महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,576

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३१

Views: 2551
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३१…

जी पावले सदा डोळ्यांआडच राहिली, त्यांचा माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातुश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या! उभा राजगड

गडबडून गेला. आपल्या खाजगीच्या कारभाऱ्याला जिजाबाईनी सतीची सूपवाणे सिद्ध करण्याची आज्ञा दिली. राजांच्या राणीवशात कल्लोळ माजला. एकाही राणीत

जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाजाआड हिरवे नेसवाण अंगावर चढविलेल्या, हिरवा चुडा हातभर भरलेल्या, मळवटावर भरगच्च आडवे

कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या. मोकळ्या झालेल्या माठासारख्या! त्यांची नजर शून्यात हरवून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते.

राजगडावर एकच स्त्रीमन जीवघेण्या अस्वस्थतेने पुरते-पुरते सैरभैर झाले होते; पुतळाबाईचे. शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईच्या महालाच्या मिटल्या दरवाजासमोर आल्या आणि त्यांनी बाळराजांना हाताने इशारत केली.

“थोरल्या आऊसाहेब” पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलकेच थाप देत बाळराजांनी साद घातली.

“आम्ही आहोत – शंभूबाळ. दरवाजा खोलता?” शंभूबाळांनी दरवाजाजवळ तोंड नेत जिजाऊंना दिललगाव बोलात विचारले. ते थोडा वेळ थांबले, पण आतून दाद आली नाही. “थोरल्या आऊ, दरवाजा खोला. नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर! खोला, आऊ दरवाजा खोला.” बाळराजे दरवाजावर थडाथड थापा देऊ लागले.

जिजाबाई थरारल्या. ‘खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायलाही अनमान करणार नाहीत!’ या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडौल झाला. कसंबसं

उठतं होत त्यांनी दरवाजा खोलला. हिरव्यागर्द रानात वाट धुंडाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायांनी एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गायीगत त्यांची

स्थिती झाली होती!!

झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत बाळराजांनी मान वर उचलली. त्यांच्या टोपातील मोतीलग मागे ओळंबली. डोळ्यांतून मोती ओघळत असताना ते बोलले.

बालभुत्याने जगदंबेला बोलावे तसे! “तुम्ही तुम्ही आम्हास सोडून जाणार थोरल्या आऊसाहेब? आम्ही – आम्ही येणार तुमच्या संगती!!”

ते ऐकताच जिजाबाईंचा ऊरबंद केलेला सारा कढ फुटून – उमळून आला. वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत स्फंदू लागल्या. त्यांच्या डोळ्यांतून उतरणारे अश्रुथेंब बाळराजांच्या टोपातील मोतीलगावरून ओघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले.

“आऊसाहेब, आमचे आबासाहेब येईपर्यंत कुठंकुठंच जाऊ नका!” बाळराजांनी साकडे घातले. ओसरते हुंदके आवरताना जिजाबाईनी मान डोलावली.

सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखते करण्यात येश घेतलेल्या बाळराजांच्याकडे ममतेने बघत पुतळाबाईनी आपल्या पापणीकडा पदराने

पुसत्या केल्या!

सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे

येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भुवई कमानबाक घेत राजसंतापाने वर चढली.

घोड्यावरून त्यांनी आपली नजर उचलून राजगडाला जोडली. पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावरची निशाणकाठी भुंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे गेला. चढली भुवई क्षणात पडली. त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकांच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले. त्यांच्या धीराच्या, निधडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या.

कपाळीचे शिवगंध आक्रशीत राजे पायउतार झाले. पालखीत बसून राजगड चढू लागले. पालखी पाली दरवाजापार होताना कधी नव्हे, ती गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली. मनात कुशंकाच कुशंका घर करू लागल्या.

सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले. सुरतेच्या कैक अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्याहुड्यांचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या

राजांनी, जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला. अत्यंत थरथरत्या हाताने!

आत फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेष घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते. दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळीज पिळवटून निघावे असा कंठ फोडला – “शिवबा आमचं कपाळ फुटलं!! तुमचे महाराजसाहेब गेले!!” भूकंपाने सर्वोदार सोशीक भुई थरथरते तशा

जिजाबाई थरथरू लागल्या.

आपल्या उभ्या अंगावर राजांना शिसाचा रस ओतल्यासारखे झाले. दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाचा उजव्या

हाताच्या चिमटीत धरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यांत शहाजीराजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या उरातले दुर्मीळ राजअश्रू दाढीवरून घसरून छातीवरच्या

कवड्यांना जाब विचारीत जाम्यावर उतरू लागले. त्या वीरपुरुषाचे भोसलाई राजमन पाझरत होते. ओघळणारे अश्रुलोट महाराजसाहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. अश्रूंच्या सफेद आडपडद्यांतून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला! त्यांच्या उभ्या अंगावर सर्रकन काटाच उठला.

“कधी नव्हे ते हिरवे नेसवाण आऊसाहेब का नेसल्या?’ हा शक उराच्या तळवटातून उसळून येताच, चारी पायांनी दातेरी आकडेचाप लावलेला ताकदजोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून म्हणाले. तर्जनीने आपल्या पापणीकडा झटकन निपटत्या करीत राजे पुढे सरसे झाले. सूपवाणांकडे हात करीत त्यांनी जिजाबाईना थरथरत विचारले, “मासाहेब, हे काय करताहात?”

“जिथं स्वारी तिथं आम्ही! आम्ही जाणार राजे – चितेच्या आगभरल्या मेण्यातून आम्ही तुमच्या महाराजसाहेबांच्या पायांशी जाणार!! आमच्या फुटक्या हातांनी आम्ही सतीवाणे देणार!” उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत, अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या. निर्धाराने बोलल्या.

ते ऐकताना आपले सारे दौडते राजेपणच कुणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे, असे राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज-गुंतवा असलेला ‘फर्जद शिवबा’! बेंगळूर सोडून मेण्यातून पुण्याच्या बरड जहागिरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला, त्यांचा मायाभरला हात पाठीवर घेत पुण्यात नांगराच्या खुंटाळीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिवसतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा “शिवबा’! केवळ शिवबा!

एरव्ही ताठ मानेने घोड्यावर मांड घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर टेकविले. गदगद हलत, टोपावरच्या मोतीलगाला डावे-उजवे हिंदोळून टाकीत राजे स्फुंदून म्हणाले, “नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकून नका जाऊ! शंभूबाळांची हातजोड नका तोडू! आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रींच्या राज्याची आण पुरी करणार

आहोत. ते कोण बघणार? तुमच्या बाळराजांचे शंभूराजे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले. आज ही एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत!! आम्हास परते सारू नका!” राजांनी गर्दन उचलली. ज्या हातांनी, पेटून उठलेल्या राजांनी कैकवेळा “भवानी’ उपसली होती त्याच हातांची ओंजळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली! त्यांचे पाणथरलेले, सूर्यपेट भोळे ळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यांतून सुटलेले अश्रू टपटपत राजांच्या ओंजळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की, “या हरएक अश्रुथेंबासाठी एक-एक जिंदगी कुरवंडून टाकावी!!’

राजे असे पेश येतील, हे ध्यानीमनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायाडौल झाला. त्या घोटाळल्या. राजांनी पसरलेली ओंजळ आपल्या चुडाभरल्या हातांनी आवेगाने बंद करीत त्या म्हणाल्या, “नाही – राजे, हात पसरू नका! तुमच्या हातांची परडी आई अंबेनेच आपल्या हातांनी भरली असता – आम्ही तिच्यात काय घालावं? आम्ही – आम्ही थांबू… फुटल्या कपाळानेसुद्धा थांबू. या राज्यासाठी! तुमच्यासाठी! बाळराजांच्यासाठी! तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही आता भर नाही घालणार!” मासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीची

वाणे परती सारली!!

जिंकल्या गडाच्या नगारखान्यावरच्या चढत्या निशाणासारखे राजांचे मन उभारून आले! तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडफडत होते – चढत्या

निशाणाच्या तडफडीसारखे!!

हे सगळे दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या, ‘सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील!’ हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की, “’आबासाहेबांचे डोळेही पाणावतात! आणि आम्ही मानतो – समजतो त्याहून थोरल्या आऊसाहेब केवढ्यातरी “थोर – थोर’ आहेत!!’

शहाजीराजे गेले ही खबर मावळमुलखात पसरताच राजांच्या भावकीतील मंडळी राजगडावर आली. त्यात शंभूबाळांचे मामा फलटणकर बजाजीराजे निंबाळकर आले होते. नातेबंधातल्या सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकाचे मुंडन झाले. उतरल्या केशसंभाराच्या मस्तकाने आणि जडावल्या मनाने राजांनी शहाजीराजांची दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधींनी पार पाडली.

ते विधी समोर बघताना शंभूबाळांची एकच एक कोशिश चालली होती. कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराजसाहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखू बघत

होते! पण ते साधत नव्हते! कितीही कोशिश केली, तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी ठाकत होती, ती आबासाहेबांचीच!

शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळांनी त्यांना विचारले, “कसे… कसे दिसत होते, आमचे थोरले महाराजसाहेब थोरल्या आऊ?” भरल्या डोळ्यांनी बाळराजांकडे बघताना कधी नव्हे; ते जिजाबाईंना आज प्रथम भावून गेले की, “शंभूबाळांचा तोंडवळा थेट आमच्या स्वारीसारखाच आहे!! नाक-भुवयांची तशीच ठेवण, कपाळाची तशीच भरदार आडवी मांडण आणि आतबाहेर सारख्याच साफ असलेल्या, रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे तसेच साफ दर्पण!’

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३१

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment