महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,13,934

दादोजी कोंडदेव – व्यक्तिवेध

Views: 2419
14 Min Read

दादोजी कोंडदेव – व्यक्तिवेध :

दादोजी कोंडदेव हे मुळचे पाटस परगण्यातील मलठण गावाचे कुलकर्णी . देशस्थ ॠग्वेदी ब्राम्हण गोत्र शांडिल्य. ९१ कलमी बखरीनुसार “ दादोजी कोंडदेव कुलकर्णी मौजे मलठन ता. पाटस परगणे “. जेधे शकावलीत देखील दादोजी कोंडदेव मलठणकर असा उल्लेख येतो. सध्यस्थीथित मलठणगाव “ राजेगाव मलठण “ या नावाने ओळखले जाते. या गावी त्यांच्या नावाने “ गुरुदेव दादोजी कोंडदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय “ आहे. दादोजी कोंडदेव यांच्या वास्तूत हि शाळा भरते.

दादोजी कोंडदेव यांची उल्लेखनीय कामगिरी :-

शहाजीराजांच्या पुणे जहागिरीवर देख्ररेख ठेवण्यासाठी खुद्द शहाजीराजांनी विश्वासाने नेमलेले एक विश्वासू कारभारी. दादोजी कोंडदेव हे देखील शहाजीराजांनप्रमाणे आदिलशाहीचे चाकर कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार . शहाजी राजे यांना आदिलशाही कडून जहागिरी मिळाली तिची देखभाल करण्यासाठी शहाजीराजे यांनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली सहा कलमी शकावलीनुसार “ शके १५५७ युव नाम संवत्सरी शाहजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी आदिलशाहीकडून जाली. सरंजामास मुलुख दिले त्यात पुणे देश राजाकडे ( शहाजीराजे ) दिला . राज्यांनी आपल्या तर्फेने दादाजी कोंडदेव मलठनकर यांसी सुभा सांगून पुणीयास ठाणे घातले. तेंव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरला शांती केली . मग सुभेदार यांनी कसब्याची व गावागनाची प्रांतात वस्ती केली.” सभासद बखरीनुसार “ शहाजी राजे यांसी दौलतेमध्ये पुणे परगणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा चौकस ठेविला होता.”

आदिलशाही सरदार मुरारपंत याने इ.स. १६३० च्या दरम्यान पुण्यावर हल्ला करून पुण्यात सर्वत्र जाळपोळ केली व पुणे उधवस्त केले. लोखंडी प्रहार ठोकून गाढवाचा नांगर फिरवला. त्यामुळे पुणे ओसाड पडले . पुंड –पाळेगार मनमानी करू लागले व सर्वत्र अराजक माजले. अशातच इ.स १६३१ च्या दरम्यान भीषण दुष्काळाची झळ या पुणे प्रांतास लागली. उजाड झालेल्या मुलुखास पुन्हा लागवडीखालीखाली आणण्याचे पुण्याच्या कारभाराची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम दादोजी कोंडदेव यांनी केले. ९१ कलमी बखरीत दादोजी कोंडदेव यांच्या या कामगिरीचे वर्णन येते “ मुलुक कुल आबाद केला . चोर नाहीसे केले, मवास मारिले, चोर लांडगे, वाधर नाहीसे केले. अदल इन्साफ बहुत केला . जाते सुली दिहे. खेडे वारे त्या स्थळी सिवापूर पेठ वसवली. बागशाही अंबराई वैगरे झाडे इरसाल महाराज शहाजीराजे त्यांचे नावे केला.

मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीत देखील दादोजी कोंडदेव यांच्या या कामगिरीचे वर्णन येते “ मावले बारा उजाड पडली होती . तेथे लांडगे होते त्यासी अशी ताकीद केली कि जो लांडगे मारील त्यासी शिर्पाव देवू . त्याजवरून लोकांनी कस्त करून लांडगे मारिले. मुलुख निरुपद्रव केला. मावळे लोकांस ताकीद केली जे तुम्हास वतनाची गरज असली तर वस्ती करणे . मावले लोकांनी उत्तर केले कि कौल सादर झाल्यावर त्याप्रमाणे मुलुकाची आबादी करू त्याजवरून दादाजी पंतानी रयतेस कौल दिला.” दादोजी कोंडदेवानी सारा वसुलीचे प्रमाण ठरवून दिले याचा तपशील देखील सदर बखरीत दिला गेला आहे “ पहिले साली दर बिघा रुका एक , दुसरे साली रुके सुमारे तीन , तिसरे साली दर बिघा रुके सहा , चवथे साली दर बिघा रुके नऊ , पाचवे साली दर बिघा रु. % ( चार आणे ) , सहावे साली दार बिघा रु. .//. रुपया ( आठ आणे ), सातवे साली दर बिघा एक रुपया . त्याजवर आठवे साली मलीकंबरी जमाबंदी ठरली. मुलुख मजूर लोक चोर नाहीसे जाहाले . मवास होते ते तमाम मारिले . इनसाफ बहुत करीत होते . जाते सुली दिले होते . कसबे खेडेबेरे तेथे शिवापूर पेठ वसवली.

दादोजी कोंडदेवानी जमिनीची मोजणी व प्रतबंदी करून मलिक अंबर सारा पद्धती पुणे परगण्यात अमलात आणली .

४ डिसेंबर १६३३ पुणे परगण्यातील महमदवाडी येथील जाऊ पाटील याने सभेतील लोकांसमक्ष लिहून दिल्लेल्या पत्रात ह्या संबंधी उल्लेख येतो “ बापूजी देऊ पाटील घुले हा आपला भाऊ दुष्काळ पडला म्हणून गाव सोडून परमुलखास गेला त्यावर वडील तो मेले. आम्ही वाचलो . सुकाळ झाला. यावर दादाजी कोंडदेव सुभेदार दिवाण झाले. त्यांनी मुलुख लावला. “ याच सभेतील आणखी एका पत्रात दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख येतो “ राजश्री दादाजी कोंडदेऊ सुभेदार येऊन गावाची गाव लाविला “ ( ओसाड झालेल्या गावाचा विकास केला. )

पुरंदरे दफ्तर खंड ३ दादोजी कोंडदेव यांच्या कामगिरीवीषयी खेडबऱ्याच्या देशपांडे करीन्यातील आलेला उल्लेख “ दादोजी कोंडदेव सुभेदार कसबीयात होते . ते वेळेस राजश्री श्रीसाहेब ( शिवाजीराजे ) फार लहान होते . राजेश्री महाराज साहेबी ( शहाजी महाराज ) मातोश्री आऊसाहेब व तुम्हास खेडेबारीयात दादाजीपंताशी पाठविले. त्यावेळी रहावयास वाडा बापूजी मुदगल यांच्या वाडीयात होता आणि तुम्हास वाडा बांधण्याची तजवीज केली . उद्यमी लोकांची घरे पाडून ती जागा वाडीयास केली. त्या उद्यमी लोकांच्या कुळास वसाहतीस जागा पाहिजे म्हणून कसबियाचे शिवारात पेठ वसवावयाचा तह केला . पेठेचे नाव शिवापूर ठेविले. तेथील उद्यमी लोकांना बारा वर्षपर्यंत करात सवलत दिली जाईल असा कौल दिला. दादोजी कोंडदेवाने खेड येथे शहाबाग केली . दादोजीने शिवापूर येथे शहजीराजाच्या नवे बाग करून या बागेला ” शहाबाग “ असे नाव दिले. संभाजीराजे व शिवाजीराजे यांच्या नावे त्यांना अनुक्रमे संभापूर व शिवापूर अशी नावे ठेवली. अशी दोन नवी गावे वसवली.

पेशवे दफ्तर खंड २२-२९२ “ आषाढ वद्य ४ शुक्रवारी राजश्री पंतप्रधान यांनी राजश्री शिवाजीराजे यांचा लालमहाल राजश्री दादाजी कोंडदेऊ यांणी राजश्री शहाजी राजे याचे कारकीर्दीस बांधला होता.”

९१ कलमी बखरीनुसार शहाजीराजांच्या आज्ञेने दादोजी कोंडदेव यांनी लालमहाल बांधला .

दादोजी कोंडदेव यांस शिक्षा :- दादोजी कोंडदेव यांनी स्वतःकडून अनावधाने घडलेल्या चुकीबद्दल स्वतःस शिक्षा करून घेतली यावरून त्यांच्या प्रामाणिकपणा आपणास दिसून येतो . याचा उल्लेख आपणास ९१ कलमी बखर व सप्तप्रकररनात्मक चरित्रात येतो. दादोजीनी शहाजी महाराजांच्या नावाने शिवापूर येथे आमराई लावली होती. त्याचा एक आंबा घेतला म्हणोन आपला हात तोडीत होते . मग लोकांनी अर्ज करून अस्तनी कमी केली. ( स्वतःच्या अंगरख्याची एक बाही कापून लांडी केली ) हे वर्तमान शहाजी राजे यांस विदित जाहाले . त्यांनी शिर्पाव पाठवले ( मनाची वस्त्रे ) . तेंव्हा दादोजीनी लांडी बाही असलेला अंगरखा वापरण्याचे सोडून दिले.

( ऐ. फा. सा. खं. १ / ऐतिहासिक पत्रबोध ) :- सदर पत्रात आदिलशाह दादोजी कोंडदेवांचा “ हरामखोर “ असा उल्लेख करतो . तसेच या पत्रातून दादोजी कोंडदेव हे शाजीराजांचे विश्वासू मुतालिक होते असे दिसते.

ज्या अर्थी शहाजी भोसले यास दरबारातून अप्रतिष्ठेने काढून लावण्यात आले आहे आणि त्याचा मुतालिक दादाजी कोडदेव याने कोड्यानाचे बाजूस धामधूम चालवली आहे , त्या अर्थी त्यास शिक्षा करून विलायत ताब्यात घेण्यासाठी खडोजी व बाजी घोरपडे याची नेमणूक करण्यात आली आहे . तरी तुम्ही आपल्या जमावानिशी मशारनीवेह्स सामील होऊन त्याच्या संमतीने तो दुष्ट दादाजी व त्या हरामखोराचे साथीदार यांना नेस्तनाबूद करावे आणि विलायत ताब्यात आणावी तेणेकरून तुमची सरफराजी होईल .

दादोजी कोंडदेव यांचे निधन :- दादोजी कोंडदेवानाच्या मृत्यूविषयी उत्तरकालीन साधनांत विषप्राशन केल्याचे उल्लेख येतात परंतु विश्वसनीय साधनांच्या आधारे त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे आढळून येते. दादोजी कोंडदेव वृद्धावस्थेत सत्तरीत दी. ०७-०३-१६४७ रोजी मृत्यू पावले.

पुरंदरे दफ्तर खंड ३ खेडबऱ्याच्या देशपांडे करीन्यातील आलेला उल्लेख “ दादाजीपंत राजेश्री महाराजांचे ( शहाजी ) भेटीस करनाटकात चालिले … त्यावर राजेश्री दादाजीपंतही करनाटकातून आले. तैसेच दुखन्य पडले आणि सवेच मेले. “

सभासद बखर :- कालवशात दादाजी कोंडदेव मृत्यू पावले.

९१ कलमी राजवाडे प्रत :- त्या उपरी दादाजी कोंडदेव त्यांनी बंदोबस्त कारभार येखतियारिचा केला त्यांचा मृत्यू झाला. ते समयी सोळा सतरा वर्षाचे शिवाजी राजे होते. त्यांनी बहोत शोक दादाजीपंत क्रमले ते समयी केला.

९१ कलमी मराठा साम्राज्याची छोटी बखर :- त्याउपरी दादोजी कोंडदेव यांनी बंदोबस्त कारभार अखत्यारीचा केला. असे असता शिवाजी राजे दिवसेदिवस बाळदशा टाकून बुद्धीचा प्रकाश करीत चालले . पंतांचा कारभार न्यायनिष्ठुर पातशाही कामावर नजर देवून आणि महाराजांचा कारभार लोक ठेवावे आणि संचय करावा. आपले मोकाशेखेरीज गाव मारावे , अवाढव्य करावे, जास्ती मिळवावे , हे पंतास न माने. वास्तव कटकट वाढली . त्याजवर पंतानी विचार केला. जे हा प्रकार बरा दिसत नाही. म्हणून पंती विषप्रलय केला . त्या योगे दादाजी मृत्यू पावले शिवाजी राजे सतरा वर्षाचे ते समयी होते. त्यांणी बहोत शोक केला .

९१ कलमी तारीखे शिवाजी :- Day by day Shivaji grew in wisdom. Dadaji always acted with respect towards the prince of Bijapur and carried on the administration of justice and settlement of the country in the best way possible. Shivaji however behaved in the opposite manner , collecting a body of men , he plundered the territories of others and thus accumulated wealth. Dadaji greatly disliked this conduct , but his prohibition had no effect on shivaji , frequent disputes took place between them. At last in utter disgust , dadaji took poison . Shivaji was then 17 years old . He was greatly grieved at the death.

सप्तप्रकरणात्मक चरित्र:- दादाजीपंतानी सांगितले “ आपण आक्रम घालणे ( त्याचा ) पाया घातला , हे युक्त न्हवे . दैवावर भर ठेऊन हे कर्म आरंभिले . ( परंतु ) आपले स्वामित्व ते किती ? पादशाहित चार चहुंकडे दिल्लीचा सुभा साहेबजादाच येऊन ( औरंगाबादेत ) राहिला आहे . महाराज वारंवार लिहितात . केले कर्म सिद्धीस न गेल्यास फार गैर. तथापि साहेब दैवाचे दिसतात . कर्तुत्व – बुद्धीही विचित्र . फार सावधपणे जे करणे ते करावे बोलले आणि त्याउपरी “ यांजपाशी कारभार करणे युक्त दिसत नाही, महाराजांस तेथे पेच यांचे कारणांनी पडून आपण न केले असताही अपयश आपणावरी येईल.” म्हणून चिंताग्रस्थ होऊन राहिले. तो शरीरे व्यथा होऊन क्षीण जाहले.

वरील सर्व साधनांनाचा विचार करता समकालीन साधनांच्या आधारे दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू वृद्धावस्थेत आजारी पडून झाला असे दिसून येते. उत्तरकालीन “ तारीखे शिवाजी व मराठा साम्राज्याची छोटी बखर “ या साधनांत दादोजीनी विषप्राशन केल्याचे नमूद केले आहे तरी या बखरींचे मूळ ९१ कलमी बखर या विधानास दुजोरा देत नाही . त्यातील नोंदीनुसार दादोजीना शिवाजी महाराजांबद्दल काळजी होती त्यामुळेच त्यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला हे जाणवते .

छत्रपती शिवाजी महाराजांना दादोजींच्या निधनाने अतीव दुख: झाले ते त्यांनी एका पत्रात व्यक्त केले . “ दादोजी कोंडदेव आम्हीजवळ वडिली ठेवून दिले होते . ते मृत्यू पावले आम्ही निराश्रित झालो . “ ( शिवचरित्र साहित्य खंड ३ )

शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांच्या न्यायदानाबद्दल असलेला आदर काही पत्रातुन व्यक्त होतो

साहेब ( शिवाजी महाराज ) कोणाला नवे करु देत नाहीत . दादोजी कोंडदेवाच्या कारकिर्दीत जे चालत आले असेल तेच खरे . ( शी.च.सा.खं.२ )

वैकुंठवासी साहेबांचे ( शाहजी महाराज ) व दादाजी पंतांचे कारकिर्दीत चालिले आहे.ते करार आहे तेणेप्रमाणे चालवणे , नवा कथला करू न देणे .( शी.प. सा.सं. खं. २ / १४०० )

साहेबी हुकुम केला कि दादाजी कोंडदेव व रा. साहेब यांचे कारकिर्दी चालल्याप्रमाणे वर्तणे . ( शी.प. सा.सं. खं. २ / १४०५ )

छत्रपती शाहू महाराज यांनीदेखील एका पत्रात दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल व त्यांच्या न्यायीपणाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत “ मागे दादोजी कोंडदेव लहानसाच ब्राम्हण झाला . परंतु त्याने जे इन्साफ केले ते अवरंगजेब पादशहासही वंद्य जाहले.” ( पे.द १४ लेखांक ५२ )

दादोजी कोंडदेव यांचा बखरीतील उल्लेख:-

९१ कलमी बखर :- सिउबास शहाणे केले. घोडे फिरवणे यैसे तरबेज केले.

शेडगावकर भोसले बखर :- शिवाजीराजे यांस विद्याभास शिकवणारा शिक्षाधारी ( शिक्षक ) होता. त्यांनी विद्याभ्यासात सिवाजीराजे यांस तयार केले.

शिवदिग्विजय बखर :- शिवाजी महाराज पुणे प्रांती राहून दादोजीपंत विद्याभ्यास करविला . मल्लयुद्ध , शस्त्र्युद्ध, करावयाच्या गती शिकवल्या .

महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीचा निर्णय :-

महाराष्ट्र सरकारने तज्ञ समिती स्थापन केली त्या समितीने दादोजी कोंडदेव यांची कामगिरी पुढीलप्रमाणे वर्णन केलेली आहे “जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादोजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढण्याचे सुभेदारही होते . ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते . त्यांची शीस्त कडक होती . शहाजीराजे व जिजाबाई यांच्यावर त्यांची निष्ठा होती . त्यांनी आता शहाजीराज्यांच्या आदेशाने पुण्यात जिजाबाई व शिवराय याना रहाण्यासाठी मोठा वाडा बांधला . त्याचे नाव होते लालमहाल. शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादोजींनी त्यांना काही वर्षे साऱ्याची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली . माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत , म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली . त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता . दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला . चोरांचा बंदोबस्त केला . जमिनीची प्रतवारी ठरवून त्यांनी तिच्यावर सारा आकारला . त्यामुळे लोकांना आनंद झाला”

श्री. नागेश सावंत

संदर्भ :- दादोजी कोंददेव खंडनण आणि मंडण :- श्यामसुंदर मुळे.
९१ कलमी बखर.
सप्तप्रकरणात्मक चरित्र.
मराठा साम्राज्याची छोटी बखर.
पेशवे दफ्तर खंड २२.
पुरंदरे दफ्तर खंड ३.
ऐतिहासिक शकावल्या : अविनाश सोहनी.
छायाचित्र साभार गुगल.

Leave a Comment