शिवछत्रपतींच्या नित्य पूजेतील बाण…
शिवाजी महाराजांच्या दररोजच्या पूजेत एक अप्रतिम बाण होता .बाण म्हंणजे शिवलिंग .या बाणाचे नावही आपल्याला माहित आहे त्याचे नाव चंद्रशेखर ! महाराज स्वारी शिकारीतही हा बाण जवळ बाळगत असत . आग्राला जेंव्हा महाराज गेले तेंव्हा ही हा बाण त्यांच्या बरोबर होता. महाराज कैदेतुन निसटल्या नंतर मदारी मेहतर फरासाने हा बाण जिवापाड जपून राजगडावर महाराजांच्या समोर हजर केला ,अशी दंतकथाही सांगितली जाते. पुढे महाराजांच्या निधना नंतर हा बाण रायगडावरच पूजला जात होता. तो जेंव्हा (सन १६८९)रायगडाला इतिकाद खानाचा वेढा पडला त्यावेळी ज्या वडीलार्जित आमोलिक वस्तु रायगडा बाहेर काढण्यात आल्या ,त्यातच हा बाण ही बाहेर पडला आणि शिवपूत्र राजाराम महाराजांच्या नित्य पूजेत आला .
सन १७०० मधे राजाराम महाराजांच्या निधना नंतर महाराणी ताराबाईनी सिंहगडावर राजाराम महाराजांच्या वृंदावनाचे काम चालू झाले व हे काम पूर्ण झाल्यानंतर हा बाण व आणखी एक बाण या वृंदावनातच ठेवला .पूढे अनेक वर्ष हा बाण तिथेच होता .माधवराव पेशव्यांच्या काळात या पेशव्यांनी काही काळ हा बाण शनिवार वाड्यात आणून ठेवला. पण लगेचच काही कारणाने पून्हा सिंंहगडावर जिथे होता तिथे नेऊन ठेवला . पूढे सन १९७०च्या दशकाच्या शेवट पर्यंत हा बाण छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीत सुरक्षित होता.पूढे सन १९८० मघे हा बाण सातारकर छत्रपती राजमाता सुमित्राराजे यांच्या कडे आणला गेला. या चंद्रशेखर बाणाला एक चंद्रकोरीच्या आकाराची रेखा आहे त्यातुन खूपच अल्प प्रमाणात भस्म पाझरत असायचे. शिवाय हा बाण खासा शिवछत्रपतींच्या वापरातील म्हणून प्रख्यात झाला होता .या बाणाची किर्ती ऐकून तत्कालीन पंतप्रधान इंदिरागांधी यांनी सातारकर छत्रपतींच्या देवधरात जाऊन या बाणाचे दर्शन घेतले होते. सोबत त्या वेळेचे वर्तमानपत्रात छापून आलेले छायाचित्र दिले आहे. आजही हा बाण सातारकर छत्रपतींकडे सुरक्षित आहे. शिवरायांच्या वापरातील खुप कमी वस्तू बद्दल ठोस पूरावे उपलब्ध आहेत. हा चंद्रशेखर बाण शिवछत्रपती वापरत याचे मात्र अनेक ठोस पूरावे उपलब्ध आहेत.
तसेच शिवरायांच्या वापरातील आणखी एक बाण आणि तिन शिवपींडी माझ्या माहितीत आहेत .पून्हा कधीतरी त्या विषयावर लिहीणच. सध्या या शिवरायांच्या नित्यपूजेतील चंद्रशेखर बाणाचे दर्शन घ्या…
( सिंहगडावरुन शिवछत्रपतींच्या नित्य पूजेतील बाण सातार्यात कोणी आणला .तिथल्या दुसर्या बाणाचे काय झाले . शिवरायांचे आणखी बाण व शिवपिंडी कुठे आहेत या प्रश्नांची उत्तरे योग्य वेळी ती लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करेन. )
इंद्रजीत सावंत, कोल्हापूर.
( वरील फोटोत कै.श्रीमती ईंदीराजी गांधी आणि राजमाता श्रीमती सुमित्राराजे भोसले या आहेत.)