दाभोळची शाही मशीद | अंडा मशीद –
ही मशीद कोकण किनारपट्टीवरील भव्य, सुस्थितीत असलेली आदिलशाही काळातली एकमेव इमारत आहे. कोकणात जांभा दगडाच्या तुलनेत कमी आढळणारे संपूर्ण काळ्या दगडातले बांधकाम असलेली ही इराणी शैलीत बांधलेली मशीद विजापूरच्या शाही जामा मशिदीची प्रतिकृती आहे. आजूबाजूला उंच तटबंदी, कमानी, खोल्या, भव्य प्रवेशद्वार, उंच जोत्यावर मशिदीचा ७५ फूट उंच घुमट, चार बाजूंना चार प्रमाणबद्ध मनोरे, हौद, कारंजे, मशिदीच्या आवारात जुन्या कबरी, नारळ-पोफळीच्या झाडांनी भरलेली बाग, मशिदीच्या भव्य घुमटावर पूर्वी सोन्याचा पत्रा होता म्हणतात. या मशिदीला अंडा मशीद, माँसाहेब मशीद अशी अजून दोन नावे आहेत.
विजापूरची राजकन्या आयेशाबिबी सन १६५९ (की १५५९?) मध्ये मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. अनेक नामकरणे झालेल्या दाभोळचे एक नाव ‘बाबुलहिंद’. बाबुलहिंद म्हणजे मक्केला जाण्याचा/मक्केवरून येण्याचा हिंदुस्थानचा दरवाजा. मध्ययुगात दख्खनमधील मुस्लिम मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदरात येत. तशी ही आयेशाबिबी दाभोळला आली. पण हवामान प्रतिकूल असल्यामुळे तिचा पुढचा प्रवास होऊ शकला नाही. तिच्याबरोबर वीस हजार स्वार, प्रचंड लवाजमा व लाखो रुपयांची संपत्ती होती. प्रवास रद्द झाल्याने काय करावे ह्या विवंचनेत असताना तिला सोबतच्या काझी मौलवींनी सदर संपत्ती धार्मिक कार्यासाठी खर्चण्याचा सल्ला दिला. तेव्हा तिने ही मशीद कामीलखान नावाच्या शिल्पकाराकडून बांधवून घेतली. मशिदीचे बांधकाम चार वर्षे चालले व १५ लाख रुपये खर्च आला. आयेशाबिबीला माँसाहेब म्हणत त्यामुळे मशिदीला माँसाहेब मशीद हे नाव पडले. अंडा मशीद हे नाव पडण्यामागे एक आख्यायिका आहे की, एका फकिराने त्याच्याकडील एका अंड्यातून जन्मलेल्या कोंबडीपासून उत्पन्न झालेल्या अनेक कोंबड्या विकून ही मशीद उभारली; म्हणून अंडा मशीद.
इथे दुसऱ्यांदा येणं झालं. इथे आल्यावर एक वेगळाच, आदिलशाही इतिहासाचा फील येतो. आदिलशाहीचा दाभोळशी बराच संबंध आला. दाभोळला आल्यावर तो जाणवतो (इतिहासाची जाण असल्यास). दाभोळच्या वातावरणात ऐतिहासिक गूढता आहे आणि त्या गूढतेला वैभवशाली तसेच रक्तरंजित इतिहासाचा गंध आहे. अफजलखान आला तेव्हा त्याची व्यापारी मालाने भरलेली तीन गलबतं दाभोळला नांगरून पडलेली होती. खानाला मारल्यानंतर महाराजांनी ती तीन गलबतं जप्त केली. १६६१ साली तळकोकणाच्या मोहिमेवर जाताना महाराज सर्वप्रथम दाभोळला आले होते व त्यांनी दाल्भ्येश्वराचे दर्शन घेतले. दाभोळचा इतिहास मोठा रोचक आहे…
प्रणव कुलकर्णी.