धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२
नेहमीच्या ‘आऊबोलीत म्हणाल्या, “सरलष्कर, दमछाकीचा मुक्काम दोन दिवस घेऊन तवाने व्हा! मग जे करणं असेल ते करा! ”
जे करणे शक्य होते, ते सारे नेताजींनी कडव्या इमानानं केले. सिद्दी हिलाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेढ्याचा उपराळा करावा म्हणून पन्हाळगडच्या पायथ्याला
जाऊन भिडले. पण सावध हबश्यांनी उपराळ्याचा छापा मोडून काढला. सिद्दी हिलाल कैद झाला. नेताजी पन्हाळ्याच्या पायथ्यापासून माघारा फिरले.
पाऊस पडतच होता. मावळी मने भिजत होती. मराठी मुलूख भिजत होता. उदंड दलदल दाटत होती. आता जिजाऊंचा, राजांचा, राज्याचा आणि शंभूबाळांचा साऱ्यांचा भार फक्त जगदंबेवर होता. ती जगाची अंबा. संकटांना “थांब ‘ म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच होते. माणसे तिच्या हातातले नुसते पोत होते!
जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या. शास्ताखान सिही जौहरला मिळणार नाही, यावर नजर ठेवण्याचे काम. त्यासाठी त्यांनी चाकणचे जुने, जाणते
किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बलावू धाडले. फिरंगोजी राजगडावर आले.
मासाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या, “फिरंगोजीबाबा, आमच्या तर इंगळास वोळंबे लागले. कोणती खबर येईल आणि कानात तापल्या शिसाचा रस ओतून जाईल सांगता येत नाही. तुम्ही जुने-कदीम किल्लेदार, चाकणला राहून तुम्ही शास्ताखानास आपल्या अंगावर घ्या. तसं झालं तर त्याचा मोहरा राजगडाकडं-
पन्हाळगडाकडं वळणार नाही. बोला, तुम्हास काय वाटतं?”
“मासाब, लई सल्पी कामदारी नेमून दिलीसा. मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उखडायचा हाय. एल्गाराचा मनसुबा असंल.” फिरंगोजी मनचे बोलले.
“नाही किल्लेदार, आता पन्हाळ्यावर चाल घेणं म्हणजे हकनाक हातची माणसं गमावून बसणं आहे. आम्हास ते नाही रुचत.” जिजाऊंनी फिरंगोजींची समजूत काढली
मासाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले. त्यांना शंभूबाळांच्या लळ्याचा लगाव होता. राजे नव्हते म्हणून “मुजरा धाकलं राजं,” म्हणत फिरंगोजींनी शंभूबाळांना मुजरा घातला. धावत जवळ येऊन फिरंगोजींच्या मांडीभोवती आपल्या हातांचा फेर टाकीत बाळराजे वर बघत म्हणाले, “आम्ही तुम्हाला वेढा भरणार
फिरंगोजीबाबा! नाहीतर घेऊन चला आम्हास चाकणला! ”
त्यांचे मांडीभोवती वेढलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरंगोजी स्वत:शीच बोलल्यागत बोलले, “तुम्हावानी न्हानपन समद्यांस्नीच लाभलं असतं, तर लई
ब्येस झालं असतं धाकलं धनी! ”
जिजाबाईच्या मनचे सारे थोरपण आता ढासळू लागले. जौहरच्या वेढ्याला पुरते सव्वा-चार महिने लोटले होते. राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ अकरा महिने मागे हटले होते! उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला. जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाकले. गडावर कोसळणाऱ्या पाऊसलोटाकडे स्वत:ला हरवून बघताना
त्यांना वाटू लागले की, “सारं आभाळ उरी फुटावं. हत्तीसोंडेनें पाणधारा धो-धो कोसळाव्यात. राजांची काही बरी-वाईट खबर कानांवर पडण्यापेक्षा हा उभा राजगड
पाणलोटात विरघळून जावा! ‘ पण शंभूबाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणी घेत निघून जात होते.
धाराऊने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तबकात मांडून ते देव्हाऱ्यासमोरच्या पाटावर ठेवले. तिच्या शेजारी बाळराजे उभे होते. या देवमहालात
आपले आबासाहेब कैक वेळा जिजाऊंच्या पायांचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते. “बरेच दिवस झाले, आबासाहेब दिसत नाहीत? या विचाराने गोंधळलेल्या
शंभूबाळांनी धाराऊला विचारले, “धाराऊ, वेढा कसा असतो? कुठं राहतो? ”
धाराऊने चमकून बाळराजांच्याकडे बघितले. “मला काई ठावं न्हाई. असलं काही-बाही नगा इचारू.” धाराऊ कळवळून बोलली. पूजेचा सरंजाम बयाजवार लागला आहे की नाही, याचा फेरतपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तबकाकडे बघितले. नैवेद्याच्या वाटीतील गुळखड्याला काळ्यामिठट्ट मुंग्यांनी घेरून टाकलेले तिला दिसले! बाहेरच्या पावसाच्या पागोळ्यांनी हैराण झालेल्या
मुंग्या देवमहालाच्या उबाऱ्याला आत आल्या होत्या.
वाटीतील तो मुंग्यांनी घेरभरला गुळखडा बघताना धाराऊला कसेतरीच वाटले. पुढे होऊन हातांनी साऱ्या काळ्यामिट्ट॒ मुंग्या वारून, तिने तो गुळखडा उचलला आणि
दुसऱ्या वाटीत ठेवला!
शंभूबाळांचे बोट धरून त्यांना मासाहेबांचे दिवस दर्शन करविण्यासाठी ती जिजाबाईंच्या खासेमहालात आली. तेवढ्यात खबरगीर विश्वास नानाजी येताना दिसला.
त्याचा चेहरा उजळ दिसत होता. मुजरा रुजू करून, छाती फुगवून त्याने जबानीचा मावळी गोट खुला केला, “मासाब, कलच्या पुनवंच्या राती राजं जव्हरच्या वेढ्यातनं सलामत निसटलं!! ”
“विश्वास! राजे सलामत सुटले? सांग – लवकर. सारा करीणा सांग. कसे- कसे सुटले आमचे शिवबाराजे? कुठे आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग.” जिजाबाई
बैठकीवरून उठून विश्वासच्या समोर आल्या. त्यांचे डोळे थबथबले होते.
विश्वास भरल्या उराने सांगू लागला, “कलच्या पुनवंच्या राती राजं पन्हाळगडाच्या राजदिंडीनं सहाशे बांदलांनिशी गड-उतार झालं. बांदलांनी पालकीत बसवून विशाळगडाच्या रोखानं अंधारात धाव घेतली. पर गनिमाला राजं निसटल्याचा सासूद लागला. जव्हरचा जावाई शिद्दी मसूद दीड हजारांचं घोडदळ घेऊन
बांदलांच्या पाठलागावर पडला. रातभर चिखलराडीतनं – झाडझाडोऱ्यातनं बांदलांनी खांदे बदलत राजांची पालकी चौदा कोसांवर गजापूरच्या घोडखिंडीवर आणली. तवा
भगाटलं हुतं. खिंडीजवळ मसूदचं हबशी ऐन पिछाडीला आल्यालं बघून हिरडसमावळच्या बाजी प्रभू देसपांड्यांनी शिबंदीच्या दोन फळ्या. एक राजांच्या संगट देऊन त्यांसी विशाळगडाच्या वाटंला लावलं. बाजी आन् त्येचा धाकला भाऊ फुलाजी, दोघं तीनशे बांदलांनिशी घोडखिंडीचा थोपा कराय मागं ऱ्हायलं. खिंडीला भिडलेल्या हबश्यांबरोबर
बाजी आणि बांदल सात प्रहर पट्टा खेळलं. राजं विशाळगडाच्या पायथ्याला आलं, तर गडाला सुर्व्यांचा आणि पालवणकरांचा घेर पडल्याला हुता. राजांनी ‘हर हर म्हादेव ‘ म्हणत तो घेर फोडून काढला. दोन वेढं फोडून राजं विशाळगडावर हाईत. उद्या हकडं येनार हाईत. पर -?
“काय झालं विश्वास? बोल.” जिजाबाईंना विश्वासचा खुलला आवाज बदललेला जाणवला. “पर मासाब, घोडखिंडीवर हबश्यांचा थोपा करताना सारं तीनशे बांदल आन् बाजी आणि त्येंचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं!! उलट्या काळजाच्या हबश्यांनी साऱ्यांची प्रेतं घोड्याच्या टापांखाली चिखलात रगडत खिंड पार”
विश्वासची खबर ऐकताना मासाहेब स्वत:साठी बेखबर झाल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर बाजींची मुद्रा उभी राहिली.
गजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती. बांदल धुंदळ पेटवून स्वामिकार्यावर खर्ची पडले होते. हबशी तरसांच्या डोळ्यांत तांबडधूळ फेकून सह्याद्रीचा
सिंह सुटला होता.
गजापूरची घोडखिंड बाजींच्या रणगाजीने ‘गाजीपूरची खिंड ‘ झाली! त्यांच्या शोभणाऱ्या नावाने “बाजीपूरची खिंड ‘ झाली. बांदलांच्या नेकजात पवित्र आत्म्यांच्या
साक्षीसाठी ‘पावनखिंड ‘ झाली!!
क्रमशः………..!