महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,691

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६

By Discover Maharashtra Views: 3792 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६

आता राजांच्या बाजूने दोनच कदीम, पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते – एक जावळी खोऱ्याचा बेलाग कड्यांचा मोर्चेबंद मुलूख – आणि दुसरा बारा मावळातील
कुणालाही दस्त न होणारा पावसाळा!

खानाचा पाणलोट थोपविण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडणेच भाग होते. किल्लेश्वरीचे आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाची पद्मावती माची
उतरू लागले. गडाच्या बंदिस्तीसाठी फिरंगोजी नरसाळा, गोमाजी पाणसंबळ, सिदोजी थोपटे ही मंडळी मागे राहणार होती. राजांच्या संगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी जेधे, नातेबंधातले बाबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, नेताजीराव पालकर, येसाजी, मोरोपंत, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे वगैरे मंडळी असणार होती.

सारे गड उतरून शिवापट्टणात आले. राजे जिजाबाईच्या दर्शनासाठी त्यांच्या हुजरातीच्या महालात गेले. जिजाबाई शंभूबाळांना काहीतरी समजावून सांगत होत्या.
राजांना पाहताच त्या थांबल्या. शांतपणे चालत पुढे आल्या. त्यांचे पाय शिवून राजे बोलले, “मुलूखबंदीसाठी आम्ही निघतो आहोत, मासाहेब. खान वाईला ठाण झाला.
आम्ही प्रतापगड पकडावा म्हणतो.”

“या. आता मागचा विचार धरू नका. दास्तानी असलेली मंडळी सोडू नका. सईबाई पडल्या नसत्या तर आम्हीसुद्धा खान बघण्यासाठी खासे आलो असतो! त्याचा एक
हिसाब आमच्या मनी अजून बाकी आहे! जाताना सूनबाईंना भेटा.” क्षणभर जिजाऊ थांबल्या.

“शंभूबाळ, आबांचे पाय शिवा.” जिजाबाईंनी बाळराजांचा खांदा थोपटीत सांगितले.

शंभूबाळांनी राजांच्या पायांवर डोके टेकले. त्यांचे खांदे पकडून त्यांना उठवून जवळ घेत राजांनी त्यांची पाठ हळुवार थोपटली.

👉“खान’ म्हणजे काय आबासाहेब?” बाळराजांनी कपाळाला आठ्या घालीत विचारले. त्या अचानक प्रश्नाचे काय उत्तर द्यावे, ते राजांना सुचेना.

“जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो, पण ज्याला कुणीच खात नाही; त्याला “खान’ म्हणतात शंभूबाळ!” जिजाबाईंनी राजांच्याकडे बघत उत्तर देता-देता बाळराजांना आपल्याजवळ घेतले.

“येतो आम्ही.” राजे घोगऱ्या स्वरात बोलले.
“या. औक्षवंत व्हा!” जिजाऊंनी उजवा हात वर उचलला.
“जय भवानी!” शंभूबाळांनी विसरून राहिलेला मुजऱ्याचा भाग पुरा केला.

▶सईबाईचा निरोप घेण्यासाठी राजे त्यांच्या या महालात आले. महालातल्या मंचकाभोवती काजळी दाटली. चिराखदाने जळत होती. हळुवार पावलांनी मंचकाजवळ
जाऊन राजांनी सईबाईच्याकडे पाहिले. त्या डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांची सावळी चर्या चिराखदानांच्या मंद प्रकाशात फिकट-उदास दिसत होती.

“ऐकता, आम्ही निघालो.” सईबाईनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले. त्यांच्या बोलांनी गाढ ग्लानीतून जाग्या व्हाव्या तशा सईबाई जाग्या झाल्या. त्यांनी हसण्याची कोशिश केली. “बाळ भेटले?” क्षीण आवाजात त्यांनी राजांना विचारले. “हो भेटले. आऊसाहेबांच्या महाली आहेत.” म्हणत राजे मंचकावर टेकले. त्यांनी सईबाईचा काष्ठवत्‌ हात हळुवार आपल्या हातात घेतला. सईबाईंच्या हातातील सोन्याची कंकणे किणकिणत कोपराकडे घरंगळली. त्यांचा हलका हात हातात घेताना राजांचे मन जडशीळ झाले. दोघांचेही बोल जबानीत जिरून गेले. काय बोलायचे? कसे बोलायचे? भाषा सरली होती. नुसते कढ मात्र उरले होते. भोवती पेच दाटले होते!

“सई” राजांनी घोगऱ्या स्वरात साद घालताना त्यांचा हात थोपटला. कोंडी फुटली. शब्दलाटा वाहू लागल्या.

“अंहं, असा दिल नाही टाकायचा. आमचा मार्ग आता ठरला! पायाशी कधी काहीमागणं नाही केलं. हे पाय समोर असताना दुसरं काही मागायचं नाही सुधारलं. आता हे
पाय नजरेसमोर राहतील असं दिसत नाही. म्हणून एक मागणं घालावंसं वाटतं.” बोलता-बोलता सईबाईना खोकल्याची उबळ आली. ती ओसरू देऊन राजे म्हणाले, “कचदिल होऊ नका. मनी असेल ते साफ- साफ
बोला. तुम्ही बऱ्या होणार!”

“बाळराजांना आम्ही जन्म दिला. पण ओठभर दूध देण्यास आमचं आऊपण थिटं पडलं. आमची जागा घेण्यास कुणबीण असून धाराऊ आली, म्हणून बोलावंसं वाटतं.”
सईबाई थांबल्या. क्षणभर त्यांनी पापण्या मिटल्या. त्यामागची काळी वर्तुळे राजांच्या उरात सलली.

