दगडी मठ, पाथर्डी –
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका हा अनेक साधुसंताची जन्मभूमी व कर्मभूमी राहिला आहे. नाथ संप्रदायाचे आद्य गुरू मच्छिंद्रनाथ यांची व श्री कानिफनाथांची संजीवन समाधी श्री क्षेत्र मढी येथे आहे. तसेच राष्ट्रसंत वै. ह.भ.प. तनपुरे महाराज जन्मभूमी दगडवाडी येथे आहे. पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र भगवानगड, श्री मोहटादेवी, व श्री कानिफनाथ महाराज यांची जशी भव्य मंदिरे आहेत तशीच दगडी मठ, खोलेश्वर व तपनेश्वर ही पुरातन मंदिरे देखील आहेत. धार्मिक व ऐतिहासिक अशा दोन्ही अंगाने पाथर्डी तालुका समृद्ध आहे.(दगडी मठ, पाथर्डी)
पाथर्डी या नावाच्या उत्पत्ती विषयी अशी कथा सांगितली जाते की, महाभारतात पुत्र अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर पार्थ म्हणजेच अर्जुन या ठिकाणी रडला म्हणून पाथर्डी असे गावचे नाव रूढ झाले. पाथर्डी शहराच्या पूर्वेला लोकवस्तीत एका चिंचोळ्या गल्लीत दगडी मठ या नावाने ओळखली जाणारी एक प्राचीन वास्तू आपले वेगळेपण आजही टिकवून आहे.
दगडी मठ या वास्तूची रचना आणि यावरील शिल्पं पाहिल्यानंतर ही वास्तू चालुक्यकालीन असल्याचे समजते. या वास्तूचा चालुक्य काळात शिक्षण, प्रसार, पाठशाळा, अध्यापन वर्ग यासाठी वापर केला जात असे. आज या ठिकाणी शिवलिंग स्थापित आहे. भग्नावस्थेत असलेले पडझड झालेली वास्तू नवीन पद्धतीने बांधकाम करून जर जतन करायचे झाले तर दगडी मठ हे उत्तम उदाहरण अभ्यासायला भेटेल.
दगडी मठ या वास्तू पासून अगदी काही अंतरावर एका उंच जोत्यावर सुंदर असे मारुती मंदिर आपणास दृष्टीस पडते. मंदिराच्या मागील बाजूला काही भग्न मूर्ती दिसून येतात. यात चामुंडा, भैरव व चोविसावे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची मूर्ती पाहण्यासारखी आहे. मारुती मंदिरा समोर एक भव्य दगडी वेस असून वेशीजवळ काही वीरगळी व भग्न मूर्ती उभ्या आहेत. या सर्व पुरातन वास्तू गावचा पुरातन असा ऐतिहासिक ठेवा असून तो जतन करणे गरजेचे आहे.
©️ रोहन गाडेकर