डच वखार | Dach Vakhar
वेंगुर्ले प्राचीन काळी एक प्रसिध्द व्यापारी बंदर असल्याने, सोळाव्या शतकात हिंदुस्थानात आलेल्या डच व्यापाऱ्याचे वेंगुर्ले येथे आगमन झाले. हॉलंडहून आलेल्या डच व्यापार्यांचा मराठी ऎतिहासिक कागदपत्रात “वलंदेज” या नावाने उल्लेख आढळतो. वेंगुर्ले हे प्रमुख व्यापारी बंदर असल्याने या ठिकाणी सत्ताधारी असलेल्या विजापूरच्या आदिलशाहाच्या परवानगीने डच व्यापारी प्रमुख ‘लिटर्ड’ जान्सझून्स याने इ.स. १६५५ साली डच वखार | Dach Vakhar बांधली होती. परंतू ती कोसळली म्हणून नवीन मजबूत किल्ला पध्दतीची तटबंदीयुक्त वखार बांधण्यात आली. त्यासाठी त्याकाळी तीन हजार गिल्डर (तीन हजार तोळे) एवढा खर्च आला. माल साठविण्याचे गोदाम तसेच गढी म्हणूनही याचा उपयोग व्हावा अशी तिची मजबूत बांधणी करण्यात आली होती. त्याठिकाणी दहा तोफा व दोनशे बंदुकीचा पहारा ठेवण्यात आला होता. वखारीवरील तोफांवर आफ्रिकेतील गुलामांची नेमणूक करण्यात आली होती. तर संरक्षणासाठी भारतीय सरंक्षक गार्ड होते.
डच वखारीची इमारत पोर्तुगीज पध्दतीची आहे. इ.स.१६७१ मध्ये बडीबेगमने हज यात्रेस जाण्यापूर्वी या वखारीत मुक्काम केला होता. इ.स. १६८० मध्ये वखारीच्या भोवताली खंदक खोदून त्यावर पुलाची सोय करण्यात आली. अडचणीच्या वेळी हा पूल उचलून घेण्याची सोय होती. वेंगुर्ले वखारीची तटबंदी १० फूट उंच व १ मीटर रूंद आहे. वखारीच्या चारही टोकाला पोर्तुगिज धाटणीचे चौकोनी बुरुज आहेत. बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी जंग्यांची रचना केलेली आहे. वखारीच्या प्रवेशव्दाराची कमान अर्धवर्तूळकार आहे. प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दातून आत शिरल्यावर समोरच ३० मीटर लांब व १५ मीटर रूंद दुमजली इमारत आहे. या इमारतीची बरीच पडझड झालेली आहे, तरी आपल्याला दुसर्या मजल्यावर जाता येते. इमारतीच्या मागच्या बाजूस चौकोनी विहिर आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी सुंदर जीना आहे.
दोनही मजल्यावर भरपूर दालन आहेत. पहिल्या मजल्यावरील एका दालनाच्या भिंतीत समोरासमोर अनेक खोबण्या आहेत व त्यातील बर्याच खोबण्यांत लाकडाचे तुकडे आहेत. या ठिकाणी पूर्वी लाकडाची मांडणी असावी. इमारतीच्या दुसर्या मजल्यावर जाण्यासाठी अरूंद जीना आहे. वरून संपूर्ण वखार दृष्टीच्या टप्प्यात येते.१९६३ सालापर्यंत या वखारीच्या जागी सरकारी कार्यालये होती. त्यानंतर ही इमारत खाली झाल्यावर त्यातील तुळ्या, वासे, दरवाज्या चौकटी हे सामान चोरीस गेले व इमारतची पडझड होऊन ती केवळ अवशेष रुपाने उभी आहे. वखारीवरील तोफा आज तेथे नाहीत पण वेंगुर्ला बंदरावर २ तोफा उलट्या पुरलेल्या पहायला मिळतात, त्यांचा उपयोग बोटी बांधण्यासाठी केला जातो.वेंगुर्ल्याच्या वखारीत डचांशी वाटाघाटी करण्यासाठी आदिलशहाचे सरदार मुस्तफाखान, अफजलखान, शिवाजी महाराजांतर्फे रंगो पंडीत, नेतो पंडीत येऊन गेल्याची इतिहासात नोंद आहे. औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याने काही काळ येथे वास्तव्य केले होते.
इ.स.१७३६ मध्ये करवीरकरांच्या फौजेने डच वखार लुटली.त्यानंतर त्यांच्यात झालेल्या तहाततील एका कलमानुसार डचांनी मालवण बंदरात वखार बांधण्याची परवानगी मिळविली.इ.स.१७६५ मध्ये इंग्रजांनी वाडीकरांचे यशवंतगड व भरतगड हे किल्ले काबिज केले. त्यावेळी झालेल्या तहात इंग्रजांनी भरतगड किल्ला परत केला व युध्द खर्चापोटी २ लाख रुपये मिळेपर्यंत वेंगुर्ला इंग्रजांच्या ताब्यात राहील अशी अट घातली. त्याप्रमाणे इ.स.१७८० पर्यंत वेंगुर्ला इंग्रजांच्या ताब्यात होते. त्याच वर्षी वाडीकरांनी हल्ला करून वेंगुर्ला शहर व कोट ताब्यात घेतले.इ.स. १७८६ मध्ये करवीरकर व पेशवे यांच्या संयुक्त फौजेने वेंगुर्ला कोट ताब्यात घेतला., पण त्यांची पाठ वळताच वाडीकर व पोर्तुगिज यांच्या संयुक्त सैन्याने तो पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१८१३ मध्ये करवीरकर व सावंतवाडीकर यांच्यात झालेल्या युध्दात इंग्रजांनी मध्यस्ती केली. युध्द खर्चापोटी सावंतवाडीकरांनी वेंगुर्ला शहर व कोट इंग्रजांच्या ताब्यात दिले.
डच वकिलातीने 1983 मध्ये या डच वखारीच्या संरक्षणाची मागणी केली व तिकडे होणा-या दुर्लक्षाकडे पंतप्रधान इंदिरा गांधीचं लक्ष वेधलं, तेव्हा खास बाब म्हणून दहा हजार रुपये खर्चून डागडुजी केल्याचं फक्त नाटक केलं गेलं.. महाराष्ट्र देशी सातवाहन, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, कदंब आदी सत्तांनी महाराष्ट्रात फार प्राचीन काळापासून दुर्गबांधणी केली. मोगल , बहामनी , अॅबिसिनियन सिद्दी , इंग्रज , पोर्तुगीज , मराठे यांनीही काही दुर्गरचना केली. पण डचांनी बांधलेला हा एकमेव किल्ला आपण जपला पाहिजे, नाहीतर हा वास्तुविशेष नष्ट झाला की हळहळत बसावं लागेल.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.