महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,14,964

छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या माणसांचे आदरातिथ्य करून त्यांना कॉफी दिली !

By Discover Maharashtra Views: 1406 4 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या माणसांचे आदरातिथ्य करून त्यांना कॉफी दिली !

एका डच माणसाचा वृत्तांत –

शीर्षक वाचून दचकला असाल ना ! हो तसा दचकण्या सारखाच उल्लेख आहे हा, परंतु हा वृत्तांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हैदराबाद मध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या आणि शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेल्या एका अनामिक डच माणसाने लिहून ठेवला आहे, त्यामुळे तो खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या डच माणसाने पुढे, शिवाजी महाराज आणि कुतुबशाहाची भेट झाली तेव्हा एका खिडकीतून ,” मी ही भेट पाहिली” असे देखील लिहून ठेवले आहे आणि त्या भेटीत काय घडले याचेही वर्णन तो करतो.छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या माणसांचे आदरातिथ्य करून त्यांना कॉफी दिली !

कॉफी बद्दलचा वृत्तांत पुढील प्रमाणे आहे,

छत्रपती शिवाजी महाराज हैदराबाद शहराच्या वेशीवर असताना, हैदराबादेत उपस्थित असलेला आपला अनामिक डच माणूस लिहितो,

“ गोलकोंड्याच्या राजाला भेटण्याची संधी मला अनेकदा मिळाली. १६७६ साली प्रसिद्ध शिवाजी राजा १२००० पायदळ आणि २४००० घोडदळ घेऊन आला आणि हैदराबाद पासून ३ लीगच्या अंतरावर (सुमारे १५ किलोमीटर ) येऊन थांबला आणि त्याने, “भरपूर खंडणी दिली नाहीत तर आम्ही तुमचं शहर जाळून राख करून टाकू” अशी धमकी त्याने गोलकोंड्याच्या राजाला दिली . शिवाजी राजाने दिलेल्या या धमकी मुळे हैदराबाद शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले . आम्ही देखील आमची वखार (डच ईस्ट इंडिया कंपनीची वखार ) , तिच्यात असलेला मौल्यवान माल आणि आमच्या जीवाचे आता कसे होणार या भीतीने थरथर कापू लागलो .

शिवाजी राजाच्या रूपाने आमच्यावर कोणतीही आपत्ती कोसळू नये म्हणून हेर हार्टसिन्क यांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे यान व्हान न्येनदाल यांनी शिवाजी राजाच्या छावणीत जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याने आमच्यावर हल्ला करू नये म्हणून, ऍबिगेलने ज्याप्रमाणे राजा डिव्हेडला भेटवस्तू दिल्या होत्या (बायबल मधली एक कथा) , त्याचप्रमाणे आम्ही त्याला १००० फ्लोरिन किमतीचे बदाम, खजूर, द्राक्षं आणि पिस्ते भेट म्हणून दिले. आमच्या भेटीसाठी उभारलेल्या खास तंबूमध्ये त्याने आम्ही दिलेल्या भेटवस्तू मोठ्या नम्रतेने स्विकारल्या. या प्रसंगी आमच्या माणसांना त्याने कॉफी दिली , त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घातले , त्यांना मानाची वस्त्रे दिली आणि त्यांनी निर्भयपणे वखारीकडे जावे आणि निश्चिन्त असावे, आमच्याकडून तुम्हाला किंवा तुमच्या वखारीला कोणताही उपद्रव होणार नाही असे त्यांना सांगितले.”

या डच माणसाने हा वृत्तांत , ही घटना घडून गेल्यानंतर १० वर्षांनी लिहिला आहे त्यामुळे त्याची ही आठवण कितपत अचूक असेल हे आज सांगता येणे कठीण आहे, परंतु तरी देखील या प्रसंगात शिवाजी महाराजांकडून डचांना कॉफी देण्यात आली हा उल्लेख निश्चितपणे अप्रूप निर्माण करणारा आहे ! त्याकाळी कॉफी हा पदार्थ अस्तित्वात होता या बद्दल काही शंका नाही, कारण कॉफीचा उल्लेख ‘कहावा’ या नावाने मआसिर ए आलमगिरी मध्ये आला आहे. (पहा- मआसिर ए आलमगिरी, इंग्रजी भाषांतर, जदुनाथ सरकार, पृ. १७७)

हा प्रसंग English Records on Shivaji या पुस्तकात पृ. ३४९ वर दिला आहे. मूळ उल्लेख रॉबर्ट ऑर्म याच्या हस्तलिखितात खंड २६८, पृ. १-११ वर आहे. रॉबर्ट ऑर्म याची हस्तलिखिते ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे असल्याचे समजते. (https://discovery.nationalarchives.gov.uk/details/r/9fb04bbe-15d8-4966-a171-ef4db9875dfa)

श्री संकेत कुलकर्णी Sanket Kulkarni यांनी शोध घेतला तर मूळ हस्तलिखित मिळू शकेल

लेखन सीमा

संदर्भ:-

१) English Records on Shivaji.
२) Shivaji : His Life and Times, Gajanan Bhaskar Mehendale.

चित्रें:-

१) छत्रपती शिवाजी महाराजांचे डच माणसाने काढलेले चित्र.
२) English Records on Shivaji मधला कॉफीचा उल्लेख.

 

लेखक – सत्येन सुभाष वेलणकर, पुणे.

Leave a Comment