“बोला सई. थांबू नका.” राजांचा आवाज घोगरला.

“आमचे शंभूबाळ… एकला जीव. आज स्वारींच्या पदरात घातला! आता स्वारीच त्यांच्या आऊ आणि आबा! हे… हे एवढंच आमचं मागणं.” सईबाईनी भरले डोळे लपविण्यासाठी मान फिरवली. त्यांच्या मिटल्या डोळ्यांतून सुटलेले पाणथेंब मंचकावरच्या बिछायतीवर टपटप ओघळले!

“सई, आम्ही बाळाराजांना तुमच्यासाठी बांधील आहोत. चिंता करू नका. येऊ आम्ही?” म्हणत राजांनी सईबाईचा हात बिछायतीवर हळुवार ठेवला. छातीवरच्या माळेतील कवड्या प्रचंड वजनदार झाल्याचा त्यांना भास झाला. पाठीवर धूळलोट घेऊन मुलखात दौडणारे राजे, सईबाईच्या दालनातून पाठीवर त्यांच्या डोळ्यांतील पाणलोट घेऊन बाहेर पडले!

▶शिवापट्टण सोडून राजांनी पुरंदर, तोरणा, मोहनगड, वर्धनगड, तुंग तिकोना या गडांवरची जातीनिशी जाऊन कडेकोट मोर्चेबंदी उभी केली. कोसळत्या पावसात
जावळीखोरे चौक्या-पहाऱ्यांनी आवळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळींसह प्रतापगडावर आले.

बाहेर गुंजणमावळ, कानंदखोरे आणि वेळखंडखोरे या मावळी मुलखाची पट्टी सरत्या पावसात भराला आली होती. गुंजवणी आणि कानंदी नद्यांच्या लाल पात्रांची बोटे
सौभाग्यलेणे म्हणून तिने मळवटावर भरली होती. या मुलूखपट्टीला अहेव राहायचा खूप सोस! मळवट भरलेला असला की, ती कैक मरणांना हसत-हसत पदराच्या गाठीला बांधायला तैयार! असेच एक मरण सईबाई राजगडावरच्या दरुणीमहालात आपल्या पदराशी
बांधण्यात गुंतल्या होत्या. त्यांच्या मंचकाभोवती जिजाऊसाहेब, राजांचा साऱ्या राण्यांचा राणीवसा, धाराऊ व सखू, राणू, अंबा या सईबाईच्या मुली आणि सव्वादोन वर्षांचे शंभूबाळ दाटले होते. शंभूबाळांचा छोटेखानी हात आपल्या कृश हातात घेऊन सईबाई डोळे मिटून पडून होत्या. त्यांच्या कपाळभर आडवे माखलेले सौभाग्यलेण्याचे कुंकू होते ओठांत धाराऊने ठेवलेले गंगाजलात न्हालेले सावळे तुळशीपत्र होते. महालातील
चिराखदाने काजळली होती. त्या उदासमंद प्रकाशात साऱ्यांच्या मुद्रा फिकरमंद दिसत होत्या. राजगडाच्या उभार माथ्यावरचे आभाळ काळवंडले होते. मिटल्या डोळ्यांच्या सईबाईंना या कशाकशाचे भान नव्हते. त्यांचे सोशीक, सावळे मन आज एक आगळाच खेळ खेळत होते. आजवर मनाचा हा असला खेळ त्यांनी कधी, कधीच पाहिला नव्हता.

“सई’च्या असंख्य सावल्या पकडण्याचा ते प्रयत्न करीत होते! खेळ ऐन भराला आला होता. असंख्य सावल्या नाचत होत्या. सईबाईचे भान हरपत चालले होते.
किती उदंड सावल्या! फलटणच्या मुधोजीबाबांच्या वाड्यातील परकरी सई, पुण्याच्या लालमहालात भोसल्यांची सूनबाई म्हणून आलेली बावरलेली सई, जिजाबाईंना “आऊ? म्हणून बिलगताना अगदी सहज त्यांची लेक झालेली सई, सईच्या नकळतच
“सईबाई” झालेली सई, राजांच्या वाढत्या राणीवशाबरोबर ‘थोरल्या आक्का’ झालेली सई, सखूच्या लग्नात सासूबाई झालेली सई, राजांचे मंत्री, सुभेदार, सरनौबत यांनी
“राणीसरकार’ म्हणून अदबमुजरे रुजू केलेली सई, राजांच्या पहिल्यावहिल्या बाळांची – शंभूची आऊ झालेली कृतार्थ सई. किती-किती म्हणून सावल्या सईबाईच्या मिटल्या डोळ्यांना दिसत होत्या. पण… पण त्यांतील एकसुद्धा त्यांच्या हाताशी काही येत नव्हती!

“आम्ही आमची सावलीच हरवून बसलो की काय?” अशी त्यांना शंका आली. आपले सगळे “सईपण’ जिवाच्या निकराने एकवटून त्यांनी स्वत:ला कणाकणात चाचपून पाहिले. फक्त एक… एकच सावली त्यांच्या हाताशी लागत होती. पण… पण ती त्यांची नव्हती. ती होती राजांची – त्यांच्या स्वारीची! एका जागी क्षणभरसुद्धा न थांबणारी! सारखी धावणीची वारेजोड दौड घेणारी! सपळ न देता येणारी! येता येताच मोतीलगाचा ऐटदार तुरा हिंदोळवीत पाठमोरी होणारी! डोळ्यांनीच सारे-सारे बोलणारी! त्यांचे सगळे “सावळेपण’ आपलेसे करणारी!
“जगदंब, जगदंब’ पुटपुटणारी!

क्रमशः………..!

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment