महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,12,332

डोक्याखाली घोड्याचं खोगीर घेऊन झोपणारा क्रूर राजा

Views: 1409
5 Min Read

डोक्याखाली घोड्याचं खोगीर घेऊन झोपणारा क्रूर राजा –

ज्याच्या आक्रमणाला रोखण्यासाठी मराठ्यांची संपूर्ण एक पिढी देशरक्षणार्थ खर्ची पडली, त्या अहमदशाह अब्दालीचा गुरू, भारतावर स्वाऱ्या करून तीन लाखांपेक्षा जास्त निष्पाप लोकांची कत्तल करणारा अतिशय क्रूर शासक, इराण चा शाह आणि अफशारीद साम्राज्याचा संस्थापक तहमस कुलीखान उर्फ ‘नादिर शाह’.(डोक्याखाली घोड्याचं खोगीर घेऊन झोपणारा क्रूर राजा)

नादिर शाह अतिशय बलाढ्य, सामर्थ्यवान पण तितकाच क्रूर शासक होता. त्याला कोणत्याही गोष्टीचे भय वाटत नसे. त्याच्या आयुष्याचे एकमेव उद्दिष्ट फक्त आणि फक्त शत्रूसोबत युद्ध करून विजय मिळवणे, एवढेच होते. एकदा एका धर्मगुरूसोबत तो चर्चा करत होता. बोलता बोलता तो धर्मगुरू स्वर्ग-नरकाविषयी नादिर शाह ला सांगू लागला. तेव्हा त्याने विचारले,

‘स्वर्गात शत्रू, युद्ध, विजय यांसारख्या गोष्टी घडतात का?’

दुर्दैवाने असं काहीही स्वर्गात घडत नसतं, हे धर्मगुरुचे उत्तर ऐकल्यावर छद्मी हसत नादिर शाह म्हणाला,

‘जर या गोष्टी स्वर्गात नसतील, तर नेमकं कसल्या प्रकारचे सुख त्या ठिकाणी लाभेल?’

एवढ्या प्रचंड प्रमाणात नादिर शाहला युद्धाचे वेड होते.

त्याने कधीही विलासी जीवन जगले नाही. सहा फुटांपेक्षा जास्त उंची, भेदक पण बारीक डोळे, भुरकट रंगाचे केस, चेहरा झाकेल एवढी दाढी, मजबूत बांधा आणि युद्धामुळे चेहऱ्यावर आलेला राकटपणा त्याच्या क्रूरपणात अधिकच भर घालत होता. त्याने स्वतःच्या राहण्यासाठी कधीही वैभवशाली महाल बांधला नाही. कधीही दागदागिने घातले नाहीत. त्याचा दरबार नेहमी युद्धभूमीवर असणाऱ्या तंबूत भरत असे. त्याचे विश्वासू अधिकारी म्हणजे शूर सैनिक आणि त्याचा महाल म्हणजे तोच युद्धभूमीवरचा तंबू.. असं म्हणतात की झोपण्यासाठी मखमलीच्या कापडाची उशी नव्हे तर घोड्यावर असलेलं जीन तो डोक्याखाली घेत असे.

नादिर शाह अतिशय क्रूर. मुघल बादशाह मुहम्मद शाह वर त्याने आक्रमण केले. अगणित संपत्ती लुटली, मयूर सिंहासन नेले. यावेळेस मुहम्मद शाह ची मुलगी जहान अफ़रुज बानू बेगम ला आपल्या मुलासाठी ‘नस्रुल्ला’ साठी त्याने मागणी घातली. मुहम्मद शाहसमोर हा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. तरी त्याने कसातरी हा प्रश्न टाळता येईल का, हे चाचपून पाहिले आणि नादिर शाह च्या सात पिढ्यांची माहिती दिल्याशिवाय लग्न लावता येणार नाही, अशी धार्मिक अडचण समोर केली. तेव्हा नादिर शाह चिडला, उत्तरादाखल म्हणाला,

‘नस्रुल्ला हा नादिर शाह चा मुलगा आहे. त्याचा बाप पराक्रमी समशेरीचा मुलगा आहे. सात काय सातशे पिढ्यांची यादी द्यायला तयार आहे.’ शेवटी मुहम्मद शाह चे काही चालले नाही. त्याला आपल्या मुलीचे लग्न करून द्यावेच लागले.

एके दिवशी नादिर शाह ने दरबार भरवला होता. हैद्राबादचा निजाम सुद्धा त्याप्रसंगी दरबारात होता. त्याला चेहऱ्यावरून भविष्य ओळखण्याची कला अवगत होती. दरबारातल्या एका शूर सैनिकाकडे पाहून निजाम म्हणाला, हा शिपाई पुढे जाऊन बादशाह होऊ शकतो. त्याचे हे उद्गार ऐकून नादिरशाह ने त्या सैनिकाला जवळ बोलावले, त्याच्या कानाचा एक तुकडा कापला आणि म्हणाला,

‘जेव्हा तू बादशाह होशील, तेव्हा तुला माझी आठवण येईल.. आणि ही आठवण मरेपर्यंत राहील.’

हा शूर सैनिक म्हणजे ‘अहमद शाह अब्दाली’.. ज्याला रोखण्यासाठी मराठ्यांनी पानिपतावर भयंकर रणतांडव केला.

असा हा क्रूर, उलट्या काळजाचा आणि सैनिकी बुद्धीचा बादशाह ‘नादिर शाह’. त्याच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून मुघलांनी मराठ्यांकडे दोन्ही वेळेस मदत मागितली. थोरल्या शाहू छत्रपतींनी मुघलांचे संरक्षण करण्याचे मान्य केले. नादिर शाहच्या इसवी सन 1739 च्या स्वारीवेळी बाजीराव पेशव्यांना ससैन्य उत्तरेस पाठवण्याची तयारी सुरू झाली. चंबळ च्या उत्तरेस पोचून नादिरशहा ला तिथेच गाठण्याचा बाजीरावांचा मानस होता. जेणेकरून नादिरशहा माळव्यात शिरू शकणार नाही. मराठा आणि मोगल हेरांनी उत्तरेत अफ़वा पेरल्या कि शाहूंनी पूर्व,पश्चिम आणि दक्षिणेतून एकत्रित २ लाखांची फौज बाजीरावांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या रक्षणास पाठवली. या बातमीचा योग्य तो परिणाम होऊन नादिरशहा मराठ्यांच्या भीतीने दिल्ली सोडून इराणला निघाला.

एवढ्या बलाढ्य आणि क्रूर राजाला सुद्धा मराठ्यांच्या छत्रपतीपुढे नमते घ्यावे लागले होते. सतराव्या आणि अठराव्या शतकात मराठ्यांएव्हढा प्रबळ सत्ताधीश दुसरा कुणीही नव्हता, याचेच हे द्योतक आहे.

नादिरशाह ला मोठ्या क्रूरतेने मारण्यात आले. खुरसान प्रांतात मुक्कामी असताना त्यांच्या तंबूत पंधरा मारेकरी दाखल झाले. नादिर शाह बेसावध होता. तशाही परिस्थितीत त्याने दोन मारेकऱ्यांचा जीव घेतला.. पण बाकीच्यांनी त्याच्या देहाची खांडोळी केली.

नादिर शाहच्या हत्येचे हे कल्पना चित्र इसवी सन 1779 मधील आहे.

– केतन पुरी.

Leave a Comment