महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,08,193

गृहकलह करू नये :- छत्रपती शिवाजी महाराज

By Discover Maharashtra Views: 1380 15 Min Read

गृहकलह करू नये :- छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याचे उत्तराधिकारी संभाजी महाराज की राजराम महाराज, थोरले शाहू महाराज ( सातारा ) की महाराणी ताराबाई ( कोल्हापूर ). छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली . ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक संपन्न झाला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीतच स्वराज्याच्या वाटणीचा प्रस्ताव समोर आला . ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले राजकीय घडामोडी घडून आल्या व संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.(गृहकलह करू नये :- छत्रपती शिवाजी महाराज)

छत्रपती संभाजी महाराजांची ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने निर्घुण हत्या केली. स्वराज्याचे उत्तराधिकारी म्हणून ९ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराज यांनी संभाजी महाराज मोगली कैदेत असतानाच मंचकारोहण केले. छत्रपती राजाराम महाराज यांनी कधीच स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला नाही. २ मार्च १७०० रोजी राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. यावेळेस संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज हे मोगल कैदेत होते.

राजाराम महाराजांचे आणि महाराणी ताराबाई यांचे पुत्र शिवाजी महाराज यांनी १० मार्च १७०० रोजी मंचकारोहण केले. १७०१ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.राज्याभिषेकाची निश्चित तारीख उपलब्द नाही. राजाराम महाराज यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने स्वराज्याचा राज्यकारभार चालवण्यास सुरवात केली.

औरंगजेबाच्या मृत्यू पश्चात मोगल बादशहा आजीमशहा याने मे १७०७ रोजी मराठा साम्राज्यात फुट पाडण्यासाठी छत्रपती थोरले शाहू महाराज यांची मोगली कैदेतून मुक्तता केली. शाहू महाराजांच्या स्वराज्यात येण्याने महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात संघर्ष निर्माण झाला व त्याची फलश्रुती स्वाराज्याचे विभाजन होऊन कोल्हापूर व सातारा या दोन गाद्या निर्माण झाल्या .

सदर लेखात स्वराज्याचे उत्तराधिकारी कोण याची चिकित्सा संदर्भ साधनाच्या आधारे करण्याचा प्रयत्न

गृहकलह करू नये.

१ मार्च १६७८ रोजी शिवाजी महाराज यांनी आपले धाकटे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना लिहिलेल्या पत्राचा सारांश “ शहाजीराजे यांचा कैलासवास झाल्यानंतर शहाजीराजे यांनी स्व:पराक्रम करून संपादन केलेले राज्य व्यंकोजीराजे १३ वर्ष उपभोगत होते. सदर राज्यात थोरला पुत्र म्हणून वारसाहक्काने आपला देखील अर्धा वाटा आहे अशी मागणी शिवाजी महाराजानी केली. गृहकलह करू नये. आपला अर्धा वाटा आपणास द्यावा. परंतु व्यंकोजीराजे यांनी दुर्योधानासारखी दुष्ट बुद्धी मनी धरून शिवाजी महाराजाविरोधात युद्धास प्रवृत्त झाले.

व्यंकोजीराजे व शिवाजी महाराज यांच्यात युद्ध होऊन व्यंकोजीराजे यांचा पराभव झाला असता त्यांनी शरणागती पत्करली. शिवाजी महाराज आपले सरदार रघुनाथपंत व हंबीरराव यांना पत्राद्वारे लिहितात “ व्यंकोजीराजे आपले धाकटे बंधू आहेत. मुलबुद्धी केली. त्यास तोही आपला भाऊ त्यास रक्षणे. त्याचे राज्य बुडवू नका. “

छत्रपती शिवाजी महाराजांनी गृहकलह टाळावा यासाठी प्रयत्न केले वडिलांच्या मिळकतीत आपला अर्धा हिस्सा द्यावा अशी विनंती केली. व्यंकोजीराजे शरण येताच त्याचे रक्षण करत त्यांच्या राज्याचे देखील रक्षण केले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर गृहकलह करू नये हा मोलाचा सल्ला मात्र त्यांचे उत्तराधिकारी विसरले. वडिलांच्या मिळकतीत पुत्रांचा समान वाटा असतो हे बाब येथे स्पष्टपणे अधोरेखित होते.

१ ) संभाजी महाराज की राजाराम महाराज

गृहकलह :- शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले . संभाजी महाराज हे स्वराज्याचे उत्तराधिकारी युवराज झाले. राजाराम महाराजांच्या आई सोयराबाई या स्वराज्याच्या महाराणी झाल्या.

परमानंद काव्यातील नोंदिनुसार महाराणी सोयराबाई यांनी शिवाजी महाराजांच्याकडे संभाजीराजे यांच्याविषयी आपला राग व्यक्त केला संभाजीराजे समर्थ असून आपला मुलगा राजाराम मात्र दुर्बल आहे. तसेच संभाजी राजांपासून राजारामास धोका असल्याचे व शंभूराजे आपणास मान देत नसल्याची तक्रार केली. राज्यविभाजानाचा प्रस्ताव शिवाजी महाराजांसमोर ठेवला . छत्रपती संभाजीमहाराज आपल्या दानपत्रात लिहितात “ सावत्र आईच्या रागामुळे वडिलांनी मला वाईट वागणूक दिली तरी मी दशरथपुत्र रामाप्राणे वागलो.

स्वराज्याच्या विभागणीचा प्रस्ताव

१३ डिसेंबर १६७८ संभाजी महाराज रागवून व नाराज होऊन दिलेरखानास मिळाले. दिलेरखानाने स्वराज्यात लुट माजवली व रयतेस त्रास दिला त्यामुळे संभाजी महाराज व्यथित झाले . दिलेरखानाशी या बाबत मतभेद होऊन संभाजी महाराज दिलेरखानास सोडून स्वराज्यात आले. १३ जानेवारी १६८० रोजी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची पन्हाळ्यावर भेट झाली.

सभासद बखरीतील नोंदीनुसार “ हे वर्तमान राजीयास ( शिवाजी महाराज ) पुरंधरास कळताच संतोष पावून पुत्राच्या भेटीस पन्हाळ्यास आले. मग पितापुत्राची भेट झाली. बहुत रहस्य जाहले. त्या उपरी राजे म्हणू लागले कि लेकरा मला सोडून जाऊ नको. औरंगजेबाचा आपला दावा. तुजला दगा करावयाचा होता. परंतु श्रीने कृपा करून सोडून आणिला. थोर कार्य झाले. आता तू जेष्ठ पुत्र थोर झालास आणि सचंतर राज्य कर्तव्य हे तुझ्या चित्ती आहे असे आपणास कळले. तर मजला हे अगत्य आहे. तरी तुजलाही राज्य एक देतो. आपले पुत्र दोघेजण एक तू संभाजी व दुसरा राजाराम. येसियास हे सर्व राज्य आहे., यास दोन विभाग करतो एक चांदीचे राज्य, याची हद्द तुंगभद्रा तहद कावेरी हे ऐक राज्य आहे. दुसरे तुंगभद्रा अलीकडे गोदावरी नदीपर्यंत एक राज्य आहे. ऐसी दोन राज्य आहेत. त्यास तू वडील पुत्र , तुजला कर्नाटकीचे राज्य दिधले. इकडील राज्य राजारामास देतो. तुम्ही दोघे पुत्र दोन राज्य करणे. आपण श्रींचे स्मरण करून उत्तर सार्थ करीत बसतो . असे बोलिले तेव्हा संभाजी राजे बोलिले कि “ आपणास साहेबांचे पायाची जोड आहे. आपण दुधभात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहीन ”. असे उत्तर दिधले. आणि राजे संतुष्ट झाले.

“ आपण रायगडास जातो . धाकटा पुत्र राजराम याचे लग्न करून येतो . मग राज्यकारभाराचा विचार कर्तव्य तो करू असे बोलून रायगडास गेले. संभाजी महाराजांच्या या भेटीनंतर अवघ्या अडीच महिन्यात छत्रपती शिवरायांचे निधन स्वराज्याची राजधानी रायगड येथे शनिवार ३ एप्रिल १६८० रोजी झाले. स्वराज्याचा उत्तराधिकारी हा प्रश्न अनुत्तरित राहिला

रायगडावरील राजकारण

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावर छत्रपती राजाराम महाराज यांना स्वराज्याचे भावी छत्रपती घोषित करण्यात आले. जेधे शकावलीतील नोंदीनुसार अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर “ वैशाख शुद्ध ३ तृतीयेस राजारामास अनाजीपंत सुरनीस यांनी मंचकी बसविले.”

संभाजी महाराज यावेळी पन्हाळगडावर होते . संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी अण्णाजी दत्तो व पंतप्रधान मोरोपंत पेशवे पन्हाळ्यास रवाना झाले. परंतु स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या मदतीने संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांना कैद केले . “जेधे शकावलीनुसार संभाजीराजे रायगडास आले राज्य करू लागले. राजाराम कैदेत ठेवले.

छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या मंत्र्यांमध्ये कोणाला राजा करावे याबद्दल मतभेद होते . त्यामुळे स्वराज्यात दोन गट पडले गेले. इंग्रज त्यांच्या पत्रात लिहितात “ शिवाजीच्या प्रधानांमध्ये कोणाला राजा करावे याबद्दल मतभेद होता. अण्णाजी पंडित मुख्य प्रधान धाकट्याच्या बाजूचा होता. तर मोरो पंडित जेष्ठ पुत्र संभाजी यांचा पुरस्कृत करीत होता.पुढे संभाजीच महाराजा झाला .”

स्वराज्यात दोन गट निर्माण झाले. स्वराज्याच्या गादीसाठी संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्यात राजकीय स्पर्धा निर्माण झाली.

छत्रपती संभाजी महाराजांची ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने निर्घुण हत्या केली. स्वराज्याचे उत्तराधिकारी म्हणून ९ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराज यांनी संभाजी महाराज मोगली कैदेत असतानाच मंचकारोहण केले. छत्रपती राजाराम महाराज यांनी कधीच स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला नाही. राजाराम महाराज रायगडावरून निसटले व जिंजीस गेले व स्वराज रक्षणाचा लढा चालू ठेवून स्वराज्याच्या आशा पल्लवित ठेवल्या . २ मार्च १७०० रोजी राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. राजाराम महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी प्रखर लढा देत स्वराज्याचा लढा चालू ठेवला. महाराणी ताराबाई यांनी आपले पुत्र शिवाजी यांना राज्याभिषेक करून स्वराज्याच्या कारभारास सुरवात केली.

स्वराज्यात मोगली आक्रमण

संभाजी महाराजांच्या निधानानंतर बऱ्याच प्रमाणात स्वराज्य संपुष्टात आले होते . स्वराज्याची राजधानी रायगड मोगलांनी जिंकली. भावी छत्रपती शाहू महाराज व राजपरीवार मोगली कैदेत गेला. औरंगजेब स्वराज्याचा घास गिळण्यासाठी महाराष्ट्रात तळ ठोकून बसला. स्वराज्यात सर्वत्र मोगली आक्रमण थैमान चालू होते. त्याविषयीच्या काही नोदी आढळून येतात.

जेधे शकावली :- रायगड मोगलास दिल्हा. संभाजीराजे याचे पुत्र शिवाजीराजे यास तुलापुरास औरंगजेब यासी नेले . पातशाहे त्यास हप्त हजारी केले शाहू राजे नाव ठेविले ते वर्षी कुल गड मोगले घेतले.

रामचंद्र अमात्य लिहितात “ युद्ध प्रसंगामुळे राज्याचा असा विज्वर प्रसंग होऊन गेला. संपूर्ण देशदुर्ग पादाक्रांत जाहले. राज्य असे नाव मात्र सावशेष उरले व तेहि निर्मर्याद

वाई परगण्यातील सुभेदारांच्या कारकीर्दीच्या नोंदी :- १६८९ रोजी संपूर्ण वाई प्रांत व गडकोट यावर मोगलांचा कब्जा झाला. राज्य बुडाले.

राजश्री राजाराम कर्नाटकात जावून प्रकट होऊन लष्कर जमाव केला व या प्रांती राजश्री रामचंद्रपंडित व शंकराजी पंडित सरकारकून व संताजी घोरपडे सेनापती व धनाजी जाधवराव यांनी लष्कर जमाव करून चाळीस हजार शाई मिळवली मुलुख सोडविला नवेच राज्य पैदा केले.

२ ) थोरले शाहू महाराज ( सातारा ) की महाराणी ताराबाई ( कोल्हापूर )

महाराणी ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी व संभाजी यांची मुंज करून शिवाजीस राज्याभिषेक करण्याची तयारी केली. रामचंद्र अमात्य यांचा विरोध होता. शाहू महाराज मोगली कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांचा राज्याभिषेक व ताराबाई यांच्या पुत्रास युवराजपद द्यावे असे त्यांनी मत मांडले . सदर घटनेत शाहू महाराज मोगली कैदेतून सुटून येतील किंवा नाही याविषयी कोणतीची खात्री न्हवती व स्वराज्याच्या गादिस नवीन राज्याची गरज होती. स्वराज्याच्या गादिवर आपला हक्क आहे असे ताराबाई मानीत होत्या. ताराबाईनी रामचंद्र अमात्य यांची समजूत काढून इ.स. १७०१ आपला पुत्र शिवाजी याचा राज्याभिषेक घडवून आणला. महाराणी ताराबाई आपला पुत्र शिवाजी यांच्या नावाने स्वराज्याच्या राज्यकारभार पाहू लागल्या

औरंगजेबाच्या मृत्युनंतर मे १७०७ रोजी मोगली मांडलिकत्व स्वीकारून शाहू महाराज मोगली कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले. चिटणीस बखरीतील नोंदीनुसार शाहू महाराजांनी ताराबाई , चिटणीस, अमात्य रामचंद्र यांना पत्र पाठवून निरोप दिला “ आम्ही पादशहापासून निघोन मुक्कामास येवून पावलो. लौकरच येतो. “ ताराबाईना सदर माहिती मिळताच सदर शाहू तोतया असल्याचे जाहीर केले. शाहुस ठार करावे अशी इच्छा धरली. संभाजीराजे यांनी राज्य व खजिना गमावला राजराम महाराजांनी श्रम करून राज्य सोडविले. त्यामुळे ताराबाई यांनी राज्यावर स्वतःचा हक्क प्रस्थापित केला.

महाराणी ताराबाई १७ सप्टेंबर १७०७ रोजी सैतवडे येथील सोमनाईक देसाई व देशकुलकर्णी यांना लिहिलेल्या पत्रात लिहितात “ शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयासाने स्थापन केलेले राज्याचा संभाजीराजे यांनी विध्वंस केला त्यानंतर राजाराम महाराज यांनी स्व:पराक्रमे नवीन राज्य निर्माण केले. ताराबाई यांनी त्याचे संरक्षण करून मोगलांचा पराभव केला व राज्य वाढविले. दुसरी गोष्ट अशी कि हे राज्य शिवाजी महाराजांनी राजाराम महाराजांना देवू केले होते. त्यामुळे शाहू महाराजांचा या राज्याशी कोणताही संबंध नाही.

छत्रपती शाहू महाराजांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेख करून घेतला व चार दिवसांनी १६ जानेवारी रोजी एक तहनामा जाहीर केला त्यानुसार वारणा नदीच्या दक्षिणेला असलेला प्रदेश शिवाजीराजे यांच्याकडे असावा . शिवाजीराजे यांनी शाहू महाराजांचे छत्रपती पद मान्य करून त्यांचे मांडलिक म्हणून राहावे . वारणेच्या उत्तरेला फौजा पाठवू नयेत. आपल्या स्वतःच्या राज्यात स्वतंत्र राज्यकारभार करावा. परंतु ताराबाई यांनी हा तहनामा मान्य केला नाही .

मोगलांचे मांडलिकत्व

मोगल इतिहासकार खाफीखान लिहितो शाहू महाराजांच्या वकिलाने जुल्फिकार बहादूर याच्या मार्फत बादशाह बहादूरशहा याला विनंती केली “ दक्षिणेच्या सहा सुभ्यांची चौथाई व सरदेशमुखी यांचे फर्मान मिळावे म्हणजे बेचिराख झालेला मुलुख पुन्हा आबाद करू.

ताराबाई यांनी जुम्लतुल्मूल्काच्या याच्या मार्फत बादशाह बहादूरशहा याला विनंती केली “ आपल्या मुलाला शेकडा नऊ रुपयाबाबत सरदेशमुखीचा फर्मान मिळावे . आपण चौथाईचा प्रश्न काढत नाही. दक्षिणेत धामधूम करणाऱ्यांचा पाडाव करून मुलखाचाही बंदोबस्त करू.

शाहूचे हितचिंतक जुल्फिकार बहादूर व ताराबाईचे हितचिंतक जुम्लतुल्मूल्क यांच्या आपसातील मतभेदांमुळे सरदेशमुखीचे फर्मान निघण्याचे तहकूब झाले.

सदर प्रकरणात वजीर मुनीमखान याने बादशहास सल्ला दिला “ तूर्त कोणाशी सनद न देता शाहू व ताराबाई यांनी आपसात लढून निर्णय लावावा. यात जो पक्ष विजयी होईल त्यास सनद देण्यात येईल. बादशहास हा सल्ला योग्य वाटला व त्याने शाहू व ताराबाई यांना तश्या सूचना दिल्या व दिल्लीस प्रयान केले.

मोगल बादशाह बहादूरशहा याची मानसिकता मराठ्यांच्या आपसातील कलहाचा फायदा घेत मराठ्यांमध्ये यादवी युद्ध निर्माण करण्याची होती ती फलद्रूप झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यासाठी लढणारे आता मोगलांचे मांडलिक बनण्यासाठी आपसात लढू लागले.

करवीर रियासतकार स. मा गर्गे लिहीतात “ शाहूमहाराज व ताराबाई यांच्यामध्ये सत्तास्पर्धेचे आणि डावपेचाचे राजकारण चालू होते व त्यात कधी या पक्षाला तर कधी त्या पक्षाला विजय मिळत होता. हे विजय आणि पराजय तात्पुरत्या स्वरुपाचे असत. त्यांना निर्णायक स्वरूप येऊ शकले नाही.

रियासतकार देसाई लिहितात “ सारांश , ताराबाई व शाहू यांचा तंटा भाऊबंद्कीचा असून , दोघेही मराठेशाहीच्या गादीकरता भांडत होती. राज्याच्या दुर्दैवाने त्यांस हा कलह आपसात मिटवून राष्ट्राचे कल्याण करण्याची बुद्धी झाली नाही. ती झाली असती तर, म्हणजे मराठ्यांनी आपली प्रचंड शक्ती आपसात लढून फुकट घालविली, तिचा उपयोग त्यांनी अन्यत्र केला असता , तर प्रत्यक्ष दिल्लीपतीचा पाडाव करून हिंदुस्थानचे सार्वभौमपद त्यांस अल्पायासाने प्राप्त झाले असते. पण परिस्थीतीचा योग्य फायदा करून घेणाऱ्या शिवाजीप्रमाणे कल्पक व सर्वांवर छाप बसवून राज्याचे काम करून घेणारा वजनदार पुरुष यावेळी मराठाशाहीत निपजला नाही , तेणेकरून औरंगजेबाचा मतलब सिद्धीस गेला. वास्तविक औरंगजेबाच्या मृत्यूने मोठीच संधी मराठ्यांस आली होती. पंचवीस वर्ष लढाईचा व मुत्सदेगीरीचा चांगला अनुभव मिळून लोक तयार झाले होते. बादशहावर विजय संपादून त्यांचा प्रत्यक्ष हुरूप वाढलेला होता. बादशाहितील गादीच्या तंट्याचा फायदा घेऊन सर्व हिंदुस्थानभर आपले राज्य वाढविण्याची योग्य संधी मराठ्यांस त्यावेळी आली होती. आणि सर्व मराठी फौजा जोराने बाहेर पडल्या तर दिल्लीपद काबीज करण्यास त्यांस अवकाश लागला नसता.

महाराणी ताराबाई व राजसबाई यांच्यातील गुह्युद्ध

“ कालपरत्वे आमचा प्रसंग विस्कळीत होऊन चिरंजीव राजश्री संभाजीराजे व राजसबाई यांनी गिरजोजी जाधव , अंताजी त्रीमल व लोकखासकेल गडकरी व तुळाजी यांसी पुढे करून किल्ले पन्हाळा येथे चिरंजीव राजश्री संभाजी राजे यांसी राजपदास बैसविले आम्हास संकटी घातले. बहुत निकड केली. “

इ.स. सेप्टेम्बर १७१४ च्या दरम्यान पन्हाळ्यावर नाट्यमय राजकारण घडून महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र शिवाजी कैद झाले. राजराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई यांचे पुत्र संभाजी कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले.

छत्रपतींच्या घरात राज्याच्या गादीसाठी व सत्तेसाठी गृहकलह निर्माण झाल्याने स्वराज्याची हानी झाली.

लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ : सभासद बखर , परमानंदकाव्य , जेधे शकावली , शिवकालीन पत्रसारसंग्रह , चिटणीस बखर , ऐतिहासिक पत्रबोध , करवीर रियासत , मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध , आज्ञापत्र , मराठी रियासत ,मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ , २०

Leave a Comment