महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,573

बोरीबंदरचे भव्य रेल्वे संग्रहालय | CSMT Railway Museum

By Discover Maharashtra Views: 3713 5 Min Read

बोरीबंदरचे भव्य रेल्वे संग्रहालय | CSMT Railway Museum

प्रत्येक मुंबईकराने अनेकदा मध्य रेल्वेच्या बोरीबंदर म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून गाड्या पकडून प्रवास केलेला असतो. पण तो नेहेमीच धावपळीत असतो. त्याची धावपळ पाहून असे वाटते की मुंबईकर आधी धावतो आणि मग धावता धावता ठरवितो की आपण कशासाठी धावतोय ! पण प्रत्येकाने थोडा वेळ काढून मुद्दाम पाहावे असे, रेल्वेच्या अगदी प्रथमपासूनच्या अनेक स्मृती जपणारे, रेल्वेचे भव्य संग्रहालय या स्थानकातच आहे. ! या देखण्या राजेशाही इमारतीच्या काही भागामध्ये हे संग्रहालय आहे.

१६ एप्रिल १८५३ मध्ये भारतातील पहिली प्रवासी गाडी बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. आत्ताच्या स्टेशनच्या उत्तरेला थोड्याशा अंतरावर जुने बोरीबंदर स्टेशन होते. हे नवीन स्टेशन फ्रेडरिक विलियम स्टीव्हन्स याच्या कल्पनेतून साकारले. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त हे स्टेशन बांधले गेले आणि साहजिकच बोरीबंदरचे नामांतर व्हिक्टोरिया टर्मिनस झाले.
या स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच दोन मोठ्या खांबांवर सिंह ( ब्रिटनचे मानचिन्ह ) आणि वाघ ( भारतीयांचे मानचिन्ह ) यांचे पुतळे आहेत. बांधकामासाठी सँडस्टोन,लाईमस्टोन, रेडस्टोन, बेसॉल्ट, इटालियन मार्बल अशा अनेक प्रकारच्या दगडांचा वापर केला गेला. हलक्या भूकंपापासून बचाव होण्याच्या दृष्टीने, आधार देणाऱ्या स्लॅब्जमध्ये सॉफ्टस्टोनचा वापर केला गेला असावा. आतील खांबांवरील दगडांवर खूप नाजूक नक्षी, पाने, फुले, पशुपक्षी कोरलेले आहेत. मुख्य घुमट आतून खूप देखणा आहे. बाहेर या घुमटावर, अमेरिकन स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची आठवण करून देणारा एका स्त्रीचा भव्य पुतळा आहे. तिच्या उजव्या हातात मशाल आणि डाव्या हातात आरे असलेले चाक आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, रोमन संस्कृती, ईजिप्शियन संस्कृती अशा जुन्या संस्कृतींमध्ये ही दोन्ही, ज्ञान आणि प्रगतीची चिन्हे मानली गेली आहेत. आतून भिंतींना लावलेल्या ब्रिटनच्या मॉ अँड कंपनीच्या फरश्यांचे रंग आजही अगदी नवीन असल्यासारखे दिसतात. २००४ मध्ये युनोने या स्टेशनचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे.

भारतात रेल्वे सुरु करण्यासाठी १८४५ मध्ये नाना शंकरशेट यांनी भारतीय रेल्वे असोसिएशनची स्थापना केली.त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन या संस्थेचे रूपांतर Great Indian Peninsula Railway म्हणजेच GIP रेल्वेत ( आताची Central Railway ) झाले. सर जमशेटजी जीजीभॉय आणि नाना शंकरशेट हे दोनच भारतीय या कंपनीच्या बोर्डावर डायरेक्टर म्हणून होते. नानांचे नाव या स्टेशनला द्यावे अशी रास्त मागणी होत असतानाच, मुंबईच्या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यायला लागू नये म्हणून त्या ऐवजी १९९६ मध्ये या स्टेशनला घाईघाईने, “छत्रपती शिवाजी टर्मिनस” असे त्यांचे नाव दिले गेले. राज्यकर्त्यांना त्यानंतर ही मागणी थांबेल असे वाटले पण जनरेट्यामुळे मुंबई विमानतळालाही महाराजांचेच नाव द्यावे लागले. छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावात महाराजांचा पुरेसा मान राखला जात नाही असे वाटल्याने आत्ताच्या सरकारने २०१७ मध्ये या स्टेशनचे “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” असे पुन्हा नामांतर केले. आता या संपूर्ण इमारतीतच रेल्वे संग्रहालय करण्यात येणार आहे.

इमारतीच्या बाह्य भागात सुंदर कमानींवर जीजीभॉय आणि नाना यांचे छोटे पुतळे कोरण्यात आले आहेत. आणखी एक पूर्ण वेगळे वैशिष्ठय म्हणजे येथे वेगवेगळे १६ मुखवटे कोरलेले आहेत. त्यावेळी भारतात बोलल्या जाणाऱ्या १६ प्रमुख भाषांच्या विभागातील ( तेव्हा भाषावार प्रांतरचना झालेली नव्हती ) पुरुषांचे, त्या प्रांतातील वैशिष्ठयपूर्ण पोशाखात हे पुतळे आहेत. या भाषा चलनी नोटेवरही वापरल्या जात असत.

संग्रहालय पाहायला सुरुवात करतांनाच १६८२ मधील आग विझवण्याचा बंब दिसतो. नंतर १९११ च्या दादर स्टेशनचे छायाचित्र व या पूर्ण इमारतीचे एक सुंदर मॉडेल, रेल्वे सुरु होत असल्याची बॉम्बे टाईम्समधील जाहिरात, कोरीव काम केलेली तिकीटविक्रीची खिडकी पाहायला मिळते. बिटिशांनी आपल्या नावांची किती वाट लावलेली होती हे देखील वाचायला मिळते. चिंचपोकळी चे चिंचपुगली, तानाह , दिवाह, कॅलियन, बुदलापुर, नरेल, कुरजूत, लोनोवली, तुलीगाम, चिंचवूड ही नावे वाचून करमणूक होते. १८९७ मध्ये सुरु झालेल्या बार्शी लाईट रेल्वे या नॅरो गेज रेल्वेचे चालते बोलते मॉडेल येथे ठेवण्यात आले आहे. राजदरबारासारखे कोरीव लाकडी दरवाजे, रंगीत चित्रयुक्त काचांच्या खिडक्या, दगडात कोरलेला मोर आणि जाळी हे सारे खूप सुंदर आहे.

सर्वांवर कडी केली आहे ती येथील स्टार गॅलरीने ! तिकीट घरावरील गॅलरी, कमानी, खिडक्या, दिवे, छत खूपच प्रेक्षणीय आहे. आपण जेव्हा लोकलचे तिकीट काढतो तेव्हा आपल्या डोक्यावर इतके सौन्दर्य विराजमान आहे याची कल्पनाही येत नाही. ते तेथे जाऊनच अनुभवायला हवे. रेल्वे खात्याने हे संग्रहालय पाहण्यासाठी माणशी २०० रुपये प्रवेश फी ठेवली आहे. त्यात संपूर्ण माहिती देणाऱ्या गाईडची सुविधा अंतर्भूत आहे. एक गोष्ट खटकते ती अशी की येथे फक्त सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते ५ या वेळेत भेट देता येते आणि शनिवार, रविवार व सुट्यांच्या दिवशी बंद असते. येथे फोटोग्राफीस मनाई नाही त्यामुळे मला मनसोक्त फोटो घेता आले. त्यातील कांही फोटो सोबत देत आहे.





माहिती साभार – Makarand Karandikar | [email protected] 

Leave a Comment