महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,26,250

छत्रपती शिवरायांची युद्धनीती!

By Discover Maharashtra Views: 9089 5 Min Read

छत्रपती शिवरायांची युद्धनीती!

अर्थातच शिवछत्रपतींच्या काळातील लढली गेलेली युद्धे!

पुस्तक लेखमाला क्रमांक -१८.

छत्रपती शिवरायांची युद्धनीती म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ती स्वराज्य स्थापनेसाठी लढली गेलेली युद्धे! छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा या तंत्राद्वारे लढलेली युद्धे!

आदिलशाही काळात छत्रपतींचा जन्म झाला आणि या मऱ्हाटी मातीला गुलामीच्या जोखडातून स्वतंत्र होण्याचे जणू स्वप्नच पडले. हे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आणि या मातीला स्वतःचे राज्य अर्थातच स्वराज्य स्थापन करण्याचे निर्णायक श्रेय हे छत्रपती शिवरायांना जाते.३५० वर्षे गुलामगिरी च्या अधिपत्याखाली असलेल्या या भूमीला स्वतंत्र करण्यासाठी शिवरायांना त्यांच्या उभ्या आयुष्यात अनेक युद्धांना सामोरे जावयास लागले. त्याच युद्धनीती चा हा लेख प्रपंच !!

सह्याद्रीच्या एका दुर्गम अश्या  शिखरावर वसलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात श्रीशंभुसमोर ,शिवप्रभूंनी आणि त्यांच्या सोबत्यांनी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली आणि या ऐतिहासिक कार्याचा आरंभ झाला.त्यांनतर त्यांनी दुर्लक्षित अश्या किल्ले तोरणा वर अतिशय चातुर्याने स्वराज्याचा भगवा फडकविला. तिथे मिळालेल्या धनाच्या साहाय्याने मग त्यांनी समोरच असलेल्या मुरुंबदेवाचा डोंगर न्याहाळून स्वराज्याची पहिली राजधानी वसविली. हाच तो किल्ले राजगड!! ज्यावर शिवरायांनी त्यांच्या आयुष्यातील अदमासे २७ वर्षे व्यतित केली.

त्यांनतर हा स्वराज्य स्थापनेचा यज्ञ अविरत चालूच राहिला.त्यावेळी स्वराज्याची जी पहिली मोठी लढाई लढली गेली ती १६४९ ला किल्ले पुरंदर इथे. बेलसर इथे बाजी पासलकर काका यांच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली लढाई ही आदिलशाही सरदार फत्तेखान यासोबत होती.यात वीर बाजी पासलकर यांना वीरमरण आले.पण शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईत मोठेच यश प्राप्त झाले.आदिलशाही विरुद्ध लढलेली आणि विजय मिळवलेली ही पहिलीच लढाई होती.या युद्धाने शिवरायांना मोठा आत्मविश्वास प्राप्त झाला.त्यांचे युद्धनेतृत्व आणि युद्धकौशल्य पणाला लागले . पण या विजयाने ते झळाळून निघाले.या लढाईत बाजी जेधे, गोदाजी जगताप अश्या वीरांनी शर्थ केली.त्यावेळी शिवरायांचे वय होते अवघे १८ वर्षे!!!

त्यांनंतर अफझलखान वध, जावळीची लढाई(१६५९), कोल्हापूर येथे रुस्तमेजमान याचा पराभव, मग पन्हाळा लढाई आणि सुटका(१६६०),चाकण ची लढाई (१६६०), उंबर खिंड (१६६१),शाहिस्तेखान फजिती(१६६३).

इथवर ही घोडदौड चालूच होती.पण त्यानंतर १६६५ ला झालेल्या किल्ले पुरंदरच्या लढाईत मुघलांच्या सोबत कराव्या लागलेल्या तहामुळे त्यावेळेस स्वराज्याचे एकूण २३ किल्ले त्यांना मुघलांना द्यावे लागले.हा फार मोठा आघात होता. पण शिवराय याही परिस्थितीत न डगमगता १६६६ ला चातुर्याने आग्र्याहून सुटका करून पुन्हा स्वराज्यात किल्ले राजगडी आले.

त्यानंतर च्या काळात पुन्हा हे सर्व किल्ले मिळविण्यासाठी प्रयत्न केले गेले.यात मग सिंहगडाची लढाई, कांचनबारी,साल्हेर, खान्देरी या महत्वाच्या लढाई होत्या. शिवप्रभूंनी कल्याण इथे स्वराज्याचे आरमार स्थापन करून समुद्रात ही आपला पराक्रम आणि वर्चस्व प्रस्थापित केले.त्यांच्या या कार्याची दखल अगदी विदेशातील शाशकांनी घेतली.हिंदुस्थान चा त्यावेळस असलेल्या मुघल बादशहा औरंगजेब ला त्यावेळस असलेला एकमेव मोठा शत्रू म्हणजे शिवाजी महाराज होते असे जदुनाथ सरकार यांनी नोंदवले आहे.

या लढाई आणि त्यांची युद्धनीती यावर इतके विस्तृत लिहिण्यासारखे आहे की प्रत्येक लढाईवर एक स्वतंत्र पुस्तक होईल. शिवरायांनी लढलेल्या दक्षिण दिगविजयावर एक स्वतंत्र लेखमाला पुढे येईलच.तर अश्या या अवघ्या ३८ वर्ष्याच्या “कार्यरत” किंवा “सक्रिय” अश्या आयुष्यात शिवछत्रपतींनी स्वराज्यासाठी जवळपास ५०० लढाया लढल्या.

आदरणीय श्री आप्पा परब यांनी लिहिलेल्या “रणपति शिवाजी महाराज” या संदर्भ ग्रंथात या सर्व लढायांची नोंद आहे. आप्पानी या साठी अनेक बखरी, हस्तलिखिते यांची माहिती देऊन हा ग्रंथ अगदीच परिपूर्ण केलेला आहे. शिवछत्रपतींच्या युद्धे या विषयावर अभ्यास करण्याला हा ग्रंथ म्हणजे महाकाय संदर्भ कोषच आहे. श्री आप्पा परब यांचे या पुस्तकांसाठी मानावे तितके आभार कमीच आहेत!!

यानंतर शिवछत्रपतींच्या युद्धनीती वर महत्वाचा असलेला अजून एक संदर्भ ग्रंथ आहे. तो म्हणजे डॉ.श्रीनिवास सामंत यांनी लिहिलेला “वेध महामानवाचा” हा ग्रंथ!! यात त्यांनी नकाशे , लढाई तंत्रे याची भरपूर अचूक माहिती दिलेली आहे.युद्धतंत्राचा वापर कसा करावा आणि त्याने युद्धे कधी जिंकावीत याची शास्त्र शुद्ध माहिती या ग्रंथात आहे.

याच विषयावर असलेले तिसरे पुस्तक म्हणजे कॅप्टन राजा लिमये यांचे “रणराज शिवाजी”. या पुस्तकात युद्धशास्त्राच्या दृष्टीने शिवछत्रपतींच्या युद्धांचा उहापोह केलेला आहे.

श्री शेवडे आणि दुर्गेश परुळेकर यांनीही “शिवरायांची युद्धनीती” या त्यांच्या ग्रंथातून याच युध्द शास्त्रावर अभ्यास करून अनेक लढाईवर छान विस्तृत लिहिलेले आहे.

छत्रपती शिवरायांच्या युद्ध शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हे चारही  ग्रंथ प्रचंड माहितीचे आणि अभ्यासपूर्ण आहेत. यातून प्रत्येक लढाईवर कित्येक प्रबंध तयार होऊ शकतात इतके अफाट कर्तृत्व शिवप्रभूंनी केलेले आहे.फक्त आपणास ते योग्य रीतीने अभ्यासणे गरजेचे आहे.

तरीही माझ्या बुद्धीला जितके जमेल तितकी संक्षिप्त लेखमाला या विषयावर लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे !

पुढील लेखमालेत आपण शिवचरित्राच्या अजून काही महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.

आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या लेखामागील एकमेव उद्देश!!

बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.

किरण शेलार.

Leave a Comment