चिमाजीअप्पा पेशवे स्मृतिवृंदावन –
बाळाजी विश्वनाथ यांना २ सुपुत्र होते. थोरले बाजीराव आणि धाकटे चिमाजी. परंतु धाकटे, चिमाजीअप्पा पेशवे या नावानेच जास्त सुप्रसिद्ध होते. १७०६ मध्ये चिमाजीअप्पांचा जन्म झाला. चिमाजीअप्पा अतिशय विनयी, धोरणी, करारी, मनमिळावू, नीतिमान, कर्तव्यनिष्ठ, लाघवी, प्रेमळ, शीलसंपन्न, कडक हिशेबी असे होते. त्यांना शाहू छत्रपतींनी १७ एप्रिल १७२० रोजी पंडित हा किताब व सरदारकी दिली.
बाजीरावांच्या यशात चिमाजीअप्पांचाही वाटा आहे. “बाजीराव आणि चिमाजीअप्पा हे दोघे भाऊ म्हणजे रामलक्ष्मणाची जोडी आहे.” अस ब्रम्हेन्द्रस्वामी म्हणत. चिमाजीअप्पांनी बाजीराव मोहिमेवर असताना इतर कामे जबाबदारीने सांभाळली. ज्या मोहिमांमध्ये बाजीरावांना सहभागी होणे शक्य नव्हते त्या मोहिमा त्यांनी स्वतः धडाडीने पूर्ण केल्या. १७२८ मध्ये माळव्यातल्या आमझेरा येथे त्यांनी माळव्याचा मोगली सुभेदार गिरीधरबहाद्दर आणि त्याचा चुलत भाऊ दयाबहाद्दर यांना ठार केले. १७३६ मध्ये त्यांनी सिद्दीसात याला मानाजी आंग्रे यांच्या साथीने रेवसजवळ तुंबळ लढाईमध्ये ठार केल. १७३७ ते १७३९ या काळात वसई – साष्टी परिसरातील आक्रमक, धर्मांध, जुलमी, क्रूर अशा पोर्तुगीजांचं उत्तर कोकणातील शासन पूर्णपणे उखडून टाकल. त्यानंतर त्या क्रूर, नराधम अशा पोर्तुगीजांचे पाय या परिसरात परत कधीच पडले नाहीत.
पोर्तुगिजांचा पराभव केल्यानंतर पुढची पाळी आपली आहे याची मुंबईकर इंग्रजांना धास्ती वाटू लागली. त्यामुळे कॅप्टन इंचबर्ड तह करण्यासाठी चिमाजीअप्पांकडे आला. त्याच्याशी तह झाल्यानंतर ३ सप्टेंबर १७३९ रोजी चिमाजीअप्पा पुण्यात आले. चिमाजीअप्पांचा १७ डिसेंबर १७४० रोजी पुण्यात मृत्यू झाला. त्यांचा अंतिम संस्कार ओंकारेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या जुन्या स्मशानभूमीत केला. त्यांच्या द्वितीय पत्नी अन्नपूर्णाबाई त्यांच्याबरोबर सती गेल्या. ती जागा आत्ताच्या ओंकारेश्वर मंदिराच्या प्रांगणाबाहेरील पटांगणात आहे. तिथे भरीव अष्टकोनी दगडाचा खालचा भाग, त्यावर घडीव दगडी वेलपत्तीचे कोरीव काम केलेले वृंदावन आहे. त्यात पश्चिमेकडे समाधीस्थळाच्या सपाटीपाशी एक कोनाडा. त्यात शाळुंकेसहित शिवलिंग.
वारी मार्ग उत्तरेकडे. समोर सालंकृत नंदी आणि या स्मारकचौथऱ्याच्या माथ्यावर सुघड अशी देखणी छत्री. प्रौढ प्रताप महाराष्ट्र धर्म संरक्षक रणधुरंधर श्रीमंत चिमाजी अप्पासाहेब पेशवे स्वर्गारोहण पौष शुद्ध ११, शके १६६२. श्रीमंत सौ. मातोश्री अन्नपूर्णादेवी श्रीमंतांबरोबर या जागी सती गेल्या.’ ‘जीर्णोद्धार चैत्र शुद्ध १, शके १८६१’ असा मजकूर कोरलेला आहे.
संदर्भ :
मुठेकाठचे पुणे – प्र. के. घाणेकर
शहामतपनाह बाजीराव – कौस्तुभ कस्तुरे
फोटो १,२ : Wikipedia
पत्ता : https://goo.gl/maps/ZtFhfTLLj4tkSMHZA