धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा – भाग ०६
“तब्येतीस आराम?” राजांनी विचारले.
काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या. ओव्याच्या तिखट धुराने
बाळराजांनी खुसपुसायला सुरुवात केली.
“येतो आम्ही,” म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबून
दरवाजाकडे चालू लागले. धुराने भरल्या दालनातून धीरपुरुष चालत होता.
त्यांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना सईबाईची तृस्त नजर त्यांच्या टोपातील
ऐटदारपणे डुलणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगाबरोबरर त्यांचे मनपाखरू
डुलत होते. त्यांना सांगत होते – “तीन मुलींच्या पाठीवर हे बाळराजे झाले. त्यांना भरल्या
डोळ्यांनी बघून परतणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते! एरव्ही मुलूखभर धावणी
करताना पाठीवर धूळलोट घेत दौडणारी स्वारी, आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र
पाठीवर ओव्याचा धूरलोट घेऊन चालली आहे! कुंकुबळ असावं तर असं! !
सईबाईंच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महालात दाखल
झाले.
“खबर मिळाल्यापासून बाळराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्याएवढी तरी
फुरसद मिळाली की नाही राजे?” राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत
करीत जिजाबाईंनी जाब केला.
“नाही मासाहेब, आम्हाला तुमच्या खलित्यातील एकाच बाबीची सारखी याद
लागली.” न बसता उभे राहूनच राजे अदबीने बोलत होते.
“कोणत्या? ”
““आम्ही थोरल्या आऊ झालो. या तुमच्या बोलांची! ”
“म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की? आम्ही ते
केव्हाच योजून आहोत. पण पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब, नाही राजे?”
पुन्हा आऊसाहेबांनी तोच सवाल टाकला. त्या सवालाने त्यांच्या समोर उभे असलेले राजे
आता मात्र पुरते जाया झाले. काय बोलावे? कसा जाब द्यावा?
“अंड मतलब मासाहेब? आमची काही गल्लत…” राजे घोटाळले, अडखळले.
“तशी गल्लत नाही – पण गड चढून येताच कधी नव्हे ते; पायांवर पाणी
घ्यायच्या आधीच सिधे दरुणीमहालात आलात! कसं?” जिजाऊंनी हसून विचारले.
राजांच्या धारदार नाकाजवळच्या निमुळत्या डोळ्यांवरच्या पापण्या त्या बोलांनी
क्षणभर लवल्या! दुसऱ्याच क्षणी मुजरा घालीत राजे वळले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे
बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर, अवखळपणे हिंदकळणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या
मोतीलगावर पंख पसरून बसलेले त्यांचे मातृहूदय त्यांना सांगत होते – “एवढ्या दौडी
घेतात, आता बाळराजांचे आबा झाले, तरी राजांचं पोरपण काही गेलं नाही! ते कधीच
जाऊ नये! फर्जंद असावेत तर असे! ‘ जिजाबाई त्या विचारांनी स्वतःशीच हसल्या. त्या
वेळी राजे महालाबाहेरच्या चौकात घंगाळातील पाणी गडव्याने पायांवर घेत होते.
त्यांच्या टोपाला लगटलेली मोतीलग मात्र स्थिर होती!
ज्येष्ठ वद्य अष्टमीचा सूर्य उगवतीचे मोर्चे फोडू लागला. फटफटीलाच सुरू झालेल्या बालेकिल्ल्याच्या नगारखान्यातील चौघड्याने आणि पिपाणीच्या सुरावटींनी
पुरंदरचे अठरा कारखाने जागविले. हिरव्या आंबवतीच्या रसवंत आराशींनी गडाचे पत्थरी
दरवाजेसुद्धा जिंदादिल केले! बालेकिल्ल्याच्या माथ्यावरचा भगवा जरीपटका आभाळाला
थपडा देत पहाटवाऱ्यावर फडफडू लागला.
हालगी, लेझमींच्या तालावर वाजतगाजत बाळंतविडे गड चढू लागले. थैलीपोच
झालेल्या नात्यागोत्यातील लागेबंद जनाना केव्हाच गडदाखल झाला होता. राजगडाहून
राजांच्या राणीवशाचे मेणे तर, पाचवीलाच गड चढून आले होते. सोयराबाई, पुतळाबाई,
गुणवंताबाई, सकवारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई या साती राण्यांनी
प्रभातरान आटोपून भरजरी शालू परिधान केले.
दरुणीमहालातील सईबाईचा महाल चिरागदानांच्या ज्योतींनी ऊरउजळता केला
होता. सुगंधी पुष्पमालांनी त्या ज्योतींचा प्रकाश गंधित केला!
आज बाळराजांच्या बारशाचा सोहळा होता!
प्रभाकरभट राजोपाध्यांनी मुहूर्तासाठी घंगाळात घटिकापात्र सोडले. सईबाईच्या
महालात पुष्पमाला आणि जरीबतूने शृंगारलेल्या पाळण्याभोवती सवाष्णींनी रांगोळी
रेखली. त्यांच्या खाली कणकीच्या तेवत्या दिवल्यांची पंचकडी मांडली.
चंद्रकळी शालू नेसलेल्या सईबाई, सोन्याची फुले मढविलेली घुंची घातलेल्या,
जरीचे अंगडे ल्यालेल्या बाळराजांना घेऊन चांदीच्या फुलांच्या चंदनी पाटावर बसल्या.
त्या पाटाभोवती रांगोळीचे नाजूक नकसकाम फिरले होते. पूर्वाभिमुख बसलेल्या, तृप्त
डोळ्यांच्या आपल्या लेकुरवाळ्या सूनबाईकडे डोळाभर पाहत शेजारीच जिजाबाई उभ्या
होत्या.
सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई अशा रक्ताच्या नात्यातील पाच सवाष्णी
सईबाईंच्या सामोऱ्या आल्या. सईबाईंच्या मळवटभरल्या सावळ्या मुखाभोवती फेर धरू
लागल्या. खणानारळानं भरलेली एक ओटी रिकामी करून दुसरी ओटी घ्यायलाही त्यांना
फुरसद मिळत नव्हती. औक्षणाच्या ओवाळण्याची ती पंचारती खाली ठेवलीच जात
नव्हती! बाळंतविड्याची झिंबड उडाली होती.
बाहेरून प्रभाकरभटांची मुहूर्त भरत आल्याची वर्दी आली. महालातील गडबड
वाढली. पाळण्याच्या एका बाजूला पुतळाबाई आणि दुसऱ्या बाजूला सोयराबाई उभ्या
राहिल्या. पाळण्याशेजारी तबकात ठेवलेला, घुंची-अंगडं घातलेला दगडी वरवंट्याचा
“गोपा ” पुतळाबाईंनी लाजून, हसत-हसत उचलला. “गोपाळ घ्या!” म्हणत तो मधल्या
पाळण्यावरून तीन वेळा सोयराबाईंच्या हाती दिला. पुन्हा तबकात ठेवला.
“नाव काय ठेवायचं?” कुणीतरी जाणती बोलली
“बाळराजांचं नाव – संभाजीराजे ठेवा! त्यांच्या काकामहाराजांची ती यादगीर
आहे!” जिजाबाईंच्या पापणीकडा, ते नाव सांगताना आपल्या थोरल्या पुत्राच्या
आठवणीने पाणावल्या.
क्रमशः………..!
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव