महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,773

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०३

By Discover Maharashtra Views: 3943 5 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०३…

गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, “नाईक, लई लहानी मूठ हाय तुमची! ”

त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजीबाबा गरजले, “म्होरं ये. परातच वततो तुज्या थोबाडात!” आणि गोमाजी स्वत:वरच खूश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले.

सदरमहालात खलित्यांच्या लाल फासबंदांच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तबकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी-स्पर्श केला.

सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक-एक खबरगीर सामोरा आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, सिंदखेड, बेंगळूर, चौक चौवाटा त्या
थैल्या जाणार होत्या.

जिजाबाईंनी शेवटचीटची थैली आपल्या हातात घेतली. त्यांच्या समोर
मावळपट्टयातील नामांकित खबरगीर विश्वास – नानाजी मुसेखोरेकर उभा होता. त्याच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, “विश्वासराऊ, जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर. आमचा सांगावा सांग की – जरोर निघोन येणे. पुत्ररत्न उपजले! ”

जी.” म्हणत विश्वासरावाने थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून
जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदरमहालाबाहेर पडला.

धावणीची वाट बिनघोरी आहे की नाही, हे टेहळण्यासाठी जासुदांचा नाईक बहिर्जी राजांच्या घोडदळापुढे एका मजलेवर दौडत होता. सुपे जवळ आले. बहिर्जीच्या घार नजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या

उजव्या तळहाताची झड कपाळावर चढविली. डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला. त्याच्या घोड्यावरच्या मावळी जिनाची खूण चांगली पटताच टांच मारून, धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या स्वाराला गाठला.

बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पायउतार झाला.

“काय खबर आहे इस्वास?” मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिलं.

“लई नामी खबर हे नाईक! धन्यास्तरी बाळकिसन जालं! पुरंदरावरनं मासाबांची थैली घिऊन आलू न्हवं.” विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला.

“धन्यांचं बाळकिसन…कवा? भले रे माज्या भाह्रा!” म्हणत बहिर्जीने मांड मोडून जिनावरून खाली चलाख-चटकी ळलांग घेतली. आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत; विश्वास एक मामुली खबरगीर आहे, हे विसरून बहिर्जीने सरसे होत, विश्वासची थेट ऊर-भेट घेतली. त्याचे खांदे थोपटले.

वळीव पावसाचा मारा होणार ही इशारत देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीने बहिर्जीने आपल्या घोड्याचा मोहरा माघारा वळविला. राजांच्या सामने रुजू होण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला.

राजांचे घोडदळ नजरटप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली. धिम्या चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पायउतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदबमुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या
ढगांनी मेंढीकळपासारखा केव्हा जमाव धरला, ते कुणालाही कळलेसुद्धा नाही.

राजे कुम्मैत जातीच्या तपकिरी, उमद्या जनावरावर मांडबुलंद बैठक जमवून बसलेले होते. घोड्याचे भगवे, रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते. कपाळीचे दोन दलांचे आडवे शिवगंध, छातीकडे धारदार नाकाचा तरतरीत शेंडा, कानशिलाकडे निमुळते होत गेलेले, दोन्ही डोळ्यांत दोन सूर्य वागविणारे, लांबट डोळे, उभट शंखासारखी रंगसतेज मुद्रा, छातीच्या ठोकेदौडीशी कान लावून विसावलेली कंठातील चौसष्ट कवड्यांची आई भवानीची पावन माळ! असे ते ‘ राजयोगी रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापांखाली उसळलेली तांबडधूळ त्यांच्या पांढऱ्याशुभ्र
टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती.

बहिर्जीला बघताच राजांच्या रक्तजागल्या, रसरशीत ओठांतून काळजाची ठाव घेणारी, सोनेरी बोलांची चलाख कबुतरे क्षणात उडाली – “बोला नाईक, सिताब पाठमोरे वळाया कोण वजह? काही आफत…?” राजांच्या उजव्या भुवईने वर चढत कमानी बाक
धरला.

“न्हाई धनी, ह्यो इस्वास पुरंदरावयनं मासाबांची थैली घिऊन आला. लई
खुशीची खबर हाय. थोरल्या रानीसाबासत्री बाळकिसन जालं! धाकलं धनी आलं! कलच्या बेस्तरवारी! ”

“अस्सं! जगदंब, जगदंब!” राजांच्या कपाळीचे शिवगंध, वगंध, सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कवड्यांवरून फिरली. दुसऱ्याच क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मांड मोडून घोडाउतार झाले. शांत पावली विश्वासजवळ जात
त्यांनी काही न बोलता त्याचा खांदा हळुवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीचे सोनकडे झटकन खेचून त्यांनी ते विश्वासला दिले.

मागच्या घोडदळातील माणकोजी, मुरारबाजी, येसाजी, तान्हाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पायउतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगड्यांना झटके देत “कसली खबर? म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेचा प्रकाशलोट क्षणात मुलूखभर पसरतो, तशी ती खबर घोडदळभर पसरली. ती ऐकताना न राहवून एका
मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत, आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली – “आई भवानीचा उदो! हर हर हर महादेव!” सगळे घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले

राजांनी मागे वळून हसत आपल्या जानकुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकवून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली

क्रमशः………..!

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment