महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,909

छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर)

By Discover Maharashtra Views: 3581 7 Min Read

छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) –

छत्रपती राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी  २३ मे १६९८ रोजी विशाळगडावर संभाजी महाराजांचा जन्म झाला.राजसबाई राणीसाहेब या छत्रपती राजाराम महाराजांच्या तिसर्या पत्नी होत्या. ताराराणींने छत्रपती शाहूंमहाराजांना विरोध करीत  निर्माण केलेले कोल्हापूर राज्य १७१४ मध्ये राजसबाई व संभाजीराजे यांनी अकस्मात  ताराराणी व त्यांचे पुत्र शिवाजीराजे यांना कैद करून हस्तगत केले. संभाजीराजे कोल्हापूर राज्याचे दुसरे छत्रपती झाले. संभाजीराजे यांची छत्रपतींच्या दोन घराण्यात राज्याचे विभाजन व्हावे अशी इच्छा आरंभापासून केलेली होती. पण आरंभीच्या धामधुमीच्या काळात त्यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही .आणि त्यातूनच मग दोन्ही राजवटीत वाद वाढत गेले.(छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज)

संभाजी राजे कोल्हापूर राज्याचे दुसरे छत्रपती झाले. त्यांनीही सातारा गादीशी चालू असलेले वैर सुरू ठेवले. ताराराणी यांच्या जवळचे मातब्बर सरदार चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर, दमाजी थोरात हे हैदराबादच्या निजामाच्या पदरी दाखल झाले होते. कान्होजी आंग्रे व खंडेराव दाभाडे हे सेनानी शाहुराजांच्या सेवेत दाखल झाले होते. त्यामुळे कोल्हापूर राज्याचे सामर्थ्य  कमी झाले होते. ऊलट सातारा राज्याचा विस्तार वेगाने चालू होता.

१७२० च्या सुमारास मोगलांचा दक्षिणचा सुभेदार हैदराबादचा निजाम याने मोगलांच्या सेनानींचा पराभव करून आपली स्वतंत्र राजवट स्थापन केली. शाहू महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याचा मुकाबला करण्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी निजामाकडे चंद्रसेन जाधव यांच्या मध्यस्थीने शाहूराजांविरुद्ध निजामाची बाजू धरली.उदाजीराव चव्हाण यांनी शाहू महाराजांच्या मुलखात जोरदार आक्रमणे चालवली. संभाजीराजांना आता उदाजीराव चव्हाणांकडून मोठ्या आशा वाटू लागल्या. छत्रपती शाहू महाराजांनी ह्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी  शंभूसिंह जाधवराव ,सिधोजी निंबाळकर, पिलाजी जाधवराव,सेखोजी आंग्रे यांना उदाजीवर चालून जायला सांगितले.वारणा नदीकाठी वडगाव येथे दोन्ही फौजात मोठी लढाई झाली. कोल्हापूरकरांच्या सैन्याचा प्रचंड पराभव झाला.उदाजीराव व  छत्रपती संभाजीराजे निसटले पण ताराबाई, राजसबाई ,व्यंकटराव घोरपडे, भगवंतराव अमात्य या सर्वांना शाहूमहाराजांच्या फौजेने कैद केले.राजकुटुंबातील स्त्रियांना शाहू महाराजांनी सन्मानाने रवाना केले. या पराभवामुळे संभाजीराजांनी शाहू राजांकडे तहाची बोलणी लावली व अखेर  वडगावचा प्रसिद्ध तह  होऊन दोन्ही राजबंधूंमध्ये सलोखा निर्माण झाला. या तहाप्रमाणे वारणा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदी पर्यंतचा प्रदेश कोल्हापूर राज्याला देण्यात आला. या तहानंतर पदरी विशेष कर्तबगार माणसे नसल्याने व कोल्हापूर राज्याच्या सीमेवरील देसाई पाळेगार इत्यादींना आवर न  घालता आल्याने कोल्हापूर राज्याचा विस्तार होऊ शकला नाही.

वारणेच्या तहानंतर संभाजी राजे व शाहूराजे यांच्या दर दोन-तीन वर्षांनी भेटी होत राहिल्या.१७४०  मध्ये पहिल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे झाले. यावेळी नानासाहेब पेशवे व  संभाजीराजे यांच्यात एक गुप्त तह झाला. मराठ्यांची दोन्ही राज्ये एक करून शाहूराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांना छत्रपती करायचे व नानासाहेब पेशव्यांना मुख्य कारभारी नेमावयाचे अशा स्वरूपाचा हा तह होता.छत्रपती शाहूंमहाराजांना पुत्र   नसल्याने व हैदराबादचा निजाम व इतर शत्रू दोन्ही राज्यात फुट  पाडायचा प्रयत्न करीत असल्याने असा भविष्यकालीन तह केला गेला. पण तो कधीच प्रत्यक्षात आला नाही.

छत्रपती संभाजीराजांना कोल्हापूर राज्याच्या सीमेवरील सावंतवाडीचे सावंत व गोव्याचे पोर्तुगीज यांच्याशी संघर्षाचे प्रसंग येत असत पण १७३९  मध्ये शाहू महाराजांनी पोर्तुगीजांची वसई काबीज केल्याने पोर्तुगीज थंड पडले होते. वाडीच्या सावंतांचा एकदा पराभव करून संभाजीराजांनी त्यांनाही काबून ठेवले होते.

छत्रपती शाहू महाराजांच्या अंतिम काळात सातारा राज्याच्या वारसाचा प्रश्न किचकट बनला .शाहूराजांच्या पत्नी सकवारबाई यांना संभाजीराजे वारस  म्हणून पसंत होते तर ,महाराणी ताराबाईंनी आपले नातू रामराजे यांना दत्तक घ्यावे असा आग्रह शाहूराजांकडे धरला होता.अखेर रामराजांना वारस घ्यायचे ठरले व शाहूमहाराजांनी मृत्यूप्रसंगी यासंबंधीचे हुकूम देऊन नानासाहेब पेशव्यांना कारभाराचे प्रमुखपद वंशपरंपरेने दिले. यावेळी संभाजीराजे सैन्य देऊन साताऱ्यास निघाले होते पण त्यांच्या सुज्ञ पत्नी जिजाबाईने त्यांना रोखले. १७४९ मध्ये छत्रपती शाहूमहाराज निधन पावले. नंतर संभाजीराजांनी राज्यकारभारातून लक्ष हळूहळू कमी केले .त्यांच्या शिस्तप्रिय राणी जिजाबाई ह्याच कोल्हापूर राज्याचा कारभार पाहू लागल्या.

संभाजीराजे यांनी तब्बल ४६  वर्षे राज्य केले. एवढा प्रदीर्घ काल राज्य करण्याची संधी यापूर्वी छत्रपती घराण्यात कोणालाही मिळाली नव्हती. शककर्ते शिवाजी महाराजांनी ६ वर्षे  राज्य केले आणि राज्य विस्ताराच्या अनेक महत्त्वकांक्षा मनात असतानाच त्यांचे आयुर्मान संपले.छत्रपती   संभाजी महाराजांनी नऊ वर्षे सत्ता गाजवली आणि त्यानंतर त्यांना शत्रूच्या हाती पडून हौतात्म्य पत्करावे लागले. छत्रपती  राजाराम महाराजांना गादीवर बसण्याची शक्‍यता व संधी असूनही ते शेवटपर्यंत गादीवर बसलेच नाहीत , त्यांची सत्ता फार मर्यादित प्रदेशात ११ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालत होती.ते मराठ्यांचे अनभिषिक्त छत्रपती होते. त्यांच्यानंतर ताराराणी यांचे पुत्र दुसरे शिवाजी  गादीवर बसले . कोल्हापूर राज्याचे पहिले छत्रपती हे होत. ते १४ वर्षे राज्यावर होते. त्यानंतर त्यांना व ताराराणींना पन्हाळ्यावर नजर कैदेत राहावे लागले . संभाजी महाराजांनी मात्र इ.स.१७१४ पासून इ.स.१७६०  पर्यंत राज्य केले.या कालखंडात त्यांना रामचंद्रपंत अमात्यांसारख्या मुरब्बी मुत्सद्यांचे मार्गदर्शन लाभले.  त्यांच्या मातोश्री राजसबाई ही कारभारात लक्ष घालत असत.

राजसबाईंच्या वृध्दापकाळी  संभाजीराजे यांच्या कारभाराला महाराणी जिजाबाई यांनी  विशिष्ट वळण लावले. त्यांचा दरारा व शिस्त कोल्हापूर राज्याची अधिसत्ता बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरले. संभाजी राजे जिजाबाईंच्या धोरणा बाहेर फारसे जात नसावेत असे दिसते.छत्रपती शाहूमहाराजांचे निधन झाल्यानंतर संभाजीराजे यांनी साताऱ्याकडे फौजा वळल्या होत्या ;पण जिजाबाईंच्या सल्ल्यावरून त्यांनी आपला मोर्चा मागे वळविला.या प्रसंगाच्या अगोदर नानासाहेब पेशवे व संभाजीराजे यांचा इ.स.१७४० मध्ये जो इतिहास प्रसिद्ध करार झाला त्यावेळीही जिजाबाई  त्यांच्याबरोबर साताऱ्यास होत्या. त्यांना त्या कराराची चांगलीच माहिती होती. त्यांनी नानासाहेब पेशवे व सदाशिवराव भाऊ पेशवे यांना जी पत्रे लिहिली  त्यात त्या कराराची आठवण दिली आहे .ज्या ज्या वेळी संभाजीराजे साताऱ्याला जात असत त्या त्या वेळी जिजाबाई त्यांच्याबरोबर असत .

संभाजीराजे अत्यंत  धार्मिक वृत्तीचे होते हे त्यांनी मंदिरांना आणि साधुसंतांना दिलेल्या सनदा पत्रावरून दिसून येते.इ.स.१७२८ साली ते निजामाबरोबर  गोदावरीच्या खोऱ्यात लष्करी मोहिमेवर होते तेव्हा त्यांनी अंबाजोगाई येथील दत्तभक्त ,आणि प्रसिद्ध कवी दासोपंत यांच्या समाधी साठी ईनाम दिलेले आहे.तसेच वेदशास्रसंपन्न देवदत्त परमानंद कविंद्र या धर्मनिष्ठ विव्दानास गाव इनाम दिलेला आहे. हिंदु साधुंप्रमाणे  मुसलमान मशिदींनाही गाव इनाम दिल्याच्या नोंदी आढळतात.

संभाजी राजे यांच्या कारकिर्दीत  करवीर निवासिनी महालक्ष्मीची पुन्हा स्थापना झाल्याचा महत्त्वाचा उल्लेख सापडतो . संभाजीमहाराजांनी सिंहगडावर  छत्रपती राजाराममहाराजांच्या समाधीवर इ.स.१७३२ साली छत्री बांधली. २० डिसेंबर १७६० रोजी छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर जवळच्या टोप गावी मरण पावले. पंचगंगेच्या काठी त्यांचे अंत्यसंस्कार झाले. पन्हाळ्यावर जिजाबाईंनी त्यांची समाधी मंदिर बांधले.

लेखन – डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर, पुणे.

संदर्भ – करवीर रियासत, स.मा.गर्गे
मराठ्यांची धारातीर्थे – श्री.प्रवीण भोसले

Leave a Comment