पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज शिरोभूषण का घालत नव्हते?
बहुतेक ऐतिहासिक व्यक्तींच्या चित्रात त्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे शिरोभूषण जसे कि पगडी,जिरेटोप,पागोटे,फेटा,मंदिल,इ. घातलेलं आढळते. शिरोभूषण न घातलेली ऐतिहासिक व्यक्तिमत्वे अभावानेच आढळतात.पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज अशांपैकी एक होते.त्यांची बहुतेक चित्रे त्यांच्या मस्तकावर कुठलेही शिरोभूषण दाखवत नाहीत.याबाबत प्रख्यात इतिहास संशोधक कै.य.न.केळकर लिखित ‘ इतिहासातील टेहळणी ‘ ह्या पुस्तकात त्यांनी दोन आख्यायिका नमूद केल्या आहेत.
छत्रपती शाहू महाराजांना वन्य प्राण्यांच्या शिकारीचे बऱ्यापैकी व्यसन होते.असेच एक दिवस मनःस्थिती ठीक नसताना पण ते शिकारीला गेले.अकस्मात वाघाने त्यांच्यावर हल्ला केला पण महाराजांच्या खंड्या नावाच्या आवडत्या शिकारी कुत्र्याने वाघास मारून छ.शाहू महाराजांचा जीव वाचवला.तेव्हा महाराजांनी त्या कुत्र्यास पाच हजाराची जहागीर व पालखीचा मान दिला.या शिवाय आपल्या डोईचे पागोटे पण आवडत्या कुत्र्याच्या डोक्यावर बांधले.नंतर मनःस्थिती ठीक झाल्यावर आपण कुत्र्याला आपले पागोटे घातले याची त्यांना खंत वाटून त्यांनी यापुढे डोक्यावर काहीही शिरोभूषण घालायचे नाही,असा निश्चय करून तो आयुष्यभर पाळला.
दुसऱ्या आख्यायिके नुसार छ.शाहू महाराजांना भेटायला जानराव निंबाळकर खर्डेकर नावाची बडी असामी भेटण्यास आली होती.त्यावेळी महाराजांच्या हुजऱ्या ने ‘ मोगलाईतील सरदार जवाहीर,पोषाख घालून आले आहेत,जल्दी पागोटे घालून चलावे..’ असे महाराजांना सांगितले.तेव्हा महाराजांनी ‘ ते आमच्या भेटीस येणार आहेत कि पागोट्या च्या ? ‘असे विचारले व आपल्या खंड्या नावाच्या आवडत्या खंड्या शिकारी कुत्र्याच्या अंगावर भरजरी झूल,पोषाख,अलंकार खिजमतगारांकडून घालुन त्याला सजवले..आपण स्वतः मात्र फक्त विजार घालून व ताडपत्री पासोडी अंगावर ओढून खर्डेकरांची भेट घेतली.महाराजांच्या ह्या कृत्यामुळे सरदार खर्डेकर फारच खजील झाले.तेव्हा महाराजांनी त्यांची समजूत काढून भोजन,सन्मान वस्त्रे देऊन त्यांची रवानगी केली.
Prakash Lonkar