महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,794

छत्रपती शिवरायांच्या नावाचा सोयीनुसार होणारा वापर

Views: 3894
7 Min Read

छत्रपती शिवरायांच्या नावाचा सोयीनुसार होणारा वापर

CAA चा कायदा आणायच चाललंय त्या अनुषंगाने काही लोक शिवरायांच्या नावाचा दाखला देतात त्या लोकांसाठी थोडस. मी कदाचित चुकत असेलही पण अंतर्मुख होऊन विचार करावा. इंटरनेटवर छत्रपती शिवरायांचा उल्लेख कायमच असतो, पण मागील आठवड्यापासून इंटरनेटवर एका वेगळ्या कारणामुळे शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख खूप वेळा पाहिला गेला की शिवरायांनी कधीच परमुलखात असलेल्या हिंदूंना कधीच त्रास होऊ दिला नसता, शिवराय देखील हा निर्णय पाहून आनंदी झाले असतील वगैरे वगैरे.(छत्रपती शिवरायांच्या नावाचा सोयीनुसार होणारा वापर)

तर माझंही अस मत आहे की पाकिस्तान अन बांगलादेश मधील जे हिंदू आहेत त्यांना स्वदेशात आणायचा कायदा आला असता तर शिवरायांना नक्कीच आनंद झाला असता.

यावर काहींनी एक उदाहरण दिले की ज्यावेळी औरंगजेब ने समस्त हिंदू लोकांवर जिझिया कर लादला तेव्हा शिवराय प्रचंड संतापले, शिवरायांनी औरंगजेबाला खरमरीत पत्र लिहल त्यावेळी. बरोबरच आहे,अहो कोणीही हिंदू संतापला असता अन त्याने ह्या क्रूर कायद्याविरोधात आवाज उचलला असताच. यात कोणाचेच दुमत असण्याचं काही कारण नाही.

पण तत्पूर्वी

शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र पारतंत्र्यात होता. आदिलशाही अन निजामशाही च्या जाचामूळे संपूर्ण रयत त्रस्त झाली होती. त्यात थोरले महाराज म्हणजेच स्वराज्य संकल्पक शहाजीराजे हे आदिलशाही सरदार होते. त्यामुळे एक सरदारपुत्र म्हणून जन्माला आलेल्या शिवरायांना कसलीही कमी असणार नव्हती. पण त्यांच्या मनात स्वातंत्र्याची आग होती. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे त्यांना मान्य नव्हते. म्हणून महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही तसेच मुघलांशी झुंजत हिंदवी स्वराज्य उभे केले.

त्यावेळी जेव्हा शिवराय स्वराज्य उभे करण्याचा विचार केला अन मावळ्यांची जमवाजमव चालू केली, रयतेचा विश्वास संपादन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी जाहीरनामा काय दिला होता स्वराज्याचा????

सर्वास पोटास लावणे आहे.

म्हणजे अवघ्या स्वराज्यातील रयतेचे पोट सगळ्यात आधी भरले पाहिजे आणि तशी तजबीज राजांनी केली. रयतेच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला.

आता पाकिस्तान मधील हिंदूंची काळजी करताना काही लोक जिझिया कराबद्दल असलेल्या शिवरायांच्या भूमिकेचे उदाहरण देत आहेत. शिवरायांनी परमुलखात असणाऱ्या हिंदूंसाठी आवाज उठवला, पण त्यावेळी पूर्ण रयतेच्या पोटापाण्याची व्यवस्था अगोदर केली होती. स्वराज्य स्वयंपूर्ण बनवले होते. ना की रयतेच्या प्रश्नांना बगल देऊन ती भूमिका घेतली. आता जर भारतात अशी परिस्थिती असेल तर मग या कायद्याला काहीच विरोध नाही.

अजून एक

जेव्हा शिवरायांनी औरंगजेबला पत्र लिहून जिझिया कराबद्दल त्याची कानउघडणी केली तेव्हा स्वराज्यातील महिला अन स्त्रिया सुरक्षित होत्या का???

तर हो, स्वराज्यात कोणत्याही स्त्रीच्या इभ्रतीला धोका नव्हता. कोणी असा विचार केला किंवा कृत्य केले तरी त्याचा चौरंगा केला जायचा. एवढंच नाही तर स्वराज्यात शत्रू पक्षातील महिलेला सुद्धा आई बहिणीचा मान होता. कल्याणच्या सुभेदाराची सून असो किंवा देसाई घराण्यातील स्त्री असो.

पाकिस्तानमधील हिंदूंची काळजी करणाऱ्यांसाठी एक प्रश्न, आज भारतातील हिंदू स्त्रिया सुरक्षित आहेत. माझी कोपर्डीची ताई असो की हैदराबाद ची प्रियांका ताई असो, आहेत आयाबहिनी सुरक्षित? भारतात आज हिंदू महिला सुरक्षित असतील तर या कायद्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही.

अजून एक, स्वराज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागत नव्हता. तो काळ असा होता की शिवकाळात एकही शेतकरी आत्महत्या झाली नाही. आता जर सगळे हिंदू शेतकरी सुखी असतील तर या कायद्याला विरोध करण्याचे काही कारण नाही.

आता लोक म्हणतात महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे केले. हिंदवी म्हणजेच हिंदू असे बऱ्याच लोकांना वाटत.

जर्मन तत्वज्ञ हेगल यांनी इतिहासाचे तत्वज्ञान मांडताना असे सांगितले की विशिष्ट काळी विशिष्ट राष्ट्राला एक पूर्वनियोजित कार्य करावे लागते, ते त्या राष्ट्राचे अवतारकार्य.”

याचप्रमाणे हिंदवी स्वराज्य हे महाराष्ट्राचे अवतार कार्य ठरले. “हिंदवी स्वराज्य” हे शब्द भूभागाशी निगडित आहेत, धर्माशी नाही. हे शब्द शिवरायांनी दादाजी नरसप्रभु यांना लिहलेल्या पत्रात आढळतात. ही भूमी हिंदवासीयांची आहे आणि येथे हिंदवी स्वराज्य नांदले पाहिजे अशी भूमिका त्यामागे होती.

आता छत्रपती शिवरायांचा धर्माबद्दल दृष्टिकोन

शिवाजी महाराज लहानपणापासूनच शंभू महादेवाचे निस्सीम भक्त होते, त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात महादेवाला रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य स्थापन करण्यासाठी शपथ घेतली होती, महाराजांच्या जवळपास प्रत्येक गडावर एक महादेवाचं मंदिर अन त्या गडाची कुलदेवता असणाऱ्या एका देवीचे मंदिर आहे. त्यामुळे शिवरायांची हिंदू धर्मावर अपार श्रद्धा होती, निष्ठा होती. राजे आई भवानीचे परमभक्त होते.

पण म्हणून राजे कधीही दैवत्वाच्या आहारी गेले नाहीत, महाराजांनी कधीही कोणत्या गडाला देवाचे वगैरे नाव दिले नाही. पण गडावर हनुमानाच्या मूर्ती, गणपतीच्या मूर्ती हमखास आढळतील. उदा. राजगडावर सुवेळा माचीवर जाताना तुम्ही दोन्ही मूर्ती पाहू शकता.

महाराजांना हिंदू धर्माबद्दल नितांत प्रेम, स्वाभिमान अन निष्ठा होती. पण याचा अर्थ असा नव्हे की महाराज बाकीच्या धर्माचा द्वेष करत.

आता काही लोक म्हणतात की महाराजांचे ध्येय फक्त म्लेंछ म्हणजे मुस्लिम लोकांचा नाश करणे हे होते. पण असे जर असते तर कल्याणच्या सुभेदाराच्या मुस्लिम सुनेला महाराजांनी साडी अन चोळी देऊन आईच्या मानाने माघारी पाठवलं नसत. तीही मुस्लिम होतीच ना. शिवराय धर्मांध असते तर त्यांनी असे केले असते???

दौलतखान, सिद्धी हिलाल, मदारी मेहतर, काझी हैदर इत्यादी मुस्लिम सैनिक राजांसोबत होते. महाराज धर्मांध असते तर असे असते का हो.

आता लोक म्हणतात शिवरायांनी मुस्लिम शत्रूंना मारलं. हो, बरोबरच आहे, महाराजांचे तत्कालीन काळात उघड उघड शत्रू हे मुस्लिमच होते. पण सोबतच त्यांनी खंडोजी खोपडे, कृष्णाजी भास्कर तसेच संभाजी कावजी कोंढाळकर या हिंदू शत्रूंचा पाडाव केलाच. म्हणजे स्वराज्याशी गद्दारी करनारा प्रत्येक जण महाराजांच्या लेखी शत्रूच होता. मग यात धर्मांधता कुठून येते.

आता छत्रपती शिवराय कोणत्याही एका धर्माविरुद्ध नव्हते. विष्णुशास्त्री यांच्यासह सगळ्या धर्मसभेचा विरोध असताना कोणालाही न जुमानता शिवरायांनी महंमद कुली खान उर्फ नेताजी पालकर याना स्वधर्मात घेतले. शिवरायांचे मेहुणे बजाजी नाईक निंबाळकर यांना सुद्धा महाराजांनी पून्हा हिंदू धर्मात घेतले.

आता जर शिवराय धर्मांध असते तर त्यांनी बाटलेल्या लोकांना पून्हा स्वधर्मात कसे घेतले असते का???

शिवराय हे हिंदू धर्माचे, भगवान महादेवाचे, आई भवानीचे निस्सीम भक्त होते.

खरेच शिवरायांना अपेक्षित असलेला आपला उदात्त हिंदू धर्म आपल्या कोणाला कधी समजणार???स्वतःच्या सोयीनुसार शिवरायांच्या धोरणांची अन विचारांची सोयीनुसार असाच वापर केला गेला तर नक्कीच सर्वांना अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

1 Comment