महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,354

कोल्हापूरच्या ह्या छत्रपतींची समाधी आहे इटलीत !

Views: 2683
7 Min Read

कोल्हापूरच्या ह्या छत्रपतींची समाधी आहे इटलीत !

इंग्रज आपल्याला कैद करून संस्थान खालसा करतील या भीतीने ज्याकाळी भारतातील संस्थानिक स्वतः च्या राजधानीतून बाहेर पडण्यासही घाबरत होते, त्या काळात मराठ्यांच्या या छत्रपतींनी सातासमुद्रापार थेट या इंग्रजांच्या राज्यातच पाऊल टाकण्याचे धाडस केले. इतिहासाला अज्ञात असणारे हे छत्रपती काळाच्याही पुढचा विचार करणारे होते. अत्यंत बुद्धिमान आणि देखणे रूप त्यांच्या राजेशाही व्यक्तिमत्वात अजूनच भर घालीत होती. असे काय कारण आहे की ज्यामुळे त्यांची छत्रपतींची समाधी आहे इटलीत ? त्यांच्याविषयी प्रथमपासून जाणून घेऊ,

छत्रपती शहाजी महाराज तिसरे उर्फ बुवासाहेब महाराज यांचा १८३८ मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पुत्र शिवाजी महाराज (तिसरे) हे गादीवर आले. त्यांना मुलगा नसल्याकारणाने त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच १८६६ मध्ये त्यांच्या बहिणीचा मुलगा म्हणजे त्यांचा भाचा (आऊसाहेब पाटणकर यांचा मुलगा नागोजीराव पाटणकर ) यांना १ ऑगस्ट १८६६ रोजी दत्तक घेतले. आणि त्यांचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज असे केले.

हे छत्रपती राजाराम महाराज अल्पवयीन असल्याने ( जन्म १३ एप्रिल १८५०) म्हणजेच ते गादीवर आले त्यावेळी त्यांचे वय होते फक्त १६ वर्ष. कोल्हापुरातील तत्कालीन ब्रिटिश रेसिडेंट कर्नल जी.एस.ए. अँडरसन ह्यांच्या सूचनेवरून कॅ. एडवर्ड वेस्ट ह्यांची असिस्टंट रेसिडेंट म्हणून नेमणूक होऊन छत्रपतींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
याशिवाय मुंबईचे जमशेटजी नौरोजी उनवाला ह्या पदवीधर ग्रहस्थांनाही त्यांच्या शिक्षणासाठी नेमण्यात आले.

दत्तकविधान होण्यापूर्वीच छत्रपतींचे थोडे इंग्रजी शिक्षण झालेले होते. त्यांना वाचनाचे अफाट वेड होते. समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी होती जी त्यांना शांत बसू देत नव्हती. नवीन काहीतरी बघण्याची, शिकण्याची, घडवण्याची वृत्ती उल्लेखनीय होती. वाचनाबरोबरच त्यांना बिलिअर्ड्स, क्रिकेट, शिकार ह्या खेळांची विशेष आवड होती. त्याकाळी त्यांना इंग्रजीमध्ये दैनंदिनी लिहण्याची सवय होती. ( त्यांच्याविषयी जी मोजकी माहिती उपलब्ध होते ती त्यांच्या दैनंदिनी मधूनच) त्याशिवाय ते अस्खलितपणे इंग्रजी बोलत.

कोल्हापुरात त्यांनी १८६९ मध्ये हायस्कूलची स्थापना केली. ज्याचे नामकरण त्यांच्या मृत्यूनंतर राजाराम कॉलेज असे केले गेले. इ.स. १८७० मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी इंग्लंडचा दौरा करण्याचे ठरवले. त्यांच्यासोबत कॅ. वेस्ट, पारसी शिक्षक आणि अन्य ११ जण बोटीने इंग्लंडला रवाना झाले. १४ जूनला ते इंग्लंडला पोचले. आपल्या साडे पाच सहा महिन्यांच्या या मुक्कामात अनेक देशांना आणि प्रेक्षणीय स्थळांना अभ्यासपूर्ण भेटी दिल्या. त्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, क्यू गार्डन, वुलीच अकॅडमी, क्रिस्टल पॅलेस अशा प्रगत शैक्षणिक संस्थांना महत्वपूर्ण भेटी दिल्या.

दोनतीन वेळा इंग्लंडच्या संसदेचे कामकाज कसे चालते हे बघितले. स्वतः इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स ऑफ वेल्स, ग्लॅड्स्टन, डिजरेली अशा अति महत्वाच्या व्यक्तींनीही महाराजांच्या खास भेटीसाठी खास वेळ दिला. स्टुडिओ मध्ये जाऊन त्यांनी आपली छायाचित्रे काढून घेतल्याचाही उल्लेख मिळतो. एवढेच नाही तर छत्रपतींनी स्वतः बॉलरूम डान्स चे धडे घेतल्याचाही उल्लेख मिळतो.

पुढे हिंदुस्थानातील संस्थानिक राजे राजपुत्रांनी अनेकदा युरोपदौरे केल्याचे आढळते पण गादीवर असताना परदेश दौरा करणारे छत्रपती राजाराम महाराज हे भारतातील पहिलेच उदाहरण.

दि. १ नोव्हेंबर १८७० रोजी छत्रपतींसह सर्वजण आपला अभ्यास आणि स्थलदर्शन दौरा संपवून मायदेशी परतण्यास निघाले. पुढे वॉटरलू येथे मुक्काम करून बेल्जियमच्या राजांना भेटून छत्रपती कालोन – फ्रँकफर्ट – म्युनिच असा मुक्काम करत १३ नोव्हेंबरला इन्सब्रूकला पोचले पण इथे महाराजांची तब्येत खालावली आणि त्यांना चालताही येईनासे झाले.
आजाराचे नेमके निदान होऊ शकलेच नाही. छत्रपतींनी सोबत नेलेला हकीम महाराजांवर उपचार करत होता. स्थानिक युरोपियन डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी महाराजांनी नकार दिला होता.

व्हेनिसला पोचल्यावर प्रकृती चिंताजनक असूनही महाराजांची इच्छाशक्ती विलक्षण होती. कारण अशाही परिस्थितीत त्यांनी फिरत्या खुर्चीवर बसून डोजचा राजवाडा आणि सान मार्कोच्या चौकासारख्या प्रेक्षणीय जागा बघितल्या. असाच पुढील मुक्काम त्यांचा फ्लॉरेन्स या शहरात पडला. या वेळी प्रकृती अत्याधिकच खालावल्याने डॉ. फ्रेजर नावाच्या डॉक्टर कडून त्यांनी उपचार घेतले पण औषधांचा चांगला परिणाम दिसत असतानाच ३० नोव्हेंबर १८७० या दिवशी पहाटे महाराजांचे अचानक निधन झाले. Congestion of the abdominal viscera, together with collapse of nervous power असे मृत्यूचे कारण नोंदवण्यात आले. या अल्पवयीन राजाचे निधन झाल्याने सर्वांवर शोककळा पसरली, सहप्रवाश्यांना अश्रू अनावर झाले.

छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर मागे राहिलेल्या सहप्रवाश्यांना नव्या अडचणीला सामोरे जावे लागले, ते म्हणजे हिंदू पद्धतीने करण्यात येणारी दहन पद्धत. कर्मठ ख्रिस्ती देशात हिंदूंची मरणोत्तर दहन पद्धत ही रानटी वाटायची त्यामुळे त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या पार्थिवाला अग्निसंस्कार करण्यास नकार दिला होता. फ्लॉरेन्सच्या वकिलाच्या दिवसभराच्या प्रयत्नांना यश येऊन शेवटी मंत्रिमंडळ पातळीवर निर्णय होऊन फ्लॉरेन्सपासून ७ – ८ किलोमीटर दूर असलेल्या आर्नो आणि म्युनोने नदीच्या संगमावर असणाऱ्या मैदानी प्रदेशात छत्रपती राजाराम महाराजांच्या पार्थिवावर १ डिसेंबर ला पहाटे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. नंतर त्यांच्या अस्थी गोळा करून मायदेशी आणण्यात आल्या. व गंगा नदीत अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

महाराजांच्या निधनानंतर फ्लॉरेन्समध्ये दहन भूमीच्या जागी त्यांचे स्मारक उभारणीसाठी निधी उभारल्या गेला. स्मारकाचा आराखडा मे. चार्ल्स मॅट ह्या तत्कालीन विख्यात आर्किटेक्टने तयार केला. तिथे छत्री उभारून त्याखाली महाराजांचा अर्धपुतळा साकारला गेला. अर्धपुतळा हा चार्ल्स फ्रान्सिस फुलर या ब्रिटिश शिल्पकाराने बनवला. मुख्य म्हणजे आजही त्या स्मारकाची योग्य व्यवस्था तेथील सरकारकडून राखली जाते.

अशा ह्या छत्रपती राजाराम महाराजांची दैनंदिनी वाचून असे जाणवते की काळाच्याही पुढचा विचार करणारा आणि पुष्कळ अशी सुधारणा करण्याची इच्छा असणारा हा राजा दुर्दैवाने अल्पायुषी ठरला. जेमतेम ४ वर्ष गादीवर असणारे राजाराम महाराज हे अत्यंत प्रगत विचारशैलीचे होते.

महाराजांची कार्यपद्धती आणि आधुनिक विचार पाहता त्यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर राजर्षी शाहू महाराजांच्या काळात कोल्हापुरात जसे कोल्हापूर घडले ते त्यांच्याही आधी घडले असते असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. दुर्दैवाने भारतात प्रथम पाऊल ठेवणारा आम्हाला शिकवला गेला पण या मातीत जन्म घेऊन प्रजेसाठी झटणारा, अल्पायुष्य लाभूनही शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करणारा, इंग्रजांच्या भूमीत पाऊल ठेवणारा भारतातील पहिला राजा आम्हाला शिकवला नाही.

वास्को द गामा, सिकंदर सगळ्यांना माहीत आहे. पण छत्रपती राजाराम महाराज मात्र अनेकांना अज्ञात आहे. एक वाक्य ऐकलं होतं कुठंतरी, की पाश्चात्यांचा टीचभर इतिहास ते आभाळाएवढा करून सांगतात पण आमचा इतिहासच आभाळा एवढा आहे पण तो सांगायला आम्ही कमी पडतोय. अशाच अज्ञात वीरांचा इतिहास उजळवण्याचा विडा उचलून त्यांना सामान्यांपर्यंत पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करतोय.(छत्रपतींची समाधी आहे इटलीत)

संदर्भ :

छत्रपती राजाराम महाराजांची दैनंदिनी.
करवीर रियासत.

इतिहास वेड
रोहित पेरे पाटील

Leave a Comment