महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,477

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७

Views: 3788
8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७…

त्या सावलीचे शिवदर्शन होताच सईबाईचे उरलेसुरले भानही हरपले. त्यांच्या मस्तकाची भिंगरी गरगर फिरू लागली. आठवणींची वर्तुळे त्यांच्या सावळ्या मनाच्या
सरोवरावर रेखू लागली. जिवाची दिवली थरथरू लागली. आठवणींचे माप लवंडले राजांच्या छातीवर कधी माथा टेकताना त्यांच्या गळ्यातील कवड्यांच्या माळेचा झालेला
रोमांचकारी स्पर्श! स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधणाऱ्या राजांच्या – स्वारींचीच आपण पुढे होऊन पजा जा बांधावी असा आलेला विचार! प्रतापगडावर शिवलिंगावरून उचललेल्या शंकर- आणि त्यांचा बाळ गणपती यांच्या खुणेचे त्रिदली बिल्वपत्र! पोटरी फोडून नुकत्याच बाहेर आलेल्या कणसासारखे वाटणारे आमचे शंभूबाळ! त्या सगळ्या आठवणी पार पलीकडच्या वाटत होत्या आता.

त्या सावल्यांच्या आणि आठवणींच्या धुंदळीत त्यांना ‘सई’ मात्र कुठे कुठेच दिसेनाशी झाली. दिसू लागला तो कपाळभर भरलेला मेणमळला, दोनबोटी आडवा,
रसरशीत मळवट! अहेवपणाचा! शिवकर सौभाग्याचा! त्या मळवटाचे आडवे कुंकू हळूहळू मोठे होऊ लागले! म्हणता-म्हणता नगाऱ्याएवढे झाले. क्षणभर दुडदुडले! पुन्हा मोठे होत- होत आभाळाएवढे झाले!!
आता ते त्यांच्या कपाळी काही मावत नव्हते! सईबाई सगळ्या त्या आभाळाएवढ्या कुंकवात कुठच्या कुठे विरून गेल्या होत्या. ते कुंकू स्वतःशीच निळ्या बोलीत बोलू लागले. आपण बोललेले आपणच ध्यान देऊन ऐकू लागले.

“गडावरच्या दरुणीमहालात उंबरठ्याआड राहून आम्हास हवं तेव्हा स्वारींच्या पायांचं दर्शन घेणं होत नव्हतं म्हणून आम्ही हे रूप घेतलं! आता स्वारीचा घोडा आमच्या
नजरटप्प्याआड कधीच नाही जाणार! दोन डोळ्यांनी खाशासंगती बोलणं मनभरं झालं नाही, म्हणून आम्ही उभ्या आभाळाचे डोळे लेवून स्वारींना ऊरभर बघतो आहोत! आमचा एकला जीव – शंभूबाळ पदरी टाकले. आता स्वारीच त्यांच्या आबा आणि आऊ! कुंकवाला
कसलं आऊपण! जमलं असतं, तर शेवटचा म्हणून एकदा या कुंकवाचाच मळवट आम्ही स्वारीच्या पायधुळीनं भरून घेतला असता!!”

👉▶आपल्या आभाळाएवढ्या मळवटाच्या रसरशीत लाल कुंकवात पुरती-पुरती न्हाऊन निघालेली सतेज अशी राजांची रसरशीत, तांबडी सावली फक्त सईबाईंना दिसू
लागली!! “स्वारीचं हे असं रूप कधी नजरेला पडलंच नाही.” आता सईबाईसाहेब एक क्षणभरही थांबू शकत नव्हत्या! वेळ झाला तर ती रूपभैरवी चैतन्यलाल सावली हातची निसटेल! त्या नुसत्या शंकेनेच त्या थरथरल्या. त्यांच्या कृश पायांत कसलेतरी उदंड बळ संचारले! त्या खड्या झाल्या! त्या सावलीचे पाय धरून ठेवण्यासाठी सईबाई भरल्या मळवटाने इतमामात चालल्या! त्यांच्या ओठातील तुळशीपत्र त्यांना रोखण्यासाठी क्षणभर थरथरले, पण सईबाईसाहेब गेल्या! कायमच्या! पार-पार पलीकडे!! राजांचे सावळे, सुंदर स्वप्न सरले!!!

सईबाईचा निष्प्राण हात शंभूबाळांच्या हातातून निसटला! तो माया २ कृश हात मंचकावरच्या बिछायतीवर कसनुसा होऊन कोसळला! त्यांच्या ओठांतील हताश तुळशीपत्र निसटून घरंगळत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर ओघळले. महालात एकच आक्रोश उठला. चिराखदानांच्या काजळल्या ज्योती ऊरफुटी थरथरल्या. भिंतीचे घडीव
दगड शहारले.

“आऊऽऽ, आऊऽऽ” म्हणून भेदरट हाक घालीत शंभूबाळांनी सईबाईंचा पडला हात उचलून गदगद हलविला. सगळा राणीवसा मंचकावर ओळांबून आक्रोशतो आहे, हे पाहून भांबावलेले शंभूबाळ “थोरल्या आऊऽऽ!’ म्हणत जिजाबाईना एकदम बिलगले. धाराऊने बाळराजांना महालाबाहेर काढले.

सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला! एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला! मळवट भरल्या सईबाई नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या!!

सईबाईनी राजगडावर देह ठेवला ही खबर ऐकताच पापण्या मिटून “जगदंब,जगदंबऽऽ” म्हणत अपार वेदनेने राजांनी हात ठेवला. टाकोटाक ते प्रतापगडावरून राजगडी
आले. त्यांच्या थोरल्या राणीच्या पेटत्या चितेबरोबर त्यांच्या एका सावळ्या, भावूक मनसुब्याची चिता जळत होती. सईबाईंच्या कैक रूपांच्या ज्वाला फरफरत होत्या. फर्जंद
शिवाजीराजे भोसले त्यांच्या दाहाने होरपळून निघत होते.

तशा राजांच्या राणीवशात तर आणखी राणीसाहेब होत्या – पण सईबाईत त्यांच्या मनाचा दिललगाव गुंतवा झाला होता. वीराला पहिल्याने कमरेला जडलेली तलवार आणि आपल्यासमोर बोहल्यावर चढलेली पहिली स्त्री विसरू म्हणता विसरता येत नाही! शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद अशी राजांची आणि सईबाईंची
खानदानी मर्मजोड होती. भक्कम ऐटदार गडाला फेर धरून वळणदार माची असावी, तसा तो राजस नातेबंध होता!

सईबाईच्या जाण्याने राजगडावरचे देव नवरात्राच्या घटात बसण्याऐवजी सुतकात पडले, सालिना हसरा होणारा दसरा दुखरा झाला.

▶बजाजीमामांनी मायेने जावळ उतरलेल्या शंभूबाळांच्या मस्तकाचे सईबाईंच्यासाठी मुंडन केले! त्यांची पोरवयाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली. ती पाहून गलबलून आलेल्या जिजाऊंनी त्यांना निर्धाराच्या मायेने जवळ घेतले. आता जिजाऊंनीच त्यांची ‘आऊ’ व्हायचे मनोमन ठरवून टाकले. भोसल्यांच्या तडा गेलेल्या साऱ्या तटबंदी सांधण्यासाठीच जिजाऊ त्या घराण्यात आल्या होत्या.

मुंडन झालेल्या बाळ शंभूंना जवळ घेऊन राजे आपल्या महालात मंचकावर बसले होते. त्याचा एक हात शंभूच्या पाठीवरून आणि दुसरा हात छातीवरच्या माळेतील
कवड्यांवरून फिरत होता. त्यांच्या मनाला एका बाजूने सईबाईच्या आठवणींनी आणि दुसऱ्या बाजूने अफजलखानाच्या वाईतल्या तळाने वेढा टाकला होता.

👉“आबा, आऊ कुठे गेल्या?” शंभूबाळांनी राजांना विचारले.

त्या सवालाने राजे थरथरले. त्यांच्याजवळ काही-काही जाब नव्हता. अत्यंत मायेने ते आपल्या बाळराजांचा खांदा थोपटू लागले. त्यांच्या मनात हरभट ज्योतिषीबुवांचे बोल उसळी घेऊन उठले. ‘पुराणांतरी रुद्र जसा आप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो!!’

शंभूकडे बघताना राजांच्या मनाची घालमेल झाली. एक विचित्र विचार त्यांना चाटून गेला, “उपजलात आणि धाराऊचे दूध तुमच्या वाट्यास आले! पण – पण
हयातीच्या पहिल्या चालीलाच तुम्ही आस्तगणांकडून असे फसले जाल, याचा अंदाज काही ज्योतिष्यांनाही आला नसेल!” राजे बाळशंभूंचा खांदा नुसता थोपटीत होते आणि नुसते थोपटीतच राहिले!!

मराठी दौलतीच्या उरावर अफजलखानाचे भय वाईत दबा धरून बसले होते. खानाने पांढऱ्यांना शिरवळात, खराट्यांना कऱ्हेच्या खोऱ्यात, जाधवांना सुपे परगण्यात,
सिद्दी हिलालला पुणे प्रांतात आणि सैफखानाला तळकोकणात पेरून राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावेबाज डाव टाकला होता.

ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावरच ठाण ठेवणे हिसाबी नव्हते. त्यासाठी खानाच्या वाईच्या तळाची बगल धरून दाटलेले जावळीचे कुबल खोरे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. प्रसंग पडला तर त्या खोऱ्यातील प्रतापगडाच्या शिडीवरून मावळतीकडून त्यांना सिताब आणि सलामत कोकणपट्टीत उतरता येणे शक्‍य होते.
रानसावजाची धडक त्याच्यापासून दूरच्या फासल्यावर राहून कधीच हुकविता येत नाही! त्यासाठी त्याच्या अंगलटीला घासूनच हूल भरावी लागते! राजांनी वाईजवळ
प्रतापगडाकडेच कूच व्हायचा मनसुबा धरला.

या बेतात आता पालट झाला असता, तर तो केवळ मासाहेबांच्यामुळे! नुकत्याच सूनबाई गेल्या असताना कुसव्याची एकुलती एक यादगीर असलेल्या राजांना निरोपाच्या दहीकवड्या जिजाबाई देतील काय? काय कल्लोळ माजेल त्या माउलीच्या काळजात?
थांबविण्यासाठी त्यांनी मायेचा पायगोवा घातला तर….!

▶ते सारेच टाळण्यासाठी, “राजगड सोडताना आऊसाहेब भेटीसाठी न येत तसे करावे.” असा सल्ला खुद्द राजांनीच जिजाऊंच्या खाजगीच्या कारभाऱ्यांना दिला. तो
देताना त्यांचा हात गळ्यातील माळेच्या कवड्यांवरून थरथरत फिरला. मनात विचारांच्या कबड्यांनी कितीतरी डाव टाकले… “आणि जर खानाच्या मोहिमेतून परतीची
बाट आम्हास नाहीच दिसली तर!! तर – सईच्या जात्या पायांचे ठसे आम्हास पुढच्या दौडीचा माग देतील! आणि मासाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाऱ्याची चिमट
शंभूबाळाच्या कपाळी भरून खाशा श्रींच्या राज्याची बेलरोटी उचलतील! भवानीनं तेवढं बळ त्यांच्या चिमटीत भरलं आहे!

“पण आमचे शंभूबाळ तो भंडारा पेलतील? मातेवेगळा पोरका दिसणारा अश्राप जीव तो! छे! भोसला आणि पोरका? होणं नाही. आमच्या महाराजसाहेबांना पोरपणीच
घोड्यावर मांड घ्यावी लागली. आम्हीसुद्धा तसेच पुण्याच्या बरड जहागिरीत दाखल झालो. प्रसंग पडला तर त्याच वाटेवर शंभूबाळांनाही धावणी करावी लागेल. एकदा
उपजताना “जगदंब’ म्हणून श्वास घेतला की, भोसल्यांना तो हयातभर इमानाची संगत करतो. मग पोरकंपण त्यांच्या वाटेला कधीच जात नाही!’ राजांनी मन बांधले. ज्या
पंखाखाली मायेच्या उबाऱ्यात त्यांचा जीव पोसला तेच पंख कठोर मनाने दूर करणे भाग होते. त्याशिवाय निळ्या आभाळात भरारती झेप घेताच येत नाही! श्रींच्या राज्याचे स्वप्न रेखताना मायेच्या नात्याचे सत्य डोळ्यांआड सारावेच लागते. राजांना खाजगीची नाती नसतात! नाती नसणे, हेच त्यांचे दौलतीशी नाते असते. राजांनी दौलतीचे नाते निवडले.

क्रमशः………..!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment