महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,408

छत्रपती संभाजी महाराज यांना मोगली कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न झाले का ?

By Discover Maharashtra Views: 1919 9 Min Read

छत्रपती संभाजी महाराज यांना मोगली कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न झाले का ?

छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सरदार शेखनिजाम याने ३ फेब्रुवारी १६८९ रोजी अटक केली जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ विभम संवछरे शके १६१० माघ वद्य ७ शुक्रवासरी १ फेब्रुवारी संभाजीराजे व कविकलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेकनिजाम दौड करून येऊन उभयतांस जीवितच धरून नेले. वरकड लोक रायगडास गेले. “(छत्रपती संभाजी महाराज यांना मोगली कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न झाले का ?)

जेधे शकावलीतील नोंदीनुसार ” छत्रपती संभाजी महाराजांना मोगलानी कैद केल्यानंतर रायगडचा किल्लेदार चांगोजी काटकर व येसाजी कंक यांनी ९ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कैदेतून सुटका करून फाल्गुन शुद्ध तृतीयेला मंचकावर बसविले. छत्रपती राजाराम महाराजांनी संभाजी महाराजांच्या वेळी कैद केलेल्या लोकांची सुटका केली. मानाजी मोरे व इतर सरकारकून मंडळी कैदेत होती त्यांना कैदेतून मुक्त करण्यात आले व त्यांना त्यांचे अधिकार देवून राजाराम महाराज राज्य करू लागले. येसाजी व सिदोजी फर्झंद यांचा कडेलोट करून मारण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यापासून त्यांच्या सुटकेसाठी कोणतेही प्रयत्न आपणास मराठ्यांचा बाजूने झालेले दिसून येत नाहीत. संभाजी महाराजांना कैद झाली हि बातमी रायगडावर येताच नक्कीच सर्वजण गोंधळले असणार कारण हि बातमी अनपेक्षित होती. कवी कलशाचे मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांशी फारसे पटत नसले तरी कवी कलश हा तत्कालीन मराठा राजकारणातील व मंत्रिमंडळातील मुत्सदी तो देखील सोबत कैद झाला होता. सरनौबत मालोजी घोरपडे हे देखील यात मारले गेले. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या निर्णय क्षमतेवर विपरीत परिणाम झाला. औरंगजेबाकडे कोणताही वकील पाठवून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न देखील झाला नाही. मोगल सरदार शेखनिजाम याने संगमेश्वर ते बहादूरगड हे साधारण ३२० कि.मी. चे अंतर हे अवघ्या १२ दिवसात पार केले. १५ फेब्रुवारी रोजी औरंगजेबासमोर संभाजी महाराज व कवी कलश यांना आणण्यात आले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महराजांची निर्घुण हत्या करण्यात आली.

ज्योत्याजी केसरकर , आप्पाशास्त्री दीक्षित आणि बाळाजी विश्वनाथ यांनी संभाजी महाराजांना मोगली कैदेतून सोडवण्यासाठी मोगल सरदार शेखनिजाम याच्या सैन्यावर हल्ला केला असे सांगितले जाते . सदर लेखात याविषयीच्या नोंदी व त्यांची चिकित्सा

१ ) ज्योत्याजी केसरकर –

ज्योत्याजी केसरकर हे कोल्हापूर गावातील पाटील. संभाजी महाराजांना कैद करून घेऊन चालल्याची बातमी त्यांना हेरांमार्फत मिळाली . शिराळा पेटेत मोगली सैन्य येताच त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह मोगली सैन्यावर हल्ला चढवला. मोगली सैन्याशी लढत ते संभाजी महाराजांना कैद केले होते त्या सैन्याच्या तुकडीपाशी आले व त्यांनी संभाजी महाराजांना त्वरित निसटून जाण्याची विनंती केली. परंतु संभाजी महाराजांना असे पळून जाणे हा विचार आवडला नाही व त्यांनी “ मी शूर असून लढता लढता मरण पत्करेन परंतु जीवाच्या भयाने पळून जाणार नाही” असे सुनावले. संभाजी महाराज व ज्योत्याजी केसरकर यांच्यात संवाद चालू असतानाच एक मोगली तुकडी त्यांच्यावर चालून आली. नाईलाजाने ज्योत्याजी केसरकर यांना तेथून एकटेच निसटावे लागले.

सदर घटनेची चिकित्सा –

छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली त्यावेळी मराठा हेरखाते अकार्यक्षम दिसून येते. त्यामुळे ज्योत्याजी केसरकर यांना हेर खात्यामार्फत माहिती मिळाली असणे शक्य वाटत नाही. मोगल सरदार शेखनिजाम याच्या सोबत ३००० सैन्य होते त्यामुळे काही सहकाऱ्यांसहसोबत हल्ला करून संभाजी महाराजांच्या जवळ जावून बोलण्याइतका मोगली लष्करी वेढा ढिला असण्याची शक्यता नाही. संभाजी महाराज जर संधी मिळाली असती तर नक्कीच तेथून निसटले असते. आग्र्याच्या कैदेतून व दिलेरखानाच्या गोटातून देखील ते याआधी सुखरूप निसटले होते. त्यामुळे मी जीवाच्या भयाने पळून जाणार नाही वैगरे असे संभाषण संभाजी महाराज करणे शक्य वाटत नाही.

ज्योत्याजी केसरकर हे संभाजी महाराज्यांचे एकनिष्ठ व विश्वासू सेवक. राजाराम महाराज रायगडावरून जिंजीस गेले त्यावेळी त्यांनी रायगडाची जबाबदारी ज्योत्याजी केसरकर यांना दिली. रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर ज्योत्याजी केसरकर देखील शाहू महाराज व येसूबाई यांच्यासोबत मोगली कैदेत गेले. मोगली कैदेत शाहू महाराजांच्या लग्नासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मोगली कैदेत शाहू महाराजांची सेवा केली.

ज्योत्याजी केसरकर यांनी संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी काही प्रयत्न केला असता तर औरंगजेबाने त्यांना ठार केले असते. शाहू महाराजांना त्यांच्या सानिध्यात ठेवले नसते. त्यामुळे ज्योत्याजी केसरकर यांची छत्रपती घराण्याशी असलेली एकनिष्ठता यामुळे हि लोककथा जनमानसात तयार झाली असण्याची शक्यता आहे.

२ ) अप्पाशास्त्री दीक्षित –

शिराळे येथील आप्पाशास्त्री दिक्षित हे समर्थ रामदास स्वामींचे अनुयायी. समर्थांनी शिराळे येथे बांधलेल्या हनुमानाच्या मंदिराचे व स्वतः आप्पाशास्त्री दिक्षित यांनी बांधलेल्या तुळजाभवानी मंदिराचे व देवतांचे आप्पाशास्त्री भक्त . आप्पाशास्त्री हे वेद्शास्त्रसंपन्न पंडित त्यांनी बांधलेली वेदशाळा काळाच्या ओघात नष्ट झाली. त्यांनी बलोपासना करण्यासाठी बांधलेली व्यायामशाळा आज शिराळे येथे आहे.

मोगल सरदार शेखनिजाम शिराळा येथे रात्री मुक्कामी असल्याची खबर आप्पाशास्त्री दिक्षित यांना मिळाली त्यांनी त्यांच्या व्यायामशाळेतील व गावातील काही लढाऊ सहकाऱ्यांसह मोगली सैन्यावर हल्ला चढवला. परंतु त्यांना त्यात अपयश आले. मोगल सरदार शेखनिजाम याने सर्वाना कैद केले व त्यांचा शिरच्छेद केला.

छत्रपती राजराम महाराज यांनी आप्पाशास्त्री दिक्षित यांच्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांच्या वारासदाराना मौजे कणदूर येथे जमीन इनाम म्हणून दिली. भारत स्वतंत्र झाल्यानतर कुळकायदा लागू झाला त्यावेळी या जमिनीनवरचा दिक्षित घराण्यांचा हक्क संपुष्टात आला.

सदर घटनेची चिकित्सा –

सदर माहितीस कोणताही पुरावा नाही , मौखिक संदर्भ आहेत त्यामुळे ही घटना एका दंतकथे प्रमाणे वाटते. छत्रपती राजराम महाराजांनी आप्पाशास्त्री दिक्षित यांच्या वारसांना दिलेलि सनद त्यांच्या वारसदारांकडे उपलब्ध नाही . त्यामुळे दीक्षित घराण्याकडे असलेली जमीन ही छत्रपती राजराम महाराज यांनी दिली असे खात्रीपूर्वक विधान करता येत नाही.

३ ) बाळाजी विश्वनाथ –

मॅकेंझी संग्रहातील तेराव्या खंडात मराठयांच्या इतिहासासंबंधी काही पत्र असून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या १९३१ सालच्या त्रैमासिकांमध्ये ती प्रकाशित झाली आहेत. रामचंद्रपंत आमात्य यांनी लिहलेली पत्र १६९७ ला लिहली असावीत असे मजकुरावरून दिसते. एक पत्र जिंजीला असणारे छत्रपती राजाराम महाराज यांना लिहलेले आहे. त्यातील मजकूराचा सारांश पुढीलप्रमाणे ” छत्रपती संभाजी महाराज आपले पुत्र शाहू यांच्यासह शिकारीला गेले असताना कवी कलशाने कपट करून मोगलाना बोलावले. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे चिरंजीव शाहू यांना मुघलांनी कैद केल्यानंतर त्यांच्या सुटकेकरिता धनाजी जाधवांचे मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ यांना संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुटकेकरिता मुघलांच्या पाठलागावर पाठवून दिले” औरंगजेबाने कलशाला बक्षीस दिले.”

सदर घटनेची चिकित्सा –

सदर पत्रात तारीख कुठेही नमूद केलेली नाही. छत्रपती संभाजी महाराज यांना मोगल सैन्याने कैद केले त्यावेळी संभाजी महाराज शिकारीस गेले न्हवते तर शिर्के व कवी कलश यांच्यात झालेल्या भांडणामुळे कवी कलशाची बाजू घेऊन शिर्क्यांवर चालून गेले. त्यावेळी शाहू महाराज हे रायगडावर होते. कवी कलश हा देखील त्यावेळी कैद झाला व औरंगजेबाने त्याची देखील निर्घुण हत्या केली . कवी कलशास कोणतेही बक्षीस औरंगजेबाने दिल्याची नोंद नाही. संभाजी महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी रायगड जिंकला त्यावेळी शाहू महाराज महाराणी येसूबाई व इतर राजपरीवारासह मोगली कैदेत अडकले. त्यामुळे रामचंद्र आमत्यांसारखा व्यक्ती अशी विसंगत घटनेची नोंद करेल असे शक्य वाटत नाही. सदर पत्रातील व्यक्ती रामचंद्रपंत आमात्य असावेत कि अन्य कोणी ?

मोगली साधनातील नोंद –

मासिरे आलमगीरीतील नोंदीनुसार “ विजयी मुकरबखान हा ह्या ( मराठ्यांच्या ) मुलखातून बाहेर पडला. आलमगीर बादशहाच्या भाग्याने , त्या काफराच्या सहायकांपैकी आणि पाठीराख्यानपैकी कोणीही त्याच्यासाठी ( संभाजी महाराज )काही धडपड करू शकले नाही.

संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी काही प्रयत्न झाले असते तर तशी नोंद आपणास मोगल किंवा इतर परकीय संदर्भ साधनातून आढळली असती परंतु तशी नोंद दिसून येत नाही . मासिरे आलमगीरीतील नोंद स्पष्ट करते कि संभाजी महाराजांना मोगली कैदेतून सोडविण्यासाठी मराठा सैन्याकडून कोणतीही प्रयत्न झाले नाहीत.

मराठ्यांच्या छत्रपतीला मराठी मुलखातून कैद केले जावे व त्यांच्या सुटकेसाठी कोणतेही प्रयत्न होऊ नयेत हि एक दुर्दैवी घटना आहे . यासंबंधी अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ :- चिटणीस बखर, जेधे शकावली , मासिरे आलमगिरी ,
ज्योत्याजी केसरकर व आप्पाशास्त्री दिक्षित लोककथा साभार फेसबुक आणि व्हाट्सएप वरील लेखातून
( बाळाजी विश्वनाथ ) छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती :- केदार फाळके

Leave a Comment