महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,069

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २४

By Discover Maharashtra Views: 3704 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २४

राजांचे घोडदळ ‘हरऽऽ हरऽऽ महादेव’चा पाऊस पाडीत शंंगारपुरात घुसले. सुर्व्यांची गढी घेरली गेली. कमरेची भवानी उपसून राजे सुर्व्यांच्या गढीत शिरले. गढीतले

सुर्व्यांचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या. पायातील बाकदार मोजडीने सुर्व्यांचे भुंडे सिंहासन त्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले, “बेइमानदारांच्या मसनदी मातीमोलाच्या असतात! ”

ते दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर, कल्लेदार माणसाची छाती वरखाली होत होती. ते होते सुर्ब्यांचे दिवाण पिलाजीराव शिर्के! दोरखंडांनी दस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करीत तान्हाजी

मालुसरे म्हणाले, “ह्ये बेइमानी धन्यांचे इमानी चाकर. ”

शांत पावलांनी पिलाजींच्याकडे जात राजांनी आपल्या हातांनी त्यांच्या काढण्या उतरल्या. राजे तान्हाजीला म्हणाले, “चुकलात तान्हाजीराव, इमानी नजरेला धन्याच्या

चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तरी पटत नाही. म्हणूनच तर ते कुलवंत “इमान? असतं! ”

मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निधड्या छातीने नजर भिडवून म्हणाले, “काढण्या कशापायी काढल्या? ज्या गादीला आमी मुजरं केलं, तिला ठोकरून वर ही आमची नावाजणी कशापायी? त्यापरीस घोड्याच्या टापंला जखडून आमच्याच गावात काढा की आमची धूळधिंड! ”

पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हातचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आक्रशीत राजे म्हणाले, “पिलाजीराव, तुम्हीही चुकलात! आम्ही पागेचा एवढा

घोडा पोसला, तो काही इनामदार माणसं त्याच्या टापांखाली रगडण्यासाठी नाही! इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राज्याची आणभाक आम्ही घेतलेली नाही! प्रसंग पडला तर आमच्या पागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडेखालीच येईल! ”

होईल ती मानहानी सोसायला मन बांधील झालेल्या पिलाजींना असले जिनगानी कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील, अशी अपेक्षाच नव्हती.

घोटाळलेले पिलाजीराव राजांच्याकडे डोळे भरून बघत होते. त्यांच्या मनी चाललेली घालमेल राजांनी जाणली. त्यांच्या खांद्यावर तळहाताची एक थाप देऊन राजे म्हणाले, “घाबरू नका पिलाजीराव. आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालणार नाही! तुमच्या नेकजात बर्तावावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून मनची एक बात तुम्हाला जरूर बोलू. शिकल न लावलेलं हत्यार आणि मुजोर- बेइमान धन्याची चाकरी सारखीच असते! दोन्हीचा असूनसुद्धा काहीच हिसाब लागत नाही! सुर्ब्यांची संगत करण्यापेक्षा सेतपोतावर जाऊन कुणबावा केला तरी तो गोमटाच आहे! ”

“तान्हाजीराव, पिलाजींना बाइजत मोकळं करा.” राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी म्यान केली.

पिलाजीरावांचे कल्ले थरथरले. झटकन वाकून राजांच्या मोजड्यांना हात लावीत ते म्हणाले, “राजं, आजवर तुम्हांबद्दल लई ऐकून हुतो. आज त्येचा पडताळा नजरेला

आला. म्याहून पाय धरलं. तोडायचं असंल तर टाका तोडून. ” त्यांना वर उठवून गळाभेट देत राजे म्हणाले, “पिलाजीराव, आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही. हयातभर आम्ही माणसं जोडतच आलो. तोडणं सोपं असतं, जोडणंच मुश्कील आहे! ”

पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पायधूळ झाडण्यासाठी विनवणीचे मागणे घातले. निवडक धारकरी घेऊन राजे पिलाजीराबांच्या वाड्यात आले. वाड्याच्या

सदरचौकात दोन भावंडे खेळत होती. साऱ्यांना पाहून ती दबकली.

राजांनी पिलाजींना विचारले, “ही कुणाची घरशोभा पिलाजीराव? ” “जी. ती माजीच हाईत. हये थोरलं गणोजीराव आन ही धाकली राजसबाई. सम्दी

हिला “राजाऊ म्हनत्यात. आम्ही “जिऊ ‘म्हन्तो.” पिलाजींनी आपल्या मुलांची नावे सांगितली.

थोरला गणोजी तरतरीत दिसत होता, पण तोरेबाज उभा होता. राजाऊ मात्र मोठी राजस आणि चलाख दिसत होती. तिच्या डोळ्यांत भीतीचा वारासुद्धा नव्हता. त्याहून राजांना तिला बघताक्षणीच जाणवले की, तिचा तोंडावळा जिजाऊंचा तोंडावळ्याशी बराच जुळता आहे!

पुढे जात राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले. ते पिलाजींना म्हणाले, “तुमच्या या जोडीने आम्हास आमच्या बछड्यांची याद दिली! ”

पिलाजीरावांनी राजांची इतमामाने सरबराई केली. शृंगारपूर आणि प्रभानवल्लीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दिमतीला पिलाजीराव शिर्के यांना ठेवले. धगारपूर सोडण्यासाठी राजे गाववेशीवर आले. वेशीच्या तर्फेला कसलेतरी एक मंदिर होते.

“हे कसले देवस्थान?” राजांनी निरोप द्यायला आलेल्या पिलाजींना विचारले.

“ते आमच्या कुलदैवताचं – भावेश्वरीचं हाय.” पिलाजी म्हणाले.

“अस्सं! चला दर्शन घेऊ.” म्हणत राजे पायउतार झाले. मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचे दर्शन घेतले. बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले, “तुमच्या या कुलदैवताचा

संबंध आमच्या जगदंबेशी असावा! ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते! ”

 

शृंगारपूर सोडून राजांच्या घोडेतुकडीने धिम्या चालीची धावणी धरली. राजांच्या मनात दोन गोष्टी धावणी घेत होत्या – एक “राजाऊ ‘ उर्फ ‘जिऊ ‘, दुसरी भावेश्वरी!

राजे राजगडावर आले आणि मृगाने आपली झोड उठविली. गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या. गड उतरंडीवरचा झाडझडोरा पाणधारांत न्हाऊन निघू लागला.

शंभूबाळांना संगती घेऊन राजे दफ्तरखान्याचा जाबता जातीनिशी नजरेखाली घालू लागले. लोहारमेटावर भाल्यांच्या इंगळांवर तावून निघणारी आणि घणठोक्‍्यांखाली घडणारी तलवारींची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोलून पाहू लागले.

वरून पाऊसधारा कोसळत होत्या. राजांच्या मनात एका विचाराचा पाणलोट घोंघावत होता – लालमहालात शिरलेला हिरवा सर्प – शास्ताखान!

आषाढ हटला. श्रावणाचे सरते दिवस आले. ऊन-पाऊस एकमेकांच्या पाठलागावर पडले! वरून पावसाच्या तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ “उदं ग अंबे – उदं!”च्या बेभान, रोमांचक किलकाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या! रणहलग्यांवर लेझमांचे ताफे नाचत खेळी करत होते. टाळी चापाच्या काठ्या संबळी घुमवीत होत्या. रणशिंगांच्या ललकाऱ्या पाऊस सरींवर काटा फुलवीत चीत्कारत धावत होत्या. भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या. ऊर भक्तीच्या इरेसरीने भरून आले होते. उदेकार उसळत होते. “उदे गऽऽ अंबे उदंऽऽ! ”

मंबाजी नाईक भवानी जगदंबेची गंडकी शिळेची घडीव मूर्ती पालखीत स्थापून राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते. बुतशिकनी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या

मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सिताब आणली होती. मराठी मुलखात अवतरण्यापूर्वीच सरहद्दीवर भवानीसमोर बकरी पडली होती. रक्ताच्या पायघड्यांवरून जगदंबा श्रींच्या राज्यात प्रवेशली. मुर्दाडांना मातीमोल करणारी! मर्दांच्या मनगटात निधडेपणाचा चेवताव चढविणारी! जोशाला जय देणारी जयंती! कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी

भद्रकाली! महिषासुराचे मर्दन माजविलेली मत्तमर्दिनी! भंडासुराचे भंजन केलेली भगवती भवानी! बिड्ठालाला बुडविलेली बलशाली बिहडिनी! न्यायी जगाला जागणारी-

जगवणारी जयवंती जगतजननी – भवानी राजांच्या राज्यात उतरली!!

शंभूबाळांसह गडपायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले. मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाऱ्याने भरला. जगदंबेचे ते दोन्ही फर्जद चालत

पालखीजवळ आले. ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसभार उगारलेली, पायाखाली महिषासुर रगडणारी, कृष्णवर्णाची, वज़लेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी “’जगदंब-जगदंब ‘ म्हणत हात जोडून डोळे मिटले. पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडविला.

राजांनी देवभोयांना इशारत करून आईच्या पालखीला आपला रिवाजी खासा खांदा दिला. ते बघताच भोवतीचे उभे मावळजन भक्तिभावाने उसळून उठले. “उदं ग अंबे

उदं!! हर हर महादेव’चा मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला!

पालखी राजगड चढून आली, जिजाबाईनी आणि राणीवशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खणा-नारळांनी ओटी भरली.

शुभमुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत-गाजत राजगड उतरू लागली.

जगदंबेची मिळेल तेवढी कृपासोबत साधण्यासाठी राजे शंभूबाळांसह पालखीबरोबर गडमाचीपर्यंत आले. गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार- फार जाणवून गेले, ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या!

शंभूबाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, “ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे. तुमची-आमची साऱ्यांची! तिला हात जोडा बाळराजे!” राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या!

क्रमशः………..!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment