150 वर्ष जुने घंटाघर (क्लॉक टॉवर), अमरावती –
अमरावती शहरातील प्रसिद्ध 150 वर्ष जुने घंटाघर घड्याळ उर्फ क्लॉक टॉवर ही तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्यांनी दिलेली देणगी होय . त्या काळात सिव्हिल सर्जन व चीफ एक्झीक्युटीव्ह इंजिनीअर हे अधिकारी सरकारनियुक्त नगरपालिकेचे सभासद असत .
इ .सन १८७०-७१ चे सुमारास मेजर जे . टी . व्यु सबॉय हा डेप्युटी कमिश्नर व त्या नात्याने नगरपालिकेचा अध्यक्ष होता तसेच त्या वेळ चा पी . डब्ल्यु . डी . खात्याचा चीफ इंजिनीअर आर डब्ल्यु . वुडहाऊस हा होता व तो सरकारनियुक्त नगरपालिकेचा सभासदही होता . ‘ मुंबईच्या राजाबाई टॉवरप्रमाणे येथेही एक टॉवर बांधावा ‘ ही कल्पना या अधिकाऱ्यांनी मांडली आणि त्यासाठी हल्ली जेवढा जोग चौक आहे ती चौरस जागा रिझर्व करायला लावली . मध्ये घड्याळ असलेले टॉवर व त्या सभोवती बाग असावी अशी त्याची मूळ कल्पना होती . त्याप्रमाणे त्यावेळी सुमारे दोन हजार रूपये खर्चुन नगरपालिकेने , पी . डब्ल्यू . डी . च्या . देखरेखीखाली हे घंटी घड्याळ बांधविले . त्यावर जी मोठी घड्याळे बसविली ते अमरावती मधील गणपतराव मिस्त्री या गृहस्थानी बनविले . ही घड्याळ प्रत्येक तासाला गजर ( घंटा ) देत असत . बगिचा मात्र शेवटी झाला नाहीच ; कंपौंडवॉल फक्त बांधल्या गेली .
त्यावेळी शहराच्या अगदी नजीक असा हा सुंदर बगिचा व तासातासाला किती वाजले हे सांगणारे घड्याळ असलेले उंच टॉवर अशी वुडहाऊसची कल्पना होती पण घंटीघर बांधल्या नंतर बगीचाची कल्पना तशीच राहिली . पुढे घड्याळही बंद पडले, दि २६ ऑक्टोबर १८७२ रोजी टॉवर क्लॉक दुरुस्त करावा आणि त्याला किल्ली देने व इतर देखभाल करणे या कामा साठी दर महा ५ रुपये पगारावर मानूस नेमावा असा ठराव अमरावतीच्या नगरपालिके तर्फे घेण्यात आला, आणि दुसऱ्या एका ठराव नुसार लोकांचे मनोरंजनासाठी , घंटी घड्याळ जवळ आठवड्यातून दोनदा बँड वाजविला जाई . परंतु एप्रील १८९३ नंतर हा बॅन्ड आठवड्यातून फक्त एकदाच , दर शनिवारी सायंकाळी वाजविण्यात यावा असा नगर पालिकेने निर्णय घेतला होता . पण पुढे हा निर्णयही बदलून मे १८९४ मध्ये , बॅन्ड वाजविणे बंद करावे असा ठराव करण्यात आला .
कित्येक वर्षे लोटलेट पण त्या टॉवर वरील घड्याळ कधीही दुरुस्त होऊ शकले नाही . आणि शहराच्या शोभेची व उपयोगाची ही मूळ कल्पना या टॉवर प्रमाणेच खिन्न मनाने शहराकडे ” कधीतरी जीर्णोद्धार होईल ‘ या आशेने आजही पाहत आहे .
संदर्भ:- अमरावती शहराचा इतिहास ले. भि. दे. कारंजकर.
शिवा श्रीकृष्णराव काळे
स्वराज्य सेवा प्रतिष्ठान