धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३४…
मानेने चालणाऱ्या राजाऊंनी डावा पाय पुढे सरसा करीत उंबरठ्यावचे शीगभरले मावळी तांदळाचे माप लवंडते केले. भोसल्यांच्या उंबरठ्यात दाणेरास पसरली. सूनबाई म्हणून सुलक्षणी लक्ष्मीच्या पायांनी राजाऊंनी गृहप्रवेश केला.
कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधू-वरांनी गणपतिपूजन केले. तांदूळ पसरलेले एक सुवर्णी तबक शंभूराजांच्या सामने आणण्यात आले. नव्या सूनबाईचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली. जिजाबाईच्या महालातून वर्दी आली की, “आमच्या नातसूनबाईचं नाव ‘*यशोदा'” ठेवा.!
प्रभाकरभट राजोपाध्यांनी शंभूराजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्यांच्याच हाताच्या चिमटीत दिली. आणि त्यांचा हात आपल्या हातात धरून तबकातील तांदळाच्या समृद्ध पडद्यावर अंगठीने नाव रेखले “यशोदा! ‘
सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजाऊंना घेऊन जिजाबाईंच्या महाली दर्शनासाठी आले. जिजाबाईंच्या पाठीशी धाराऊ उभी होती. भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपला लग्नसाज घेतलेल्या बाळराजांच्याकडे नजर जोड बघतच राहिल्या. पुढे होऊन शंभूबाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक टेकविले! राजाऊंनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आईसाहेबांच्या पायांना भिडविले. बाळराजे आणि राजाऊंना वर उठते करून आवेगाने बिलगते घेताना जिजाऊंना आपल्या
स्वारींची याद आली. राजाऊची हनुवटी वर उचलून जिजाबाई जबानभर मायेने म्हणाल्या, “येसू”. राजाऊंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले. केवढीतरी
अमाप माया त्यांना जिजाऊंच्या शांत डोळ्यांत दिसत होती.
बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवीत जिजाबाई म्हणाल्या, “शंभूबाळ, धाराबाईचे पाय शिवा.”
ते ऐकताना गलबलून गेलेली धाराऊ बोलून गेली, “माजं कशाला जी?” तरीही पुढे होऊन बाळराजे-राजाऊंनी धाराऊच्या पायांना हात लावून तिला नमस्कार केला. त्यांना वर उठवून त्यांच्या कानशिलांवरून बोटं फिरवून ती आपल्या कानशिलांजवळ नेत कटकन मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला. “ब्येस ऱ्हावा माज्या वासरांनू!”
शिर्क्यांच्या राजस राजाऊ आता भोसल्यांच्या यशवंत “यशोदा’ झाल्या होत्या. जिजाऊसाहेबांनी मायेने “येसू” म्हणून हाक घालताच ‘यशोदे’च्या “येसूबाई’ झाल्या
होत्या!
दर्शन घेऊन महालाबाहेर पडणाऱ्या शंभूराजांना डोळाभर बघताना शहाजी राजांच्या आठवणीने जिजाबाईच्या मनी एक विचार येऊन गेलाच. “बाळराजे, तुम्ही तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांच्या सारखे दिसता. पण – पण ते जसे आपल्या कबिल्याला – आम्हाला पाठमोरे झाले, तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका! आमच्या येसूबाईना कधीच अंतर देऊ नका! गडावरच्या टाक्यात पोहणीस पडणे सोपे आहे – पण -पण संसाराच्या भवसागरात तरते राहणे, कोण दमछाकीचे आहे! आई अंबा त्यासाठी तुमच्या हाती बळ देईल. श्रीसांब त्यासाठी तुम्हाला हिमतबंद करील!’
रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगल कार्याची धुंदळ सरली. कार्याला आलेली मावळे-मंडळी गावोगाव पांगली. भोसलेकुळीची ‘ठेव’ म्हणून
पिवळ्या येसूबाईना घेऊन पिलाजीराजे शिर्के शुंगारपुराकडे परतले.
पौष मासाची अमावास्या तोंडावर आली. या अमावास्येला ‘सुर्व्याला गिऱ्हाण पडणार’ अशी बोलवा मावळमुलखात उठली. प्रभाकरभटांनी पंचांग मांडून तिची खातरजमा करून घेतली. त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की, “तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान, धान्यदान, सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी.”
राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मनी धरले. फार दिवस मनी असलेली एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते. आपल्या मातुश्री आऊसाहेबांची आणि
स्वराज्यासाठी चंदनखोडासारख्या झीज घेतलेल्या वृद्ध सोनोपंत डबीरांची सुवर्णतुला राजे जोखणार होते. त्यांच्या भारंभाराएवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहू-
केतूंना ‘गिऱ्हाण सोडीचं’ साकडे घालणार होते!
राजांच्या आज्ञा सुटल्या. केसो नारायण सबनीस आणि मुजुमदार निळो सोनदेव यांनी सोनमोहरांचे पेटारे हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले. प्रतापगडावरचे अर्जोजी यादव महाबळेश्वराच्या शिवालयासमोर सुवर्णतुलेचा सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले.
शुभयोगावर राजांनी जिजाऊसाहेब, बाळ शंभूराजे, पुतळाबाई, सोनोपंत डबीर आणि निवडक धारकरी यांच्यासह राजगड सोडला.
जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुलादानाची कल्पना राजांनी दिली नव्हती.
हटत्या हिवाळ्याचे साजरेपण अंगी मिरविणाऱ्या, गर्द, निळ्या वनराईत दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खासे मेणे ठाण झाले. हे स्थान “शिवा’चे होते. निसर्गाने आपले अवघे “शिवपण’ इथे मुक्त हस्ताने उधळले होते.
राजांनी पुढे होत हातजोड देऊन मासाहेबांना मेणाउतार केले. पाठोपाठ पुतळाबाई, शंभूराजे मेण्यातून उतरले. सूर्य मावळतीला लागला होता. त्याच्या लांबट किरण फेकीत भोवतीचा परिसर देखणा दिसत होता. शंभूराजे भोवतीच्या मुलखाचे सुरूरपण बघताच हरखून गेले. त्यांच्या उगात कसलीतरी घालमेल उसळून उठू बघत होती. गरगर नजर फेकीत, ते मिळेल तेवढे सारे डोळ्यांत सामावून घेऊ पाहत होते.
बाळराजांच्या छातीवरची कवड्यांची माळ लयीत पण वाढत्या चालीनं वर खाली होऊ लागली. कानांतले सोनचौकडे डुलू लागले. ही कसली उलघाल आहे त्यांचे त्यांनाच उमगेना. जखडत्या नजरेने ते सभोवती नुसते बघतच होते! त्यांना काहीतरी जाणवत होते, पण ते नीट पारखता येत नव्हते! खांद्यावर पडलेल्या हाताने आणि “ शंभूबाळ!’ या सादेने ते भानावर आले. समोर आबासाहेब उभे होते. ते हसत म्हणाले, “एवढं रोखल्या नजरेनं काय बघता आहात बाळराजे? आम्ही दोन वेळा साद घातली. तुमचं ध्यान नव्हतं!”
शंभूराजे हसले. शिवलिंगाच्या त्या अवघ्या सूलखाच्या रोखाने हात फिरवीत म्हणाले, “आम्ही हे सारं बघत होतो महाराजसाहेब. हे डोंगर, हे आभाळ, पक्षी, झाडं
आमच्याशी बोलू बघताहेत असं आम्हास वाटलं!”
राजे ते ऐकून गंभीर झाले. बाळराजांचा खांदा थोपटीत म्हणाले, “भाग्यवान आहात! झाडापेडांची बोलीभाषा कळायला योग्याचं किंवा कवीचं मन लागतं! फार
थोड्यांना ते मिळतं!”
शंभूराजांनी आबासाहेबांच्या कपाळावरच्या आडव्या शिवगंधाकडे क्षणभर बघितले. राजे बाळराजांना घेऊन तुलादानाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी
सज्ज्याकडे चालले. महाबळेश्वरचा पुराणा डोंगरमाथा आपली कैक सालांची समाधी भंगवून त्या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता. त्याला एक “शिवयोगी” आणि मऱ्हाटबोलीचा “पहिला राजकबी’ दिसत होता!!
सूर्यग्रहणाचा तळमळता दिवस उगवण्याच्या खटपटीला लागला. पहाटस्त्रान घेतलेले राजे, पुतळाबाई, मातुश्री आऊसाहेब, सोनोपंत डबीर आणि बाळराजे यांच्यासह
सुवर्णतुलेसाठी सजलेल्या सज्याजवळ आले.
पहाटमुहूर्तावर उपाध्यायांनी तुलेच्या अंगथोर, रूपेरी पारड्यांची सविध पूजा बांधली. मंत्रघोष उठू लागले.
जिजाबाईंच्या शिवचरणांना हात लावून राजे अदबीने म्हणाले, “मासाहेब, चलावं. तुलादानासाठी पारड्यात बैठक घ्यावी.” जिजाबाईंनी क्षणभर राजांच्या डोळ्यांत पाहिले आणि त्या गहिवरल्या शब्दाने बोलून गेल्या, “आमची तुला कशापायी जोखता राजे?”
त्यांच्या सतेज पायांवर जोडलेली नजर तशीच ठेवून राजे म्हणाले, “साक्षात सूर्यनारायणास पडणारं साकडं खुलं करण्यासाठी आपली नाही तर कुणाची तुला आम्ही
जोखावी? मासाहेब आमची ही इच्छा आहे. चलावं.”
राजांनी हात-आधार देत जिजाबाईंना तुलेजवळ आणले. आऊसाहेबांनी पारड्यावर कुंकू-हळदीची चिमटी सोडली. “जगदंबे’ असे हलकेच पुटपुटत मासाहेबांनी रूपेरी पारड्यात आपले उजवे सोनपुतळ पाऊल ठेवले! पारडे सज्ज्याच्या फरसबंदीला चिकटले. सदरेवर घ्यावी तशी बैठक मासाहेबांनी पारड्यात घेतली.
मंत्रघोषांच्या गजरात तुलादानास प्रारंभ झाला. ओंजळी ओंजळींनी राजे आणि पुतळाबाई झळझळीत सोनमोहरा रित्या पारड्यात सोडू लागले.
थोरल्या मासाहेबांचे पारड्यात बैठक घेतलेले आगळे रूप पाहून बाळराजांना मनोमन वाटत होते, ‘थोरल्या आऊसाहेब अशाच एका पारड्यात बसून राहाव्यात!
क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३४
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव