महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,466

महाराष्ट्राचे कंठमणी

Views: 1669
4 Min Read

महाराष्ट्राचे कंठमणी | चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख –

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर व स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सी.डी.देशमुख तथा चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांची आज १२५वी जयंती. स्वातंत्रपूर्व काळात आणि नंतरही त्यांनी निष्ठेने देशाची प्रशासकीय तसेच राजकीय सेवा केली. ते अर्थशास्त्रज्ञ होते. १९५६ साली मुंबई मुद्दामून महाराष्ट्रापासून तोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून चिंतामणरावांनी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा तसेच आपल्या लोकसभा सदस्य पदाचाही राजीनामा दिला आणि ते महाराष्ट्राचे कंठमणी झाले ! ही घटना अभूतपूर्व होती.

चिंतामणराव देशमुखांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला त्यावेळी दिल्ली सत्याग्रहासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीचे आचार्य अत्रे, एस.एम.जोशी, आचार्य दोंदे इ. सभासद दिल्लीला होते आणि त्यांनी चिंतामणरावांची भेट घेतली. आचार्य अत्रेंनी त्यावेळच्या घडामोडींचे वर्णन केले आहे. ‘चिंतामणी देशाचा कंठमणी झाला !’ हा आचार्य अत्रेंचा लेख ‘कऱ्हेचे पाणी’च्या पाचव्या खंडात वाचता येईल. चिंतामणरावांच्या भेटीविषयी आचार्य अत्रे लिहितात,

“मुद्रेवरून अत्यंत सौम्य आणि शालीन दिसणाऱ्या ह्या माणसाच्या हृदयात महाराष्ट्राच्या ज्वलंत अभिमानाचा केवढा अंगार धगधगतो आहे याचा प्रत्यय प्रत्येक शब्दाशब्दामधून येत होता… चिंतामणरावांचे उद्गार ऐकून आमच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. समोर चिंतामणरावांच्या निवासस्थानाचा विस्तीर्ण बगीचा पसरलेला होता. ह्या सर्व राजवैभवावर आणि मानमरातबावर ह्या मराठी माणसाने लाथ मारली होती. का ? तर त्याच्या हृदयात देशसेवेची ती प्रचंड उर्मी तेव्हा उचंबळली होती म्हणून ! त्या उर्मीच्या प्रवाहात त्याने आपले मन मंत्रिपद ‘देशार्पणमस्तु’ करून टाकले होते !

असा असामान्य त्याग करणारा पुरुष शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रातच निर्माण होऊ शकेल. आज महाराष्ट्राची मान उंच झाली !

दुसऱ्या दिवशी दि.२६ जुलै रोजी सकाळी आम्ही चिंतामणरावांशी फोनवरून बोललो. मी म्हणालो, “आपल्यासंबंधीच्या कृतज्ञतेच्या भावनेने आमची मने इतकी उचंबळून आलेली आहेत की आपल्याशी काय बोलावे हेच आम्हांला कळत नाही. काल सकाळी आपल्याला जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा राष्ट्रपतींनी आपला राजीनामा स्वीकारल्याचे आम्हांला माहीत नव्हते. आपल्या डोक्यात त्या वेळी निराळेच विचार चालले असतील. अशा वेळी आपल्या विचारतंद्रीमध्ये आम्ही व्यत्यय आणला ह्याबद्दल आम्हांला क्षमा करा !

चिंतामणराव हसून म्हणाले, “छे छे, तसे काही नाही. राजीनाम्याचा माझ्या डोक्यात विचारही नव्हता मी त्या वेळी अगदी आनंदात होतो. तुम्ही वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही.” त्यानंतर ते म्हणाले,

“आतापर्यंत महाराष्ट्रातले कित्येक लोक वीरश्रीच्या मोठ्मोठ्या वल्गनाच करीत होते. पण प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याची मात्र कोणाचीच तयारी नाही. ह्या संग्रामात पहिला बळी पडण्याची संधी मला मिळाली. हेच मी माझे भाग्य समजतो. महाराष्ट्राचा लढा हा काही केवळ प्रांतीय लढा नाही. तीन कोटी जनतेची सेवा ही केवळ महाराष्ट्राची सेवा नसून भारताची सेवा आहे असे मी मानतो.”

चिंतामणराव देशमुखांनी त्यादिवशी लोकसभेत आपल्या राजीनाम्यासंबंधी केलेले भाषण अतिशय तडफदार होते. नेहरूंच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस आहे हे सप्रमाण सिद्ध करून त्यांनी सत्ताधाऱ्यांना निरुत्तर व इतरांना रोमांचित करून सोडले. आचार्य अत्रेंनी त्याविषयीही लिहून ठेवले आहे. त्यानंतर जागतिक बँकेने त्यांचा गव्हर्नर होण्याची विनंती चिंतामणरावांना केली असतां त्यांनी ते पद स्वीकारण्यास नकार दिला. १९५९ मध्ये चिंतामणरावांना आशिया खंडाचा नोबेल – ‘रॅमन मॅगसेसे’ आणि १९७५ मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मविभूषण’ हे पुरस्कार मिळाले. पूर्वी १९४३ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ (नाईटहूड) ही पदवी दिली होती. चिंतामणराव देशमुखांनी कालिदासाच्या मेघदूत काव्याचा मराठी अनुवाद केला. त्यांचे ‘द कोर्स ऑफ माय लाईफ’ हे आत्मचरित्र आहे. चिंतामणरावांचे जीवन रोचक, प्रेरक तसेच जाणून घेण्यासारखे आहे. त्यांना मानाचा मुजरा.

प्रणव कुलकर्णी

Leave a Comment