रुस्तुमराव दमाजीराव थोरात –
मराठेशाहीच्या अथवा सुलतानशाहीच्या काळात मर्दुमकी गाजवणाऱ्या पराक्रमी वीर पुरुषांना व सरदाराना वेगवेगळे किताब व पदव्या देऊन गौरवण्यात येत असे. जसे कि झुंजारराव, प्रतापराव, हंबीरराव, इत्यादी असे किताब देऊन त्या सरदाराचा विशेष बहुमान करण्यात येई. हाटकर सरदार दमाजीराव थोरातांच्या अगोदरच्या काळात इतर कोणा मराठा सरदाराला ‘रुस्तुमराव’ हा किताब देण्यात आला होता का ? (छत्रपतींकडून) या विषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. पण दमाजीराव थोरात यांच्यानंतर जाधव व कडू या मराठा समाजातील तर कोकरे व पांढरे या हाटकर समाजातील सरदारांनी ‘रुस्तुमराव’ हा किताब अर्जित केल्याचे अस्सल पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे दमाजीराव हे मराठ्यांच्या इतिहासातील पहिले ‘रुस्तुमराव’ ठरतात.
‘रुस्तुम’ हे अत्यंत कडव्या व लढवय्या समजल्या जाणाऱ्या काबुलकडील पठाण या जमातीतील एका श्रेष्ठ वीराचे नाव आहे. त्यामुळे रुस्तुमराव या शब्दाचा अर्थ एक श्रेष्ठ वीर किंवा अत्यंत लढवय्या असाही घेता येऊ शकतो. दमाजीरावांनी त्यांच्या या किताबाचा उल्लेख त्याच्या शिक्क्यात हि केलेला दिसतो. त्याशिवाय त्यांच्या नामे देण्यात आलेल्या कित्येक सनद पत्रांमध्ये हि दमाजीराव थोरात रुस्तुमराव असेच उल्लेख आढळतात. काही कागद पत्रांमध्ये त्यांचा ‘दमसिंग’ असाही उल्लेख आढळतो.
* छत्रपती शाहू महाराजांतर्फे दमाजीराव थोरातांना देण्यात आलेला सरंजाम व जागीर अशी गुजरात, प्रांत कडेवळीत व भागानगर येथील काही महाल त्यांना सरंजामी खर्चासाठी देण्यात आले. त्याशिवायही हवेली, संगमनेर, बाळापूर, कुंभारी, बेल्हापूर, देपूर, कन्नड, सिन्नर, खानापूर, सावरे, पाटोदे, उडणगाव, चाळीसगाव, धोञे इ. काही महालांचे मोकासा हक्क ही त्यांना प्राप्त झाले. कोळवडी, हिंगणगाव,व उरळी कांचन येथे इनाम देण्यात आले. त्याशिवायही अनेक गावांचे मोकासा हक्क ही त्यांना प्राप्त झाले. वरील त्यांना देण्यात आलेली जागीर पाहता छ.शाहू महाराजांनी थोरातांना आपल्या पक्षात खेचण्याचा जोरदार व निकाराचा प्रयत्न केलेला दिसतो पण लवकरच त्याच्यामध्ये व शाहू छत्रपतीन्मध्ये बेबनाव निर्माण झाला. त्यामागचे कारण माहित नाही पण थोरातांची व शाहू महाराजांची गोडी झाल्यावर २-३ वर्षातच दमाजीराव पुन्हा छत्रपतींच्या सुनबाई ताराराणी यांच्या पक्षाला मिळाले असले पाहिजेत.
* माहिती साभार- सरंजामी मरहट्टे- संतोष ग. पिंगळे.
* फोटो साभार- सुमितराव लोखंडे (प्रस्तुत छायाचिञ हे सरदार दमाजीराव थोरात रूस्तूमराव यांच्या हिंगणगावच्या नष्ट झालेल्या गढीचे अवशेष, ढासळलेला एक बुरूज याच ठिकाणी दमाजीरावांनी पेशवा बाळाजी विश्वनाथ प्रधानास व त्यांच्या कबिल्यास कैदेत ठेवले होते.