छत्रपती शिवाजी महाराज्यांचा दूसरा राज्याभिषेक –
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला . शिवाजी महाराजांच्या काळात शाक्तपंथाचा म्हणजे तंत्रमार्गाचा प्रभाव आढळून येतो . निश्चलपुरी नावाचा एक तांत्रिक ब्राम्हण महाराजांच्या राज्याभिषेकावेळी रायगडावर उपस्थित होता. निश्चलपुरीने महाराजांना राज्याभिषेकावेळी अपघाती घडलेले अपशकुन व उणिवा निदर्शनास आणून दिल्या त्यामुळे त्याच्या सांगण्यानुसर महाराजांनी २३ सप्टेंबर १६७४ रोजी तांत्रिक पद्धतीने दूसरा राज्याभिषेक करवून घेतला. परंतु अवघ्या काही महिन्यातच महाराजांनी दूसरा राज्याभिषेक करवून घेतला त्यामागची कारणे , तत्कालीन परिस्थिति व दुसर्या राज्याभिषेखाचे विधी या विषयीची माहिती आपणास “ श्रीशिवराज्याभीशेख कल्पतरू “या पोथीत मिळते.
बंगाल एशियाटिक सोसायटी , कलकत्ता येथील संग्रहालयात या ग्रंथाची हस्तलिखित पोथी असून तिचा क्रमांक G १०१८५ आहे. या पोथीत १३ पाने असून आठ शाखा आहेत . या पोथीत २३५ पूर्ण व ३ अर्धवट श्लोक आहेत. या पोथीतील पहिली सात पाने एका ग्रंथकर्त्याने तर इतर पाने दुसर्या ग्रंथकर्त्याने तर समासातील श्लोक तीसर्या ग्रंथकर्त्याने लिहिलेले आहेत. समासात कोणकोणत्या देवतांचे पूजन आणि बलिदान करायचे याची यादी दिलेले आहे. यवन हिंदू धर्माचा नाश कसे करत होते हे समासात सविस्तर लिहिले गेले आहे. पोथी लिहिणारे ग्रंथकर्ते हे शिवकालीन असल्याने या पोथीचे लेखन हे शिवकाळात झालेले आहे.
निश्चलपुरी हा वाराणसी क्षेत्रातून दक्षिणेस आला . प्रथम तो नाशिक येथे आला. त्याने काही साक्षात्कार करून शिष्य जमा केले. जापक मांत्रिकांना राज्याभिषेखावेळी डावलण्यात आल्याने हा एक गट नाराज होता . या नाराज गटाचा पुरस्कर्ता निश्चलपुरी हा होता.
श्रीशिवराज्याभीषेख कल्पतरूच्या पहिल्या शाखेत निश्चलपुरीच्या वेगवेगळ्या तीर्थस्थळाच्या तीर्थाटनाचे वर्णन आले आहे. निश्चलपुरी महाराजांना शिवांचा अवतार संबोधतो. दुसर्या , तिसर्या आणि चौथ्या शाखेत गागाभट्टाने केलेल्या राज्याभिषेकाचे वर्णन व राज्याभिषेकातिल दोषांचे वर्णन , घडलेले अपशकुन व निश्चलपुरीचा झालेला अपमान याचे वर्णन आले आहे. पाचव्या शाखेत निश्चलपुरीने केलेले भविष्यकथन व घडलेल्या अनिष्ट घटना याचे वर्णन आले आहे. सहाव्या व सातव्या शाखेत निश्चलपुरीने केलेल्या राज्याभिषेखाचे वर्णन आले आहे. आठव्या शाखेत राजसभेचे वर्णन आले आहे. शिवाजी महाराजांच्या दोन्ही वैदिक व तांत्रिक राज्याभिषेखांचे वर्णन सदर ग्रंथात आले आहे.
निश्चलपुरी म्हणतो गागाभट्ट यांच्या रायगड आगमनापासुन रायगडावर अशुभ घटना घटू लागल्या . सरनौबत प्रतापराव गुजर नेसरीला युद्धात मारले गेले . महाराजांची पत्नी कशिबाई ह्याचे निधन झाले. महाराजांना गायत्र्यूपदेश झाला त्याच्या आधीच्या दिवशी आकाक्षातून उल्कावृष्टी झाली परंतू काही अशुभ घडू नये म्हणून त्याने हनुमंत मंत्राच्या साह्याने तिचे निवारण करून अशुभ टाळले. निश्चलपुरीच्या म्हणण्यानुसार गायत्र्यूपदेश अशुभ मुहूर्तावर झाला. परंतु निश्चलपुरी शिवाजी महाराजांनी केळंजा घेतला , संपगावच्या पेठेची लूट , हंबीररावाणी मिळवलेला विजय हे महाराजांच्या पुण्याईच्या प्रभावामुळे झाले आहेत असे सांगतो. थोडक्यात छोट्या छोट्या अनिष्ट घटनांचे खापर हे निश्चलपुरीने गागाभट्ट यांच्यावर फोडले आहे. तर चांगल्या इष्ट घटनांचे श्रेय मात्र गागाभट्ट यांना न देता शिवाजी महाराजांच्या पुण्याईला दिले आहे .
शिवाजी महाराजांच्या वैदीक राज्याभिशेखावेळी शिवाजी महाराजांचा विवाह हा पूर्वीच्याच स्त्रियांशी विधिपूर्वक झाला. शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली व दानधर्म झाला . परंतु गागाभट्टाने निश्चलपुरीचा अपमान केला निश्चलपुरी हा नमस्कार योग्य नाही असे महाराजांस संगितले. दानधर्मा मध्ये गागाभट्टाने निश्चलपुरीच्या ब्राम्हणाना डावलले व स्वत:च्या मर्जीतील ब्राम्हणांची वर्णी लावली. सुवर्णतुलेनंतर अपघात होऊन गागाभट्टाच्या नाकाला लाकूड लागले व महाराजांचे कुलोपाध्ये बाळंभट्ट यांच्या मस्तकावर स्तंभावरील लाकडी कमळ पडून अपघात झाला. त्यानंतर महाराजांचा अभिषेक झाला परंतु गडावरील शिरकाई देवी , कोकणचे अधीष्ठित देव परशुराम , हनुमान व वेताळ या स्थानिक देवतांचे पूजन करण्यात आले नाही. तांत्रिक पद्धतीने सिहासानाला आधार दिला गेला नाही. सिंहासनास बळी देण्यात आला नाही. गडाच्या संरक्षक देवतांचे पूजन करण्यात आले नाही. भूतपिछाश यांना बळी देण्यात आला नाही. गागाभट्टाच्या या चुकांमुळे अपशकुन झाले. संभाजी महाराजांच्या मस्तकावरून दोन मोती ओघळले. महाराजांची कट्यार म्यानबद्ध न्हवती परंतु वेळीच लक्ष गेल्याने अनर्थ टळला. महाराज रथारूढ होताना रथाचा कना ( आस ) वाकला . नंतर राजे गजारूढ झाले. धंनुष्याची प्रतंच्या ओढताना बोटातील आंगठी गळून पडली. निश्चलपुरीने राज्याभिशेखानंतर शिवाजी महाराजाची भेट घेऊन या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांस सांगितले. व पुढेही काही दिवसात तेराव्या, बाविसाव्या, पंचावनव्या , पासठाव्या दिवशी अशुभ घटना घडतील असे भाकीत केले. निश्चलपुरीचे हे भविष्यकथन ऐकून शिवाजी महाराज विस्मित झाले. निश्चलपुरीच्या भाकीतानुसार बाराव्या दिवशी राजमाता जिजाऊ यांचे महानिर्वाण झाले. प्रतापगडावरील घोड्यांची पागा जळाली. हत्ती व अश्व यात मारले गेले.
गागाभट्टाणी केलेल्या या वैदिक राज्याभिषेखात निश्चलपुरी व त्याच्या शिष्यांच्या पदरी कोणतेही दान तसेच सन्मानजन वागणूक मिळाली नाही. त्यामुळे निश्चलपुरी नाराज होता. निश्चलपुरीने महाराजांच्या या दु:खद परिस्थितिचा लाभ घेतला व महाराजांच्या सांगण्यावरून पुन्हा तांत्रिक विधीने महाराजांना राज्याभिषेक करण्याचे मान्य केले. त्यानुसार त्याने सुमुहूर्त पाहून काही जपकर्त्या ब्राम्हणानद्वारे जप करण्यास सुरवात केली. व पंधरा दिवसात शत्रू हस्तगत होईल असे भाकीत केले त्याप्रमाणे तुकोराम नावाचा प्रभानवल्लीचा सुभेदार हा महाराज्यांशी बेअदबी करत होता तो सापडला. त्यामुळे महाराजांचा त्याच्यावर विश्वास बसला व दुसरा तांत्रिक राज्याभिषेकास व मंत्रोपदेशास समंती दिली. निश्चलपुरीकडून महाराजांनी अभिषेक करवून घ्यावा मंत्रोपदेश घेऊ नये हा मंत्र्यांनी दिलेला सल्ला महाराजांनी नाकारला. निश्चलपुरीने अक्षरमंत्राचा उपदेश केला त्यास त्याने विद्या असे म्हटले आहे.
आनंदनाम संवत्सराच्या आश्विन शुद्ध पंचमीला बुधवार २३ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरीने कलशस्थापना केली. मेरूयंत्र धारण करून निश्चलपुरीने राज्यारोहण समारंभ केला. सिंहासनाजवळील भूमी मंत्राने शुद्ध करण्यात आली. महाराज खड्ग धारण करून सिंहासनाजवळ आले. दरवाज्याजवळील देवतांना बळी देण्यात आल्यानंतर सहस्त्रभोजन झाले. सिंहासनाच्या आठ सिंहाना बळी देण्यात आले. आठ सिंहाच्या पाठीवर सिंहासन असल्याने सिंहासनावर यंत्रस्थापना करून सिंहासनाला बळी देण्यात आला. एका रत्नखचित आसनावर रौप्य आसन ठेऊन त्यावर महाराजांना बसवून अभीषेक विधीस सुरवात करण्यात आली. कलशामध्ये पाच पानांचे तुरे ठेऊन त्यास लाल रेशीम वस्त्राने गुंडाळले . धूप व दिवे लावण्यात आले. सामवेद गायन सुरु असताना महाराज्यांवर अभिषेकाच्या धारा चालू होत्या. अभिषेकानंतर महाराजांनी नवी वस्त्रे परिधान केली. रायगडास अन्नाचा नैवद्य दिला गेला. सुहासिणींनी महाराजांना ओवाळले त्यानंतर महाराजांनी भोजन केले. वैदिक व तांत्रिकाणी मंत्रांचा जाप करत आशीर्वाद दिले. त्यांनातर निश्चलपुरीने महाराजांना सिंहासनारोहण करण्यास संगितले व त्यांच्यावर रत्नजडीत छत्र धरले गेले. अश्याप्रकारे शिवछत्रपतींचा दूसरा राज्याभिषेक संपन्न झाला.
महाराजांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेख कुंभ लग्नावर आयुष्यमान योग असताना , अनुराधा नक्षत्र व बुधवार असताना ( अमृतसिद्धी योग ) आनंद नाम संवस्तर शके १५९६ या दिवशी झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेख २३ सप्टेंबर १६७४ रोजी तांत्रिक पद्धतीने झाल्यानंतर राज्याभिषेखाच्या दुसऱ्याच दिवशी रोजी प्रतापगडावरील देवीच्या मंदिरावर वीज पडून ते दुभंगले . हनुमंत मंत्राच्या साह्याने आकाक्षातून होणारी उल्कावृष्टी निवारनारा निश्चलपुरी ह्यावेळी मात्र कोणताच मांत्रिक चमत्कार दाखवून हा अपशकून टाळू शकला नाही.
संदर्भ :- मराठ्यांच्या इतिहासाची साधने :- डॉ. सदाशिव शिवदे
ऐतिहासिक संकीर्ण निबंध खंड ६
शककर्ते शिवराय :- विजयराव देशमुख , छत्रपती शिवाजी महाराज :- वा.सि.बेंद्रे
छायाचित्र साभार गुगल.
श्री. नागेश सावंत