महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,570

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०८

Views: 3786
5 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा – भाग ०८

सई बाई म्हणाल्या“बाई, इथं पडून वरच्या तख्तपोशीकडं बघायचा कंटाळा आला. चार कदम चालावं म्हटलं, तर पाय थारा देत नाहीत.” सईबाईंच्या पापण्यांभोवतीची काळी वर्तुळे बघून पुतळाबाईंचे मन थरकले. काय बोलावं ते त्यांना सुचेना म्हणून शांत चालीने भिंतीकडे जात त्यांनी सईबाईंच्या मंचकावर वाऱ्याचा मारा करणाऱ्या खिडकीचे दार बंद केले. चिराखदानातल्या ज्योती स्थिरावल्या.

“आऊ, आम्ही बाळराजांना घेऊ?” सईबाईंच्या मंचकाशेजारी उभ्या असलेल्या सखूबाईंनी विचारले.

“हां घ्या की.” म्हणत सईबाई डाव्या कुशीवर वळल्या आणि बाळराजांना उचलून त्यांच्या हातात देण्यासाठी उठून बसू लागल्या. लगबगीने पुढे होत पुतळाबाईंनी
मंचकावरच्या बाळराजांना सखूबाईच्या हातात हळुवारपणे दिले. अर्धवट उठलेल्या सईबाईंच्या मानेखाली हात देऊन त्यांना मंचकावर लेटते केले!

बाळराजांना घेऊन सखूबाई मंचकालगतच्या बिछायतीवर बसल्या. राणूने आणि अंबाने डोळे मोठ्ठे करीत बाळराजांच्या गालांवर हात फिरविला. त्या तिघी बहिणी
आपल्या भाऊराजाकडे बघण्यात स्वतःला हरवून गेल्या होत्या. सखूबाईच्या या मांडीवर आपले चिमुकले पाय उडवीत बाळराजे चिराखदानातल्या ज्योतीकडे टक लावून बघत होते. त्या चौघींकडे बघताना राजांच्या आठवणीत सईबाई हरवल्या होत्या, आणि त्या साऱ्यांना प्रसन्न बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या.

▶ “प्रतापगडावयनं मोरूपंत आल्यात धनी. हुकूम व्हईल तर रुजू व्हावं म्हनत्यात.” मुजरा घालीत किल्लेदार नेताजींनी सदरमहालाच्या बैठकीवर लोडाला टेकलेल्या
शिवाजीमहाराजांना खबर दिली.

“येऊ द्या पंतांना.” राजांनी नेताजींना समंती दिली.

मोरोपंत सदरमहालात आले. त्यांनी राजांना मुजरा रुजू केला. केळीच्या
मोन्यासारखे ते उंच होते. त्यांचा रंग आणि भाव तसाच प्रसन्न होता.

“बोला पंत, प्रतापगडाच्या तटबांधणीचं काम पुरं झालं, हे ऐकायला आम्ही
उत्सुक आहोत. ”

“होय महाराज, जवळ-जवळ सारं काम पुरं होत आलं. राहिलं ते जमादारखान्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच – पण ते एवढा हिसाब धरावं असं
नाही. आम्ही जातीनिशी रुजू झालो ते एक खाशी खबर स्वामींच्या कानांवर घालण्यासाठी. ”

“कोण खबर? बोला पंत.” राजांच्या भुवया चढल्या.

“महाराज, गडाच्या तटबांधणीला मोठा शुभशकुन झाला. बांधकामात कारागिरांना एका स्वयंभू शिवलिंगानं दर्शन दिलं!” मोरोपंतांची मुद्रा, ते सांगताना
उजळून गेली.

“जगदंब! पंत, मोठी योगायोगाची बाब आहे ही. बाळराजांचे नाव आम्ही ‘शंभू ठेवलं आणि गडाच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग वलिंग सापडलं! बघू प्रतापगड आम्हांला श्रींच्या कार्यात कोणता शुभशकुन करतो ते! तुम्ही हात ओले करून घ्या. आम्ही

जातीनिशी तुमच्याबरोबर प्रतापगडाकडं निघू, त्या शंभोच्या दर्शनासाठी! ”

गडाच्या दरडीवरच्या निवडुंग आणि करवंदीच्या गर्दाव्यात, रंग बदललेले शेंदरी
सरडे शीळ भरू लागले. त्यांना मृगाच्या पावसाचा सपळ लागला. मावळाच्या
भातखाचरातील तरवे रानशेणींनी, चगाळ्यांनी आणि घाणेरीच्या काटक्यांनी जाळून,
कुणब्यांनी बियाण्यासाठी भाजक्या भुईची कूस तयार केली!

राजे पुरंदरेश्वराचे दर्शन घेऊन आले. “आम्ही येत आहोत” अशी वर्दी त्यांनी
सईबाईंना पाठविली. आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते. त्या
खबरीने सईबाईच्या मनात काहूर माजले होते. उगाच त्यांचा हात एकसारखा
बाळराजांवरून फिरत होता.

▶“आज आम्ही गड उतरणार.” विचारात गुंतवा झालेल्या सईबाई राजांच्या
बोलांनी भानावर आल्या. त्या अवस्थेतही त्यांच्या मनात, समोर राजे उभे असलेले पाहून
विचार आला, ‘हे असंच रानवाऱ्यासारखं सपळ न देता येणं नि निघून जाणं! ‘ कुणबिणीने
मंचकाखाली ठेवलेल्या धुनीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला.

“तब्येतीस जपा. या गडावर वारा बळजोर. आता पडत्या पावसात तो बेगुमान
होईल. गैरअंदाज खुल्यावर येऊ नका. बाळराजांना सांभाळा. ज्योतिषी म्हणतात, ते रुद्र
होऊन आलेत! रुद्र सांभाळणे कठीण!” राजांनी वाकून सईबाईच्या कुशीतील शंभूबाळांना
उचलले. काजळ भरल्या, तीट रेखाटल्या त्यांच्या बालमुखावर राजांची नजर स्थिरावली.
ते स्वतःशीच मंद हसले. त्यांचे रक्तजागते, रसरशीत निमुळते ओठ बाळराजांच्या
कपाळावर टेकले. शिवगंधाला घेऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर
सरकले. डोळे क्षणभर मिटले गेले. बाळशिवावर ओळंबून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबल,
सईबाई धुराने लागणारे ठसके घशातच रोधून एकटक पाहत होत्या. त्यांचा सावळा चेहरा
उजळला होता.

राजांनी डोळे उघडले. हातातील बाळराजांना सईबाईच्याजवळ ठेवले. त्यांना
बिलगते घेण्यासाठी पसरलेल्या सईबाईच्या हातांतील नादभरल्या कंकणांचा स्पर्श
राजांच्या सडक बोटांना झाला! दोघांच्याही मनात उदंड सूर किणकिणले!

“येऊ आम्ही?” म्हणत राजे सिधे दालनाबाहेर पडू लागले. सईबाईना काहीच
दिसत नव्हते. दालनात दाटलेल्या धुरामुळे की त्या तिखट धुराने डोळ्यांत उभ्या
राहिलेल्या पाण्यामुळे, ते त्यांचे त्यांनाच कळत नव्हते!

जिजाबाईंनी हातावर ठेवलेली दह्याची कवडी ओठाआड करून राजे मोरोपंत,
माणकोजी, तान्हाजी, नूरखान यांच्यासह पुरंदर उतरले.

प्रतापगडाकडे राजे गेले. पाठोपाठ राजांचा राणीवसा राजगडाकडे पावता झाला.
ओली बाळंतीण म्हणून सईबाईंना हा पावसाळा पुरंदरावरच काढावा लागणार होता.

क्रमशः………..!

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment