम्हास मात्र एकही गुणकारी लाभत नाही! माणूस भरल्या समुद्रात असतं, पण तहानेच्या समयास एक
थेंबसुद्धा हाताशी येत नाही. तशीच ही गत!’

आताशा सईबाईचे मन कुठल्याच एका बाबीवर स्थिरावत नव्हते. गडमाथ्यावरच्या आभाळात तरंगणाऱ्या पाकोळीने कारण नसता दिशा बदलून फिरकी घ्यावी, तशी त्यांच्या मनाची गत झाली होती. जवळ-जवळ येणारे काहीतरी ते सुचवू पाहत होते, दूर-दूर जाणारे काहीतरी घट्ट पकडून ठेवण्याचा यत्न करीत होते.

धाराऊ आणि शंभूबाळ मात्र आता एकमेकांत रमले होते. बाळराजांना घेऊन गडावरच्या देवळांच्या घुमटीतील घंटा वाजवून दाखविणे, ही तर धाराऊची रोजची एक
कामगिरीच झाली होती. कधी-कधी बाळराजे हात उंचावून आपणच घंटा वाजविण्याचा हट्ट घेत. कितीतरी वेळ मग शंभूबाळ घंटानादातच रमून जात.

हिवाळा हटला. रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले. वैद्याकडून हरतऱ्हेच्या दवामात्रा जिजाऊ सईबाईंना देत होत्या. उगाळलेल्या मात्रा कणाकणाने झिजत होत्या.
सईबाईही तशाच झिजत चालल्या. क्षणभर शंभूबाळांना उचलून घेतले, तरी त्यांचे हात भरून येऊ लागले.

उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईना थोडे बरे वाटले. पण अंग काही धरले नाही. गडावरची होळी उदासपणे पेटून विझली. मोरोपंत, अर्जोजी, वैद्य, जिजाबाई
साऱ्यांना सईबाईचे डोळादेखत विझणारे अंग पाहून उरात सलू लागले. जिजाबाईंनी व्रत- वैकल्ये, उपवास सुरू केले. अंगारे, धुपारे, लिंब-लोण सारे सईबाईच्यापुढे हरत होते.
उन्हाळा सरत आला. वळिवाचे ढग एक-दोन वेळा आभाळाच्या पाठीवर आपले कडकडणारे कोरडे ओढून त्यांच्या डोळ्यांतून पाणी काढून गेले.

मृग जवळ आला. आभाळाचा ऊर दाटून आला. पावसाच्या सरींची पहिली टिपरी प्रतापगडावर तडतडली. गडवाऱ्याने गारठा कवटाळला. घोंघावत त्याने झाडांच्या
पानभऱ्या फांद्यांना उलट-पालटे करून टाकले. त्या वाऱ्याच्या थंडगार बोचऱ्या दौडी अंगावर उतरताच सईबाईच्या दुबळ्या कायेवर सरसरून काटा तरारला. त्यांनी अंथरूण धरले! राजगडाकडे राजांना खबर पोच झाली.

सईबाईंनी सगळ्यांशी बोलणे टाकले. गडाच्या तटबंदीवर पाऊसधारा कोसळत होत्या, सईबाईंच्या मनात विचारलोट धावत होते. पाणथळावरील आपल्या लांबट घरट्याशी बया पक्षिणीने एकटेच किलबिलत बसावे, तसे त्यांचे मन स्वत:त शिरून फक्त राजांच्या आठवणींशी बातचीत करू लागले. केवढ्या उदंड आठवणी! मोहरून टाकणाऱ्या,
शरमायला लावणाऱ्या, अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या, हुरहुर लावून हैराण करणाऱ्या, धावणीच्या घोड्याने पाठीवरचा स्वार दूर न्यावा तशा दूर-दूर नेणाऱ्या.
तटबंदीवरून डोकावताना गरगरावे तशा भोवंडायला लावणाऱ्या. दह्याच्या कवड्यांसारख्या मधुर-गोड, चिराखदानातल्या ज्योतीसारख्या सतेज-सुंदर,
दरुणीमहालातल्या तक्तपोशीसारख्या निसूर-निबर, घरभरणीच्या लवंडल्या मापासारख्या ओसंडत्या-उभार, हिंदकळणाऱ्या मोतीलगासारख्या अस्थिर-चंचल,
भवानीच्या भंडाऱ्यासारख्या उदात्त-मंगल! आठवणीच आठवणी!!

▶संकटांना एकमेकांची सावली पकडत चालण्याची उपजतच खोड असावी! सईबाईच्या दुखण्याने निकराचा जोर धरला आहे, ही खबर राजांना कळली. पाठोपाठ
राजांना जेर करून “चढे घोड्यानिशी जिंदा या मुर्दा पेश करतो” अशी कसम खाल्लेला आदिलशाही खानखाना अफजल मोहमदशाही फौजबंद होऊन विजापूरहून कूच झाल्याची खबरही त्यांना लागली.

बडया बेगमेने एका जुम्मा रोजाला बड्या मसलतीसाठी खास दरबार भरविला. दरबारात सिद्दी हिलाल, रुस्तमजमा, अंकुशखान, मुसेखान, राजश्री मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, झुंझारराव घाटगे, पैलवानखान, वानखान, अब्दुल सय्यद सारे नेकदिल जंगबहादूर हात बांधून उभे होते. बेगमेची आगपाखड झाली. गर्दना टाकून शरमिंदे होऊन ते ऐकत होते. कोणीही तगडादिल रुस्तुम बेगमेला तसल्ली द्यायला पुढे सरसावत नव्हता
तिचा शाही घुस्सा शब्दाशब्दांना जाळून टाकीत उफाळला आणि चिडून ती गर्जली –
“क्या इस दरबारमें उस गद्दारे दख्खनसे लोहा लेनेवाला कोई र्‌ मर्द बाकी नहीं रहा? उस अजाजील बगावतखोरको अंजाम देनेवाला अर्काने दौलत कोई भी नहीं? बोलो – इस
दरबारका मर्दाना चुडिया पेहन आया है क्‍्या।… लानत-लानत है!”

बेगमेच्या निर्भर्त्समनेची ही भट्टी एका भटारियाला पेटवून दिली. कमरेच्या
तेगीच्या मुठीवर हाताची मूठ आवळीत खानखाना – अफजलखान पुढे सरसावला
याखालचा तलम रुजामा तुडवीत तो विड्याच्या तबकाजवळ आला. खामोश दरबारावर
नफरतीची सख्त नजर फेकीत बेगमेला बंदगी घालून त्याने झटक्यात विडा उचलला.

मैं – मैं उस नाचीज काफिर घोडेकी सवारी ना तोडतेही जिंदा या मुर्दा दर्बार पेश करता हूँ, हुजूर! या अली मेहेरबान!” त्याने विडा घेतलेला हात अस्मानाकडे उंचावीत
घोगऱ्या सादात कसम खाल्ली!

“आफरीन! अलहम्द अल्लिल्लाह! सुभान ल्ला! मरहब्बा!” चारी बाजूंनी बेहोश चीत्कार दरबारियांत उठले. सगळ्यांना आपणच जणू अफजलखान असून तो विडा आपणच उचलला आहे असा गौर झाला. पण – पण तकदिरीने त्या विडयात कुणाकुणाच्या मौतीची सुपारी पेरून ठेवली होती हे ना बेगमेला, ना अफजलला, ना दरबारीतील एकाही
समशेरजंगाला माहीत होते!

खानाच्या खांद्यावर मरातबाची खरिल्लत चढली. शिरावर किताबांची बरसात बरसली. दरबार बरखास्त झाला. ‘जुम्मा’ रोजाला एक मोठा मनसुबा खडा झाला. खुशीत
दरबारी बाहेर पडले. त्यांना माहीत नव्हते, या ‘जुम्म्याच्या’ पाठीमागे एक दख्खनी ‘शनी’ लागला आहे आणि त्याचे नाव “सिवा?! आहे!

क्रमशः संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment