महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,693

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०५

By Discover Maharashtra Views: 3843 5 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा – भाग ०५

मोहरांच्या थैलीचा सतका बाळराजांवरून उतरून राजांनी ती थैली एका तबकात ठेवली. हातांतील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले. किंचित वाकून हलक्या हातांनी ते गोड ओझे आपल्याकडे घेताना नकळतच राजांची घारी नजर मंचकाकडे गेली. डोळ्यांना डोळे क्षणमात्र भिडले; क्षेमकुशल नजरेतच विचारले गेले.

हातातील धडपडणाऱ्या बाळजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यांतले भाव क्षणात बदलले. गनिमांवर एल्गारी चाल करताना आग वर्षविणारे त्यांचे निमुळते डोळे, हातांतली कोवळ्या जिवावर वावर वात्सल्याची मूक बरसात करू लागले. बाळराजांच्या बिटबिट्या सतेज डोळ्यांत पाहताना राजांचे भान हरपले होते. मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभ्या असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुकभरल्या नजरेने पाहत होत्या. तीन पिढ्यांचा तो अतिशय बोलका मूक संवाद फक्त शांतपणे जळण्याची ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनाच कळत होता!

नकळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली. तिथे उंबरठ्याबाहेर, उत्सुकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटीवाटीने उभी होती. जिजाबाईची नजर वळताच त्यांनी तिथूनच अदबमुजरे केले. त्या मंडळींत माणकोजी, सुभानजी, संभाजी कावजी, येसाजी, तान्हाजी, नूरखान बेग सारे मीठजागते इमान होते. त्या सर्वांना आपले “धाकले धनी एकदा नदरं पडावेत ‘, असे वाटत होते. त्या मोहऱ्यानेच ते सारे उंबरठ्याबाहेर दाटले

त्यांच्यावरची नजर उचलून राजांच्याकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या,
“पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब, नाही राजे? ”

अं! मतलब मासाहेब? आमच्या ध्यानी नाही आलं…” राजांची पुत्रमुखदर्शनाची समाधी भंगली.

“नाही – म्हणजे हमेशा तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्याबरोबर दौडणारी खाशी मंडळी दरवाजातच खोळंबलीत! त्यांनाही बाळराजांना पाहावंसं वाटतंय!” जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले.

आपल्या हातातील बाळराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्यासाठी हाताची इशारत केली. तशी सारी मंडळी दालनात आली. फक्त नूरखान बेग बाहेर राहिला. मुघलाने राजांच्या राणीवशात कसे कदम टाकायचे? त्याची अडचण राजांनी हेरली.

“खान, तुम्ही का थांबलात? बेशक आत या.” राजांनीच त्याची कोंडी फोडली.

नूरखानही आत आला.

जिजाबाईंनी बाळराजांना माणकोजींच्या हाती दिले. भुवया चढवीत, डोकीवरची पगडी डोलवून त्यांनी बाळराजांना डोळाभर पाहून संभाजी कावजीच्या थोराड हातात दिले.

“हा$” करीत संभाजीने बाळराजांना आपल्या हातात अलगद घेतले, तशा जिजाबाई म्हणाल्या –

“सांभाळून घे रे बाबा, उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारा तू;

अजून बाळराजांची मान नाही धरली!” सगळे जण त्या बोलांनी दिलखुलास हसले.

“छ्या! एवढं ग्वाड वजं कळत न्हाई व्हय मासाब…” म्हणत संभाजीने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत बाळराजांना तान्हाजीच्या बळजोर_ हाती दिले. बाळराजांना हाती घेताना तान्हाजीच्या भरगच्च मिश्या ताठरल्या. तो संभाजीला म्हणाला,

“हां.., तेवडं बोलू नगं! मासाब म्हनत्यात त्ये खरं हाय. बरं का मासाब, जुन्नरच्या
चालीत ह्यो नि मीच हुतो पागंतली घोडी भाईर काढाय. पागंवरलं धारकरी आमी कापून
काढलं. म्या तेगीनं घोड्यांचं बंद कापलं. आमी सारी घोडी भाईर काढाया लागलो तर
गलिमांचं याक हत्यारबंद भिरं ‘मारो.. मारो! ‘ वरडत थेट चाल करून आलं. ह्यो म्हनला –
तान्हाजीराव, निस्ता पट्टा घुमवत माज्याबराबर या. गमज्या दावतो. ‘ आन चाल करून आलेल्या धारकऱ्यांवर ह्यो पठ्ठ्या पागंतलंच याक घोडं, त्येच्या पोटाखाली मान घालून उचलून “हर.. हर म्हादेव ‘ वरडत, थयथय नाचत धावला की! ह्येचं भुतावानी ध्यान बघून त्ये बिचारं “तोबा, तोबा ? करीत पळालं. असा ह्यो संबाजी हाय!” तान्हाजीच्या रांगड्या विनोदाने राजांसह सगळे खुशदिल होऊन हसले.

नूरखान बेगने बाळराजांना पाहून काढलेले, “कैसा सुरूर बच्चा हे!” हे उद्गार त्या हास्यात कुणालाच ऐकू गेले नाहीत.

बाळराजांना पाहून सारे जण बाहेर पडले. राजांना आणि सईबाईंना मोकळे बोलता यावे म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या हातातील बाळराजांना सईबाईंच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले. शब्दांना कशी चाल द्यावी, हे दोघांनाही उकलत नव्हते. इतक्यात इंगळांवर ओवा घातलेली, धूर उसळती धुनी हातांत घेऊन एक कुणबीण दालनाच्या दरवाजात डोकावली.

राजांना आत बघताच ती गडबडून गेली! धुनीची पाटी सावरून डोकीवरचा पदर कसा
सावरावा हेच तिला सुधरेना! गोंधळून ती माघारा परतणार एवढ्यात राजांनीच तिला ये असा हाताने विश्वास दिला!

आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने जात तिने सईबाईच्या ड्बाः च्या मंचकाखाली हातातील धुनीची लोखंडी पाटी सारली. गडबडीने डोकीवरचा पदर नीट केला, आणि तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशीच शरमली! आल्या पावलीच ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर निसटली. तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्याचा उग्रमधुर वास राजांच्या आणि सईबाईंच्या नाकाला जाणवला. त्या वासाबरोबरच त्यांची नजर एकमेकांना भिडली. दोघेही शांतसुंदर हसले! डोळेच उदंड बोलून गेले.

क्रमशः………..!

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment