धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा – भाग ०९
▶तीन महिने तरी त्यांना हलविता येणार नव्हते. म्हणून एकट्या पुतळाबाई पुरंदरावर मागे
राहिल्या.
काळ्या मुंगांचे भिरे रांगा धरून, पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरे
अन्नकण तोंडात घेऊन उंचाव्यावरच्या वारूळांकडे जाताना दिसू लागले. खाशा
महालावरच्या झडी गड्यांनी बांधून घेतल्या. सर्पणाची जळाऊ लाकडे दगडी कोठारात
आबादान झाली. पुरंदरच्या वाऱ्याने अलवार गारवा पांघरला!
आभाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भरदार घोडी उतरवली.
सपासप चौखूर उधळून त्यांनी मावळी मुलखावर एल्गार केला! तापले कातळ निवांत
झाले. गुरगुरणारे तांबडे पाणलोट उड्या घेत कऱ्हेला सामील झाले. कुणब्यांनी तयार
केलेल्या भाजक्या भुईच्या कुशी, आभाळाचे दान घेऊन सुखावल्या! आता अवघ्या बारा
मावळांवर चार-पाच महिने राज्य राहणार होते, ते या ढगांचे आणि बेलगाम पावसाळी
वाऱ्याचे!
▶कोंढाणा स्वराज्यात रुजू झाला खरे, पण राजांचा एक भावगड मात्र झुरू लागला.
पुरंदरावर सईबाईंची तबियत ढासळू लागली. जिजाबाईंनी जाबाईनी महाडहून
दुखणेपारखी णेपारखी गंगाधर वैद्यांना बलावू धाडून गडावर आणविले. गेले कित्येक रोज
त्यांनी आपले वैद्यक डोळ्यांत तेल घालून राबविले होते. औषधी पाल्यांचे रस, काढे,
मात्राप्रयोग, शेक हरएक उपाव करून ते थकले होते. त्यांना व्याधीचे निदान कळून चुकले
होते. जिजाबाईंच्या खाजगीच्या महालात ते हातातील विविध गुणांच्या अष्टमात्रा
चाळवीत खाली मान घालून उभे होते.
“वैद्यबुवा, आमच्या सूनबाई अंग धरत नाहीत. तुम्हीहून आम्हास काही बोलत
नाही हा कोण मामला? आम्हांस धीर निघत नाही.” जिजाबाईनी आपली व्यथा उघडी
केली.
“आऊसाहेब, सारे उपाय हरले. शेक, काढे, मात्राप्रयोग, लेप कशामुळंच गुण
नाही. वाऱ्याची झमकी येताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो. खिडक्या- दरवाजे
बंद होताच ओठाला सोक पडतो. सरकारांचा सावळा मुखोडा फिका पडत चालला. मला
तरी हे लक्षण…” वैद्य कसे बोलावे, हे न सुचून चाचपडले.
“कसलं… कसलं वाटतं वैद्यबुवा?” जिजाबाईचा आवाज कातरला होता.
“हे… हे बाळंतव्याधीचं लक्षण आहे, आऊसाहेब!” वैद्यांचा आवाज घोगरा झाला.
मान अधिकच खाली गेली. हातातील अष्टमात्रा त्यांनी कसनुशा चाळविल्या.
▶“बाळंतव्याधी!” अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई सुन्न होऊन न
स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यांसमोर दोन मुद्रा तरळत होत्या. एक पाठीवर
मरण टाकून, कबिल्याकडे पाठमोरे होत मुलूखभर दौडणाऱ्या राजांची… आणि दुसरी,
ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत
नसलेल्या बाळराजांची! बाहेर पुरातन पुरंदर मात्र श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ मन लावून खेळतच होता. महालाबाहेर पडणाऱ्या विचारमग्न वैद्यांना आपल्या हातातील एक मात्रा निसटून खालच्या फरसबंदीवर केव्हा पडली, हे लक्षातच आले नाही!! पडलेली ती
मात्रा फार-फार गुणकारी होती!!
राजांच्या तारिफेच्या राजकारणी मामल्यात एका व्याधीवर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती. ती व्याधी होती जंजिरेकर हबश्यांची! दर्याची खोळ पांघरलेला जंजिऱ्याच्या बिकट बसकणीत बसलेला सिद्दी, मजलेत येईल तितुकी कोकणची किनारपट्टी तसनस
करीत होता. दस्त होईल तेवढी कुणबी रियाया, दर्यावरून राजरोस लोटून नेऊन गुलाम करून त्यांचा दूरदेशी विक्रा मांडीत होता.
आपल्या मुलखाला पारखे होताना आक्रोशणाऱ्या या देशीच्या असामीच्या डोळ्यांतून कोसळलेल्या आसवांनी दर्याचे खारेपण निबर केले होते! दर्याला त्याची खसखससुद्धा पर्वा नव्हती! ती वाटायला सर्जा राजा
पाहिजे होता. राजांनी हे सारे हेरले होते!
रघुनाथ बल्लाळ अत्र्यांना राजांनी जंजिऱ्याचा दर्या रंगविण्याचा विडा दिला. त्यांच्या कुमकेला मायनाक भंडारी, दर्यासारंग दौलतखान हे दर्याचे खासे फर्जंद नामजाद करून दिले.
अत्र्यांनी दंडाराजपुरीचा किनारा मारून जंजिऱ्याला मोर्चे घातले. अत्रे शर्थीने भांडले. दोन्हीकडचे कैक धारकरी पडले. पण जंजिरा दस्त झाला नाही. राजांनी
सिद्द्यावर काढलेली सासवडी मात्रा लागू पडली नाही. हा सल राजांना फार रुतला.सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पचविणे पडतेच!
▶आता सईबाईंना पुरंदरावरून हलविणे भागच होते. बाळंतव्याधीने बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी
शंभूबाळाचे रडणे थोपविले होते. काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होत्या. कबिला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला
होता.
चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई, पुतळाबाई यांच्यासह पुरंदर सोडला.मेणे राजगडाच्या वाटेला लागले. बाळराजांना खांद्यावर घेऊन भोई भुई तुडवू लागले!बाळशंभू राजगडाकडे चालले.
किल्ले राजगड! गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी-कडा! सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्यावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला
अस्मानी पक्षी! गणपती, पद्मावती, मारुती, कालेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडविणारी बारा मावळांतील उच्चासनी पंढरी! राजांच्या मर्मबंधाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुप्पी!
किल्ले रायगड डोळ्यांच्या बाहुल्यांत आला. मेण्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गड-उतार झाले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांझेकर, वासुदेवपंत हणमंते,
प्रतापराव सिलीमकर, सिदोजी थोपटे अशी मंडळी होती.
पुढे होत आपली गर्दन झुकवून राजांनी आऊसाहेबांना मुजरा घातला. आपली
निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेणाउतार व्हायला आधार दिला.
मागच्या मेण्यातून बाळराजांसह उतरलेल्या सईबाईच्यावरून कुणीतरी कुणबीण जितं
कोंबडं उतरत होती. सईबाईंच्या सुकल्या देहाकडे आणि घरंगळणाऱ्या कांकणांकडे
पाहताना राजांच्या आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला!
“सूनबाईचा मेणा पद्यावतीवर जाऊ द्या. आम्ही तुमच्या संगती पायीच निघू
राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे.” जिजाबाई सईबाईंच्या मेण्याच्या
भोयांकडे पाहत म्हणाल्या. सईबाई, पुतळाबाई पुन्हा मेण्यात बसल्या. त्यांचे मेणे गडाच्या
वाटेला लागले. जिजाबाईच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले.
जिजाऊ बोलत होत्या. राजे फक्त ऐकत होते!
राजगडावरच्या खाजगीच्या महालात जिजाबाई बसल्या होत्या. सईबाई सोडूनराजांच्या सर्व राण्यांचा राणीवसा समोर उभा होता. भोवती जळणाऱ्या चिराखदानांवर
काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या. त्यांच्या वाती कुणीतरी सरशा करायला पाहिजे होत्या.
राजगडाचा सारा हालहवाल विचारून होताच जिजाबाईनी मनातील हेत उभा केला.
“थोरल्या सूनबाईना जडू नये ती व्याधी जडली. बाळराजांचा पदर त्यांना तोडावा लागला. शंभूबाळांना दुधास लावणे हा पेच आहे.” जिजाबाई शांतपणे बोलल्या.
राणीवसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता!
“धाकल्या सूनबाई, बोला काही मसलत सुचवा.” जिजाबाईंनी सोयराबाईंच्या चंद्रकळी शालूवर आपली नजर जोडीत त्यांना विचारलं.
“आम्ही काय मसलत बोलावी? आऊसाहेब करतील ते कोण करणार?”सोयराबाईंनी पदर नीट केला. त्यांच्या शालूवरचे जरीबुट्टे लख्खन उजळले!
“ते तर आम्ही करूच. तुम्हास काही सुचलं तर ऐकावं, हा आमचा मनशा.” जिजाबाईंचा शांतपणा तसाच होता.
फक्त पुतळाबाईनी एकदा नजर उचलली. त्यांना काहीतरी बोलायचे असावे, पण समोरच्या काजळी दाटल्या ज्योतीवर नजर पडताच त्या थांबल्या. आपली नजर त्यांनी
पायगती टाकली. असहायपणे! काही क्षण तसेच गेले. सुन्न शांततेत.
“या साऱ्याजणी जणी !” जिजाबाईंनी साऱ्यांना जाण्याची इशारत रत केली.
“पुतळाबाई, तुमच्या स्वारीला आम्ही याद केल्याची वर्दी द्या! आणि थोरल्या
सूनबाईकडे एक जाड पोताचं कांबळं पाठवून द्या.” पाठमोऱ्या पुतळाबाईंना ळाबाईंना
जिजाबाई बोलल्या.
“जी!” पुतळाबाई कसल्यातरी विचारभिंगरीतून भानावर येत म्हणाल्या आणि त्याही इतर राणीवशामागोमाग महालाबाहेर पडल्या.
क्रमशः………..!
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव